सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात शिक्षकेतर ६० टक्के पदे रिक्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pune University

कर्मचाऱ्यांच्या एकूण मंजूर पदांपैकी तब्बल ६० टक्क्यांहून अधिक पदे रिक्त असून, अनेक प्रशासकीय विभागातील कर्मचाऱ्यांची संख्या २५ ते ३० टक्क्यांवर येऊन ठेपली आहे.

Pune University : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात शिक्षकेतर ६० टक्के पदे रिक्त

पुणे - प्रस्ताव सादर करून सहा महिने उलटले, तरी तुम्ही पुढील कार्यवाही का केली नाही? असा जाब सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभा सदस्याने अधिकाऱ्याला विचारला. अगदी निरागसपणे अधिकारी उत्तरले, ‘तुम्हाला खरं सांगू, आमच्या विभागात फक्त ३० ते ३५ टक्के कर्मचारी शिल्लक आहेत. एवढ्या कमी कर्मचाऱ्यांवर काम करणे अशक्य होऊन बसले आहे.’ अपुरी कर्मचारी संख्येमुळे विद्यापीठ प्रशासनाची काय अवस्था झाली आहे, याचे हे बोलकं उदाहरण...

कर्मचाऱ्यांच्या एकूण मंजूर पदांपैकी तब्बल ६० टक्क्यांहून अधिक पदे रिक्त असून, अनेक प्रशासकीय विभागातील कर्मचाऱ्यांची संख्या २५ ते ३० टक्क्यांवर येऊन ठेपली आहे. केवळ पुणे विद्यापीठ नाही तर संलग्न महाविद्यालये आणि राज्यभरातील सर्वच अनुदानित शैक्षणिक संस्थांची अवस्था अशीच झाली आहे. त्यामुळे दैनंदिन प्रशासकीय कामात दिरंगाई होत असून, थेट विद्यार्थ्यांच्या करिअरला धोका पोचत आहे. विविध प्रमाणपत्रे आणि प्रशासकीय कामकाजात दिरंगाईचे प्रमाणही वाढले आहे.

नाण्याला दुसरी बाजू...

कर्मचाऱ्यांची संख्यातर अपुरी आहे. त्याचबरोबर जेवढे आहेत, त्यातील फक्त ४० टक्के कर्मचारी प्रामाणिक काम करतात. उरलेले बिंधास्त असतात. आपलं म्हणून काम करण्याची मानसिकताच काही कर्मचाऱ्यांमध्ये नाही, असे मत एका प्राध्यापकांनी व्यक्त केली. सध्याचा कर्मचाऱ्यांचा आकृतिबंध हा २००९च्या आधारे असून, तंत्रज्ञानामध्ये मागील १४ वर्षांत अनेक बदल झाले आहे. तसेच विद्यापीठानेही कार्यालयीन गरजांसाठी तात्पुरत्या स्वरूपांत अनेक कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या आहे. पर्यायाने कामात दिरंगाई होते, यासाठी अपुऱ्या कर्मचारी संख्येचे कारण योग्य नसल्याचेही एका अधिसभा सदस्याने सांगितले.

परिणाम का?

  • विद्यार्थ्यांची अनेक प्रशासकीय कामे अडतात

  • अपुऱ्या संख्येमुळे कर्मचाऱ्यांवरही ताण येतो

  • कामचुकार कर्मचाऱ्यांमुळे प्रामाणिक कर्मचाऱ्यांवर अन्याय

  • विद्यार्थ्यांच्या करिअर किंवा भविष्यावर दूरगामी दुष्परिणाम

  • काही गैरप्रकारांतही वाढ होते

कर्मचाऱ्यांच्या रिक्त पदांसंबंधी सरकारकडे पाठपुरावा केला आहे. पदपभरती विचाराधीन असून, लवकरच रिक्त पदे भरण्यात येतील.

- प्रफुल्ल पवार, कुलसचिव, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

सरकार मान्यतेमुळे पदे रिक्त दिसत आहे. म्हणजे काम थांबले असे नाही. हंगामी, कंत्राटी आणि तदर्थ पद्धतीने कर्मचारी नियुक्त करत काम केले जाते. कर्मचारी नाहीत म्हणून प्रशासकीय काम थांबविता येत नाही. निश्चितच सरकारमान्य मंजूर पदे भरायला हवीत.

- विनायक आंबेकर, अधिसभा सदस्य, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

विद्यार्थी संख्या मोठ्या प्रमाणावर असतानाही ४० टक्के कर्मचाऱ्यांवर अनेक प्रशासकीय विभाग काम करत आहे. कामाच्या प्रचंड ताणाचा सामना सध्या कर्मचारी करत असून, तो तंत्रज्ञानाचाही वापर करत आहे. आपल्या परीने विद्यार्थ्यांसाठी सर्व कर्मचारी प्रामाणिकपणे काम करतात.

- डॉ. सुनील धिवार, अध्यक्ष, विद्यापीठ कर्मचारी संघटना