esakal | बालक-पालक : मी खीर खाल्ली, तर...
sakal

बोलून बातमी शोधा

Cat

बालक-पालक : मी खीर खाल्ली, तर...

sakal_logo
By
अभिजित पेंढारकर

रात्र झाली होती. अंथरुणं घालून मुलं झोपायच्या तयारीत होती. शेवटचा आजीबरोबरचा गोष्टींचा तास रंगला होता.

‘मांजर म्हणाली, म्यांव म्यांव करी, वरचे डोंगरी, मी खीर खाल्ली, तर बुड बुड घागरी! आणि घागर....’’ आजीनं असं म्हणून एक पॉज घेतला.

‘बुडालीsss!’ मुलींनी तिचं वाक्य पूर्ण केलं.

‘चला, झोपा आता!’ आजीनं दोघींना दामटलं.

‘ए आजी, मी एक पेप्सिकोला खाऊन येऊ?’ धाकटी म्हणाली आणि उठायला लागली. तेवढ्यात मोठीनं तिचा पाय धरून तिला तसंच मागं ओढलं. धाकटीचं नाकच आपटलं आणि ती किंचाळली.

‘आजी, बघ ना ही जाडी ढोली कशी करतेय ती!’

‘आणि तू वाळकी काकडी माझे पेप्सिकोले चोरून खातेस तेव्हा गं?’ मोठीनंही तिची शस्त्रं काढली आणि दोघी वचावचा भांडायला लागल्या. आजीनं मध्यस्थी केली.

‘अगं, तुम्ही दोघींनी मोजून ठेवलेत ना आपापले पेप्सिकोले? आणि ही काय खायची वेळ आहे का? किती खाल दिवसभरातून?’

‘मोजून ठेवले, तरी ही चोरून खाते माझ्यातले. चोरटी!’ मोठी गुरगुरली.

‘तूच चोरतेस. तूच चोरटी!’ धाकटीही अंगावर आली.

काही वेळापूर्वी आजीच्या मांडीवर डोकं ठेवून अजगरासारखे सुस्तावलेले दोन देह आता शेषनागासारखे फणा काढून एकमेकांना डसायला टपलेले होते.

‘उद्यापासून कुणी कुणाचा पेप्सिकोला खायचा नाही. कुठलीच चोरी करायची नाही. चोरीची शिक्षा काय होते, बघितलंत ना गोष्टीत?’ आजीनं डोळे वटारले, तशा दोघी एकदम मऊ झाल्या.

‘आजी, तुला नाही आवडत पेप्सिकोला?’ धाकटीचं कुतूहल जागं झालं.

‘आवडत असेल गं, पण डॉक्टरांनी तिला खायला परवानगी दिलेली नाही. म्हणून आईच ओरडते तिला काही गोड खाल्लं की. हो ना आजी?’ मोठीनं हुशारी दाखवली.

‘हो गं. तुझी आईही तसलीच आणि बाबाही. सारखं हे खाऊ नको, ते खाऊ नको म्हणून टोकतात मला.’ आजीनं सांगितल्यावर दोन्ही मुलींना खूप हसू आलं. मग आजीनं तिच्या लहानपणीच्या खादाडीचे किस्से सांगितले. चिंचा, आवळे, बोरं, गुळाचे खडे कसे परकराच्या ओच्यात भरून ते खायचे, मग कसा मार मिळायचा वगैरे. किस्से ऐकतच मुली झोपी गेल्या.

‘आईsss माझा पेप्सिकोलाsss!’ सकाळी सकाळी मोठीनं गजर करून घर डोक्यावर घेतलं. आईनं तिला शांत करून विचारल्यावर समजलं, की शेवटचे दोन पेप्सिकोले राहिले होते, त्यातला प्रत्येकीचा एकेक होता आणि धाकटीनं दोन्ही खाल्ले असल्याचा मोठीचा संशय...संशय कसला, आरोपच होता. बाबांनीही

मध्यस्थी केली.

‘अगं, चिनू झोपलेय अजून. ती कधी दोन पेप्सिकोले खाईल?’ बाबांनीही आता जरा मोठीला झापलं. ती मात्र तिच्या आरोपावर अडून होती. छोटी खरंच झोपलेली आहे, याची शहानिशा करून झाली. रात्री दोन पेप्सिकोले होते, आता एकच आहे, तर एक कुणी खाल्ला असेल, हे काही कळायला मार्ग नव्हता.

‘एक मिनिट हं!’ असं म्हणून बाबा आजीच्या खोलीकडे का गेले, हे मात्र मोठीला कळलं नाही. बाबा बाहेर आले, ते हातात पेप्सिकोल्याचं कव्हर घेऊनच.

‘आई, हे काय आहे? तुझ्या खोलीत बेडच्या मागे पडलेलं मिळालं!’ त्यांनी आजीकडं बघून विचारलं आणि आजीला नेमकी त्याच वेळी अचानक तिच्या पोथीच्या पारायणाला सुरुवात करायची

आठवण झाली!

loading image