बालक-पालक : आपली माणसं!

Balak-Palak
Balak-Palak

‘आई, पण का येणारेत ते आपल्या घरी? हॉटेलमध्ये का राहणार नाहीयेत?’ छोटीनं सकाळपासून भुणभूण लावली होती.
‘अगं, तुझी लांबची मावशी आहे ती. त्यांचं इथं आपल्याशिवाय कुणी नाही. मग आपल्या घरी आले तर काय झालं?’ आईनं समजूत काढली.
‘मी माझी रूम शेअर करणार नाहीये हं त्यांच्याशी!’ आता दादानंही बंडाचं निशाण रोवलं.
‘हे बघ, हे ‘आपलं’ घर आहे. माझी रूम, तुझी रूम, असं काही नाहीये. आपल्याला सगळ्यांनाच ॲडजस्ट करावं लागणारेय थोडंथोडं. उगाच तक्रारी करू नका.’ आईनं किंचित दटावलं.
‘पण काsss?’ तक्रारीचा सूर कायम होता.
‘तुम्हाला माहितेय का, लहानपणी आम्ही...’

‘काही कार्यक्रम असेल, तर नातेवाइकांच्या घरीच जायचो राहायला. कुणी कसलीही तक्रार करायचं नाही, सगळ्यांची जेवणं एकत्र व्हायची, एकत्र खेळायचो, मजा करायचो...सगळं सांगितलं आहेस तू. पाठ झालंय आता!’ दादानं तणतण केली, पण आईला हसूच आलं.
‘मग प्रश्नच मिटला. तुम्ही आता चार दिवस शहाण्यासारखे वागाल, अशी मला खात्री आहे,’ आईनं विषय संपवून टाकला.
मावशी, काका आणि त्यांची दोन मुलं घरी आली, तेव्हा आई उत्साहात असली, तरी मुलं नाराजच होती. कुठल्या वस्तू द्यायच्या, कुठल्या वस्तू द्यायच्या नाहीत, कुठे हात लावायचा, कुठं लावायचा नाही, याची यादीच मुलांनी करून ठेवली होती.
पहिला दिवस जरा कुरबुरीतच गेला.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

‘आई, त्यानं माझा टॅब का घेतला? तू मावशीला सांग ना! जरा जास्तच करतोय तिचा मुलगा!’ छोटी आईकडं तक्रार करायला आली.
‘तो तुझा नाही, बाबांचा कामाचा टॅब आहे राणी. तुला कधीतरी खेळण्यासाठी आम्ही देतो. त्यानं तुझ्याकडून मागूनच घेतला ना?’ आईनं समजून घेत विचारलं.
‘हो,’’ छोटीचा होकार आला.
‘मग झालं तर! जरा जास्त तो करतोय की तू करतेयंस?’’ आईनं असं विचारल्यावर छोटीला काही उत्तर देता आलं नाही.
दुपारच्या जेवणापर्यंत मग अशाच काहीबाही कुरबुरी सुरू राहिल्या. मावशी आणि काकांनी त्यांच्या शहरातली प्रसिद्ध मिठाई आणि बासुंदी आणली होती. जेवताना मुलांची चंगळ झाली. मावशी आणि काका खूपच गप्पिष्ट होते. त्यामुळं जेवताना मजाही आली. नंतर सगळ्यांनी नवा व्यापार, कॅरम, पत्त्यांचा डाव टाकला. इतरवेळी दुपार आळसावलेपणात जायची. जास्त वेळ टीव्ही बघू नका, गेम खेळू नका म्हणून आई ओरडायची. आज तशी वेळच आली नाही. टीव्हीची आपल्याला आठवणही आली नाही, हे मुलांच्या लक्षात आलं.
पुढचे दोन दिवस मग छान मजेत गेले. सगळ्यांनी एक दिवस गडाची सफर केली आणि आजूबाजूच्या छोट्या ठिकाणी मुलंच मावशी आणि मुलांना घेऊन गेली.

कुणी कुठे झोपायचं, कुठलं पांघरूण घ्यायचं, कुठली उशी घ्यायची, कुठल्या उशीला हात लावायचा नाही, याचे एवढे नियम मुलांनी पाहुणे यायच्या आदल्या दिवशी ठरवले होते, की आईला काळजीच वाटत होती. प्रत्यक्षात झोपताना मात्र हे नियम कुठच्या कुठं गुंडाळून ठेवले गेले. छान गप्पागोष्टी करत, दंगामस्ती करत, एकमेकांना चिडवत मुलं झोपी गेली.
चार दिवसांनी मावशी आणि काका परत जायला निघाले. खरंतर चार दिवस झालेत, असं मुलांना वाटतच नव्हतं.
‘आई, ते का निघालेत त्यांच्या घरी? इथंच का राहत नाहीत ते?’’ छोटीनं कुरकुरत तक्रार केली आणि सगळ्यांना हसू आवरलं नाही.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com