मन करा रे प्रसन्न...बारावीच्या परीक्षेचं टेन्शन आलंय का?

श्रद्धा भेगडे-माने
Tuesday, 21 April 2020

सध्या भारतातच नव्हे; संपूर्ण जगात कोरोनाने काय धुमाकूळ घातला आहे; हे काही वेगळे सांगायला नकोच. आपण सगळेच जण आपआपल्या परीने याचा सामना करत आहोत.

सध्या भारतातच नव्हे; संपूर्ण जगात कोरोनाने काय धुमाकूळ घातला आहे; हे काही वेगळे सांगायला नकोच. आपण सगळेच जण आपआपल्या परीने याचा सामना करत आहोत. कोरोनापासून मुक्ती हीच एक समस्या नसून, त्याच्या अनुषंगाने अनेक समस्या मानवी जीवनात नकळत उत्पन्न झाल्या आहेत. मग त्या कौटुंबिक असोत, आर्थिक, सामाजिक, शेती विषयक किंवा शैक्षणिक; सर्व क्षेत्रातील समस्या मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. शिवाय वेगवेगळ्या स्तरांवर त्यांना तोंड द्यावे लागत आहे.
बारावीचा विद्यार्थी हा त्यापैकी एक. खरतर ‘पुढच्या वर्षी बारावी आहे, या विचारानेच ते घाबरलेले असतात, त्यामध्ये असे काही कोरोनासारखं झालं की त्यांची मानसिकता अधिकच खच्ची होते. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

काय करावं? कसं होणार अभ्यासाला वेळ मिळेल का? अभ्यासक्रमपूर्ण होइल का? असे प्रश्न त्यांच्या मनात नकळत गर्दी करू लागतात आणि स्वस्थ असलेलं मन अस्वस्थ होवू लागते. अशावेळी विद्यार्थ्यांनी आपलं मानसिकस्वास्थ्य कसं बिघडणार नाही, या कडे पूर्ण लक्ष दिलं पाहिजे.

प्रथमतः बारावीचा अजिबात ताण घेऊ नये. मन अगदी शांत व प्रसन्न ठेवावे. बालभारतीने जे सर्व विषयाच्या ई-पुस्तकाचे pdf उपलब्ध करून दिले आहेत, त्या पाठ्यपुस्तकातील कोणत्याही विषयाचा किमान एक तरी धडा रोज वाचावा महत्त्वाच्या व्याख्या लिहून काढाव्यात. प्रकार व उपप्रकार यांचा तक्ता तयार करावा. स्वाध्याय सोडवण्याचा प्रयत्न करावा. पुस्तक वाचतानाच वस्तूनिष्ठ प्रश्न एका वहीत पाठानुसार लिहावीत. यामुळे वर्गात धडा शिकवला जाईल, तेव्हा तो समजण्यास अधिक सोपा वाटेल किंबहुना मला हे येतंय हा सकारात्मक विचार मनात येईल आणि बारावीची पूर्वी वाटणारी भीती नक्कीच कमी  होईल. तसेच बारावीचं बोर्डाला सहज सामोरं जाण्याची तुमची तयारी होईल. 
एखादा मुद्दा समजला नसेल तर तो तसाच बाजूला ठेवा  किंवा शक्य झाल्यास आपल्या शिक्षकांना विचारा.

शिक्षक नेहमीच विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी तत्पर असतात. या जगात अशक्य काहीच नाही त्यासाठी लागणारे प्रयत्न, कष्ट करण्याची तयारी असणं गरजेचं आहे. बारावीला घाबरण्यासारखं काय आहे, फार-फार तर थोडा अभ्यास जास्त करावा लागेल इतकंच. आणि तेवढं आपण करूच शकतो नाही का?
शिवाय या लॉकडाऊनमध्ये फक्त अभ्यासच करायचाय असे काही नाही.

आपले छंद जोपासायचे आहेत, खेळ खेळायचेत. मन प्रसन्न ठेवायचंय पुढील गोष्टींना हसतमुख सामोरं जाण्यास शरीर निरोगी ठेवायचंय. रोज नित्यनेमाने प्राणायाम, योगा सूर्यनमस्कार करावा. अवांतर वाचन करावे आई-वडील, आजी-आजोबांशी गप्पा माराव्यात. त्यांचे अनुभव ऐकावे शिवाय आपल्याला माहिती असणाऱ्या गोष्टी त्यांनाही शिकवाव्यात. या सर्व गोष्टी आपलं व्यक्तिमत्व खुलवतात, आपणास बळ देतात. 

- श्रद्धा भेगडे-माने, फर्ग्युसन महाविद्यालय, पुणे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Do not take Tension of 12th Exam