करिअर अपडेट : चॅटजीपीटी - तुमची नोकरी सुरक्षित आहे का? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Career Update

गेल्या काही वर्षांमध्ये चॅटजीपीटी आणि अन्य ‘एआय’ भाषासंबंधी मॉडेल्सचा प्रभाव वाढत आहे.

करिअर अपडेट : चॅटजीपीटी - तुमची नोकरी सुरक्षित आहे का?

- अंकित भार्गव

गेल्या काही वर्षांमध्ये चॅटजीपीटी आणि अन्य ‘एआय’ भाषासंबंधी मॉडेल्सचा प्रभाव वाढत आहे. त्यांची अगदी माणसाप्रमाणे अचूक आणि तत्परतेने लेखन करण्याची क्षमता दिसून आली आहे. संख्येने खूप जास्त, व्याकरणदृष्ट्या अचूक आणि अगदी मनुष्याने लिहिलेले आहे असे वाटावे इतकी चपखल वाक्ये आणि परिच्छेद लिहिण्यासाठी चॅटजीपीटीकडून न्यूरल नेटवर्क्सचा वापर करण्यात येतो.

या तंत्रज्ञानामुळे नोकऱ्यांच्या संख्येवर मोठ्या प्रमाणात परिणाम होईल अशी चिंता व्यक्त होत आहे. काही लोकांच्या म्हणण्यानुसार ‘एआय’ भाषा मॉडेल्समुळे अनेकांच्या नोकऱ्या जातील. नोकरी करणाऱ्यांमध्ये दोन प्रकारचे लोक असतात. एक निर्माते आणि दुसरे नक्कल करणारे. आता त्यांच्यावर नेमका काय परिणाम होणार आहे याचा विचार करुया.

कंटेंट आणि कॉपीरायटिंग

जाहिरात, लेख, बातम्या इत्यादींचे लेखक बहुतांशी इंटरनेटवरून माहिती गोळा करतात किंवा आपल्या समकालीन लोकांच्या लेखनातून वाङ्मयचौर्य करतात. द इंटरनॅशनल कॉन्सॉर्टियम ऑफ इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नलिस्ट्स यांनी २०१० ते २०१५ या कालावधीत ११ हजार बनावट नियतकालिके उघडकीस आणली होती. एखादा सामान्य लेखक ज्याप्रमाणे विविध ठिकाणचे लेखन कॉपी करून लिहितो त्या प्रकारचे लेखन चॅटजीपीटीच्या माध्यमातून सहजतेने करता येते. परंतु जे लेखक स्वत:ची मते, धोरणे आणि ग्राहकांची नस ओळखून जाहिराती लिहिणे अशा प्रकारचे लेखन करतात त्यांना चॅटजीपीटीची काळजी नाही. कारण चॅटजीपीटी केवळ याआधी लिहिलेल्या लेखनाच्या आधारे कॉपी तयार करू शकतो परंतु नवीन लेखन करू शकत नाही.

सॉफ्टवेअर अभियंते आणि आयटी

बहुसंख्य नवीन सॉफ्टवेअर अभियंते इंटरनेट किंवा कंपनी रिपोजिटरीमधून कोड कॉपी करतात किंवा ‘लो कोड/नो कोड’ प्लॅटफॉर्मचा वापर करतात. एखाद्या महत्त्वपूर्ण तंत्रज्ञानावर काम करून त्या माध्यमातून एखादे नावीन्यपूर्ण अॅप्लिकेशन तयार करणाऱ्यांची संख्या अत्यल्प आहे. अशा प्रकारे कॉपी करण्यामध्ये, कोडला डॉक्युमेंट करण्यामध्ये वाकबगार असणाऱ्या लोकांना पुढील दोन-तीन वर्षांमध्ये धक्का बसणार आहे. परंतु त्या पुढे मात्र अभियंत्यांना नेहमीच मागणी राहणार आहे.

अभियंत्यांना महाविद्यालयामध्ये चॅटजीपीटीचा उपयोग करून कोड कसा तयार करावा हे शिकवण्यात येणार नाही तर चॅटजीपीटीची गुणवत्ता सुधारण्याची अधिक मोठी जबाबदारी त्यांच्याकडे येणार आहे. स्वत:ची कार्यक्षमता वाढवण्यासाठी जे चॅटजीपीटीचा उपयोग करतील (कोडींगच्या ओळी प्रतितास, प्रकल्पाचे मूल्य निश्चित करणे) त्यांना नेहमीच मागणी राहील. यामध्ये एक त्रुटी अशी राहू शकते की अगदी प्राथमिक ज्ञानावर आधारित असलेल्या नोकऱ्या राहिल्या नाहीत तर शैक्षणिक संस्था आणि विद्यार्थी यांना प्रत्यक्ष अनुभव घेण्याच्या दृष्टीने समस्या येऊ शकतील.

विक्री/ग्राहक सेवा

एआयचा उपयोग करून फारशी सक्रियता आवश्यक नसलेली उत्पादने आणि सेवा ऑटोमेटेड करता येऊ शकतात. परंतु मोठ्या प्रमाणात विक्रीकला आवश्यक असलेल्या ठिकाणी विश्वास आणि प्रत्यक्ष मनुष्य असणे गरजेचे आहे. हे चॅटजीपीटीच्या माध्यमातून उपलब्ध होत नाही.

तुम्ही तुमची नोकरी ऑटोमेट करत असल्यास चॅटजीपीटी तुमची जागा घेऊ शकते. परंतु तुमचे तांत्रिक कक्षेबाहेरचे काम ऑटोमेट करता येऊ शकत नाही. तुम्ही आजपर्यंत कॉपी करत आला असाल तर कुणीतरी तुम्हाला कॉपी करत आहे याबाबत सावध राहा. हे कुणीतरी म्हणजे उपरोक्त चॅटजीपीटी किंवा अन्य ‘एआय’ आधारित अॅप आहेत.

(लेखक ‘फॉक्सबेरी टेक्नॉलॉजीज’चे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत.)

टॅग्स :educationjobCareer