बालक-पालक : सुरणाय स्वाहा!

बालक-पालक : सुरणाय स्वाहा!

‘‘आई, हा दगड कशाला आणलायंस तू? कसला काळपट आहे!’’ आईनं पिशवीतून इतर भाज्यांबरोबर आणलेल्या सुरणाच्या मोठ्या गड्ड्याकडे बघत छोटी चिवचिवली.

‘‘वेडे, दगड नाही गं, सुरण म्हणतात त्याला!’’ आईनं छोटीच्या डोक्यात गमतीनं टपली मारली.

‘‘पुरण?’’

‘‘पुरण नाही गं माझे आई, सुरण!’’

‘‘हा कुठे मिळाला तुला?’’

‘‘मिळेल कशाला? मी विकत आणलाय!’’

‘‘विकत? अगं कसला घाणेरडा आहे तो...आणि माती बघ किती लागलेय. मी खालून खेळून आल्यावर पायाला जरा माती असली, तरी म्हणतेस, कुठे चिखलात लोळून आलेयंस कुणास ठाऊक. आणि हा मातीत लोळलेला सुरणोबा चालतो वाटतं तुला?’’ छोटीनं लगेच बुद्धीची चमक दाखवली.

तशाही परिस्थितीत आईला ‘सुरणोबा’ ह्या शब्दाची गंमत वाटली.

‘‘अन्नाला नावं ठेवायची नाहीत. घाणेरडं म्हणायचं नाही. तुझ्या ह्या सुरणोबामध्ये खूप पौष्टिक घटक असतात. आरोग्याला चांगला असतो तो. आपल्याला आणखी स्ट्रॉंग करतो,’’ आईनं छोटीला समजावलं.

‘‘पण तू ह्याचं नक्की काय करणार आहेस?’’

‘‘अं....करेन काहीतरी. भाजी, नाहीतर भरीत, नाहीतर...’’

‘‘भाजी...? नाही नाही नाही नाही...! अजिबात नाही हं आई...! सुरणाबिरणाची भाजीबिजी काही करायचं नाही, सांगून ठेवते. मी अज्जिबात खाणार नाही...! सुरण घरात करायचाच नाही!!’’ किंचाळण्यावरूनच लक्षात येत होतं, की ही छोटीची मोठी बहीण असणार. तिला नुकतीच शिंगं फुटायला लागलेली.

बिचारा सुरणाचा गड्डा! आपण कुणाच्यातरी पोटात जाणार, याचंच त्याला टेन्शन आलं होतं. पण आता मात्र धरणीमातेनं दुभंगून आपल्याला पोटात घेतलं तर बरं, असंच त्याला वाटू लागलं. तो धरणीमातेच्या पोटातूनच बाहेर आला होता, हे तो सोईस्कररीत्या विसरला.

‘बरं, नंतर ठरवू आपण,’ या अटीवर माय-लेकरांमध्ये तह झाला आणि सुरणाला फ्रीजमध्ये अंधारकोठडीची शिक्षा फर्मावली गेली. रोजच्या जेवणात इतर भाज्यांना संधी मिळाली, अधूनमधून कांदा, बटाटा प्रत्येक ठिकाणी मिरवत राहिले. मध्येच पोळीभाजीचा कंटाळा आला म्हणून कधी डोसे, कधी इडल्या, कधी पराठे, कधी कटलेट, कधी नुसतीच भेळ तर कधी पावभाजीही झाली.

एके रविवारी आईनं दोन्ही मुलींना हाताशी घेऊन किचनची आवराआवर काढली. मोठी नाइलाजानंच सहभागी झाली होती. फ्रिज आवरायचं काम तिच्याकडं होतं. भाज्यांचा ट्रे काढताना तिच्या लक्षात आलं, आईनं इथेच सुरणाचा गड्डा ठेवला होता. आईचा डोळा चुकवून तो आता गायबच करून टाकावा, असं तिच्या मनात आलं. तिनं ट्रे बाहेर काढला, तर सुरणाचा गड्डा गायब! आपण तर घरीच होतो, आईनं सुरणाची भाजी, कोशिंबीर, भरीत, लोणचं, आमटी, चटणी, काहीच केलं नव्हतं. मग सुरण गेला कुठं?

मोठीनं सरळ आईलाच भिडायचं ठरवलं.
‘‘पोटात!’’ आईनंही नेमक्या शब्दांत उत्तर दिलं.

‘‘म्हणजे? पण आम्ही तर भाजी खाल्लीच नाही! तुलाही सांगितलं होतं, भाजी करू नकोस म्हणून!’’ मोठी अस्वस्थ होऊन म्हणाली.

‘‘हो की. मी माझा शब्द पाळला. सुरणाची भाजी केली नाही. पण कटलेट, पावभाजी, पराठे, असं बरंच काहीबाही केलं होतं या आठवड्यात, आठवत नाही का तुम्हाला?’’ आईनं उत्तर दिलं आणि ते छान छान पदार्थ किती वेगळ्या चवीचे आहेत म्हणत आपण कसे खाल्ले, ते आठवूनही मोठीच्या पोटात ढवळायला लागलं!

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

(लेखक पटकथा व संवादलेखक असून, विविध माध्यमांसाठी लेखन करतात.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com