बालक-पालक : अवघी विठाई माझी!

Balak-Palak
Balak-Palak

‘मावशी, फरसबी कशी दिली?’’ चिंगी हातातली पिशवी पुढं करत तोऱ्यात म्हणाली.
‘घ्येवडा ना? पंदरा रुपे पावशेर!’’
‘घेवडा नाही हो, फरसबी...! त्या त्या अशा हिरव्या हिरव्या लांबुडक्या शेंगा आहेत ना, त्या...!’’ चिंगीनं पुन्हा ठसक्यात मावशींच्या पथारीवर एका कोपऱ्यात मांडलेल्या भाजीकडं बोट दाखवलं.
‘अगं, त्यालाच शरावन घ्येवडा म्हंतात!’’ मावशी हसून म्हणाल्या, ‘‘किती देऊ? पावशेर?’’
‘नको...एवढा कशाला? आई, आपल्याला पाव किलो हवाय ना गं?’’ मागं शांतपणे उभ्या असलेल्या आईकडं बघून चिंगीनं विचारलं.
तिचं बोलणं ऐकून मावशी हसू लागल्या आणि आईलाही हसू आवरलं नाही.
‘का हसताय तुम्ही?’’ चिंगी फुरंगटली.
‘अगं, मावशींच्या भाषेतला पावशेर, म्हणजेच पाव किलो!’’ आईनं समजावलं.
‘व्हय व्हय. घ्या.’’ मावशींनी हसून पारड्यात भाजीचं माप केलं आणि प्लॅस्टिकची पिशवी काढायला लागल्या.
‘मावशी, प्लॅस्टिकची पिशवी नको. मी आणलेय ना कापडाची पिशवी!’’ चिंगीनं तिच्या पिशवीची पुन्हा आठवण करून दिली.
‘समदी गिऱ्हाइकं तुमच्यासारखीच असायला पायजे होती!’’ मावशींनी आनंदानं भाजी तिच्या पिशवीत भरून दिली.
चिंगीला आईबरोबर मंडईत भाज्या घ्यायला जायला फार आवडायचं. किती प्रकारच्या भाज्या, किती रंग, किती रूपं! हिरवी मिरची, लाल मिरची, ढोबळी मिरची (ह्याला ‘सिमला’ पण म्हणतात म्हणे!), रंगीत मिरची...! ‘ब्याडगी’ मिरची हे नाव पहिल्यांदा ऐकल्यावर तर चिंगी दोन दिवस हसत होती. मग प्रत्येक मैत्रिणीला तिनं ह्याच नावानं हाका मारायचा उद्योगही केला आणि त्यावरून ओरडाही खाल्ला होता.
हवी तेवढी, हवी तशी भाजी घ्यायची आणि सुट्टे पैसे द्यायचे, घ्यायचे, हे प्रकरण तिला फारच आवडायचं.
‘चल, वांगी घेऊया इथे,’’ असं म्हणून आई एका ठिकाणी थांबली.
चिंगीनं लगेच पिशवी पुढं केली.
‘घ्या. कृष्णाकाठची वांगी आहेत. लई भारी लागत्यात खायला!’’ काकांनी वांगी पिशवीत भरताना सांगितलं.
‘नको नको! आम्हाला भरली वांगी हवेयंत!’’ चिंगीनं लगेच पिशवी मोकळी करण्यासाठी पुढं केली.
‘चिंगे, अगं कृष्णाकाठची म्हणजे कृष्णा नदीच्या काठावर होणारी वांगी. ती खूप चविष्ट आणि पौष्टिक असतात,’’ आईनं समजावलं.
‘मग भरली वांगी म्हणजे?’’
‘ह्याच छोट्या वांग्यांमध्ये मसाला घालून त्याची भाजी केली, की त्या भाजीला भरली वांगी म्हणतात!’’ आईनं आणखी तपशील दिला, तेव्हा कुठं चिंगीचं समाधान झालं.
संकेश्वरी मिरची, महाबळेश्वरी गाजरं, तळेगावचे बटाटे, नाशिकची द्राक्षं, नागपुरी संत्री, ब्रोकोली, कढीलिंब (कडिपत्ता) आणि कडूनिंब, भाजीचं अळू आणि वड्यांचं अळू, आंबट चुका आणि अंबाडी, गावठी काकडी आणि वाळकं, लाल माठ आणि हिरवा माठ, लाल भोपळा आणि दुधीभोपळा, सुरण, कांदा आणि कांदापात, पांढरी बी, काळी बी, डबल बी, पावटा असं बरंच ज्ञान चिंगीनं फ्रॉकच्या पदराला बांधलं.
चाकवत, करडई, राजगिरा, चवळई, बारीक मेथी, अशा कितीतरी पालेभाज्या असतात, हेसुद्धा तिला समजलं. आत्तापर्यंत ती सगळ्या पालेभाज्यांना फक्त मेथी, शेपू आणि पालक, एवढंच म्हणत होती.
मनासारख्या भाज्या घेऊन घरी परत येताना चिंगी कुरकुरत म्हणाली, ‘‘आई, तुला ना, हिशोब काही कळतच नाही!’’
‘का?’’ आईनं आश्चर्यानं विचारलं.
‘सुट्टे नाहीयेत म्हणून किती मावश्यांकडं दोन रुपये, तीन रुपये तसेच राहू दिलेस तू! तुझ्याकडचे सुट्टे देता आले असते की!’’
‘खरंच गं!’
‘आपल्या घराजवळ मॉल आहे. इथे लांब भाज्या घ्यायला यायला परवडतं का आपल्याला? सांग ना!’’
‘इथल्या मावश्या आणि काका दिवसभर बसून भाज्या विकतात, त्यांना परवडावं, म्हणून येतो बाळा आपण!’’ आईनं सांगितलं आणि स्कूटर स्टार्ट केली.
चिंगी तिच्याकडं प्रेमानं बघत राहिली.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com