YCMOU कृषी अभ्यासक्रमांच्‍या प्रवेश अर्जाची मुदत गुरुवार पर्यंत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

YCMOU Convocation Ceremony

YCMOU कृषी अभ्यासक्रमांच्‍या प्रवेश अर्जाची मुदत गुरुवार पर्यंत

नाशिक : यशवंतराव चव्‍हाण महाराष्ट्र मुक्‍त विद्यापीठातर्फे (YCMOU) कृषी शाखेच्‍या प्रमाणपत्र, पदविका, पदवी शिक्षणक्रमाच्‍या प्रवेश प्रक्रियेसंदर्भात सूचना जारी केली आहे. शैक्षणिक वर्ष २०२२-२३ अंतर्गत या अभ्यासक्रमांच्‍या प्रवेश अर्ज भरण्याची मुदत ३० जूनपर्यंत दिलेली आहे. विद्यापीठातर्फे प्रवेशाची संपूर्ण प्रक्रिया ही ऑनलाइन पद्धतीने राबविली जाते आहे.

विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज भरताना छायाचित्र, स्‍वाक्षरीची स्‍कॅन कॉपीसह आरक्षणासाठी आवश्‍यक असलेले मूळ प्रमाणपत्रे, दाखले आदी कागदपत्रांची स्‍कॅन कॉपी अपलोड करावी लागणार आहे. अर्ज भरताना समस्‍या उद्‍भवल्‍यास विद्यार्थ्यांना संबंधित कृषी शिक्षण केंद्राची मदत घेता येईल. विद्यापीठाने निर्धारित केलेल्‍या कालावधीमध्येच अचूकपणे भरलेला, सत्यता असलेला, तसेच सर्व अपलोड केलेले कागदपत्रे सुस्पष्ट दिसतील असे स्कॅन केलेले असलेले प्रवेश अर्जच पुढील प्रवेश प्रक्रियेसाठी ग्राह्य धरण्यात येईल, असे विद्यापीठातर्फे स्‍पष्ट केले आहे.

हेही वाचा: बारावीनंतर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात पदवी शिक्षणाची संधी

पदवी अभ्यासक्रमाची १६ जुलैला सीईटी परीक्षा

कृषी विज्ञान आणि उद्यानविद्या पदवी शिक्षणक्रमास प्रवेश घेण्यासाठी पदवी प्रवेश परीक्षा (सीईटी) उत्तीर्ण होणे आवश्‍यक असेल. ही सीईटी परीक्षा १६ जुलैला आयोजित केली आहे. परीक्षेचा निकाल २० जुलैला जाहीर करण्याचे नियोजित आहे. प्रवेश प्रक्रियेच्‍या पुढील टप्प्‍यात प्रथम फेरी गुणवत्तायादी २६ जुलैला प्रसिद्ध केली जाणार असून, यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी २७ ते ३० जुलै अशी वेळ दिली जाईल. दुसरी गुणवत्तायादी ३ ऑगस्टला प्रसिद्ध केली जाणार आहे. यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी ४ ते ६ ऑगस्‍ट अशी मुदत असेल.

हेही वाचा: करिअरच्या वाटेवर : अपारंपरिक मशिनिंग उत्पादनाचे क्षेत्र

प्रमाणपत्र, पदविकेच्‍या अभ्यासक्रमाची प्रक्रिया अशी

कृषी प्रमाणपत्र व पदविका शिक्षणक्रमाच्‍या प्रवेश प्रक्रियेअंतर्गत प्रथम फेरी गुणवत्तायादी ६ जुलैला प्रसिद्ध केली जाईल. यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी ७ ते ११ जुलै मुदत असेल. दुसरी गुणवत्तायादी १५ जुलैला प्रसिद्ध केली जाईल. विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी १६ ते १९ जुलैपर्यंत मुदत असेल. शिल्लक जागांवर पुढील प्रवेश प्रक्रियेतून प्रवेश दिला जाणार आहे.

Web Title: Admission Deadline For Ycmou Agricultural Courses

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :NashikeducationYCMOU