विशेष : भूशास्त्राची व्याप्ती आणि करिअरच्या संधी

इतिहास, रचना आणि पृथ्वीच्या पृष्ठभागावर आणि भूगर्भात झालेल्या बदलांचा अभ्यास करून, भूशास्त्रीय घटना व प्रक्रिया पृथ्वीवरील उत्क्रांतीचे नियंत्रण कशा प्रकारे करत आहेत हे भूशास्त्रज्ञ स्पष्ट करू शकतात.
Geology
GeologySakal

भूशास्त्र हा पृथ्वीचा अभ्यास आहे. या विषयाच्या पारंपरिक स्वरूपानुसार खडक व त्यांची रचना यांचा वापर करून पृथ्वीची रचना, काळाच्या ओघात झालेली तिची उत्क्रांती आणि ती ज्या विविध प्रक्रियांतून गेली त्या प्रक्रिया समजून घेतल्या जातात. भूशास्त्र हे बहुशाखीय विज्ञान आहे. ते मूलभूत विज्ञान नाही. यामध्ये भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र आणि गणिताची तत्त्वे वापरून पृथ्वीचा अभ्यास केला जातो. भूशास्त्राचा अभ्यास प्रत्यक्ष क्षेत्रावर, तसेच प्रयोगशाळेत दोन्ही ठिकाणी केला जातो. मात्र, यातील संशोधने क्षेत्राधारित निरीक्षणांतूनच आलेली असतात आणि सर्व भूशास्त्रीय संकल्पनांच्या प्रयोगशाळेत चाचण्या घेऊन नैसर्गिक भूशास्त्रीय वैशिष्ट्ये स्पष्ट करणे शक्य होते.

इतिहास, रचना आणि पृथ्वीच्या पृष्ठभागावर आणि भूगर्भात झालेल्या बदलांचा अभ्यास करून, भूशास्त्रीय घटना व प्रक्रिया पृथ्वीवरील उत्क्रांतीचे नियंत्रण कशा प्रकारे करत आहेत हे भूशास्त्रज्ञ स्पष्ट करू शकतात. भूशास्त्राचा वर्ग खडक आणि क्षार, नमुन्यांचा सुक्ष्म व अतिसुक्ष्म अभ्यास यापासून सुरू होतो. यातून आपल्याला खडक व क्षारांबद्दल कळतेच, परंतु पृथ्वीचा इतिहासही समजत जातो. भूशास्त्र हा केवळ खडक व क्षारांच्या उगमाचा व उत्क्रांतीचा अभ्यास नाही, तर प्राचीन भूतकाळाचे गूढ उकलण्यात हे विज्ञान मदत करते. पॅलेओण्टोलॉजीसारख्या (अश्मीभूत अवशेषांचा अभ्यास) आपल्या रोचक विषयांच्या माध्यमातून भूशास्त्रज्ञांना अनेक नामशेष वनस्पती व प्राण्यांच्या (पृष्ठवंशीय व अपृष्ठवंशीय) उगमाचा व उत्क्रांतीचा अभ्यास करणे शक्य होते. भूशास्त्रामध्ये पर्वत, टेकड्या, दऱ्या, पठारे, नद्या, हिमनग आदी जमिनीच्या अनेक स्वरूपांचा अभ्यास केला जातो. तसेच भूस्खलन, ज्वालामुखी, भूकंप आदी पृथ्वीच्या पृष्ठभागावरील अनेक घटनांचाही अभ्यास केला जातो.

एखाद्या भूशास्त्रज्ञाच्या कामाचे महत्त्वपूर्ण भाग म्हणजे प्रकल्पाचे नियोजन, विविध प्रकारची माहिती जमवण्यासाठी क्षेत्र उपक्रम, प्रयोगशाळेवर आधारित माहितीवर प्रक्रिया करणे आणि प्रकल्प/असाइनमेंटचे उद्दिष्ट निष्कर्षाप्रत नेणाऱ्या सर्वसमावेशक अहवालातील अर्थपूर्ण सारांशासाठी त्याचा अन्वयार्थ काढणे. भूशास्त्राच्या उपयोजनाची व्याप्ती मुख्यत्वे असाइनमेंटच्या अर्थात नेमून दिलेल्या कामावर अवलंबून असते.

भूशास्त्रातील शैक्षणिक पर्याय

भूशास्त्र हा विषय भारतातील अनेक विद्यापीठे/शिक्षण संस्थांमध्ये शिकवला जातो. विद्यार्थी बी.एससी./बी. एससी. ऑनर्ससाठी या विषयाचा पर्याय निवडू शकतात. पदवी प्राप्त केल्यानंतर आयआयटीजसह अनेक संस्थांमध्ये भूशास्त्र/उपयोजित भूशास्त्र विषयात एम.एससी करता येते. भौतिकशास्त्रात बी.एससी. केलेले विद्यार्थीही उपयोजित भूभौतिकशास्त्रात (अप्लाइड जिओफिजिक्स) एम.एससी./एम. टेक करू शकतात. पदव्युत्तर शिक्षणानंतर विद्यार्थी इंजिनिअरिंग जिओलॉजी, मिनरल एक्स्प्लोरेशन, पेट्रोलियम एक्स्प्लोरेशन, जिओ-इन्व्हॉर्न्मेंटल इंजिनिअरिंग आदी विशेष (स्पेशलाइझ्ड) विषयांत एम.एससी. (टेक)/ एम. टेक/ एम. फिल करू शकतात. यासाठी गेट स्कोअर असणे अनिवार्य आहे. महत्त्वाकांक्षी विद्यार्थी पीएच.डी, डी. एससी आदींसाठी प्रवेश घेऊन संशोधन करू शकतात किंवा शैक्षणिक संस्थांमध्ये प्राध्यापक किंवा संशोधक म्हणून काम करू शकतात. भूशास्त्राचा देशभरातील शाळांमधील माध्यमिक तसेच उच्चमाध्यमिक अभ्यासक्रमांत एक विषय म्हणून समावेश व्हावा यासाठी जीएसआय मनुष्यबळविकास मंत्रालय आणि सीबीएसई/आयसीएसई/राज्य शिक्षण मंडळांसोबत पाठपुरावा करत आहेत. भूशास्त्रविषयक कामासाठी आवश्यक असलेले काही बिगर-शैक्षणिक गुणांची व अन्य माहिती पुढील भागात घेऊयात.

- आशिषकुमार नाथ, संचालक व जनसंपर्क अधिकारी, भारतीय भूशास्त्रीय सर्वेक्षण

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com