करिअर अपडेट : सॉफ्ट स्किल्स : व्यक्तिमत्त्व घडवताना ankit bhargav writes soft skills While building personality | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Soft Skills

करिअर अपडेट : सॉफ्ट स्किल्स : व्यक्तिमत्त्व घडवताना

- अंकित भार्गव

आपण आज महत्त्वाच्या अशा ‘सॉफ्ट स्किल्स डेव्हलपमेंट’ अर्थात ‘व्यक्तिमत्त्व विकास’ या विषयाचा विचार करणार आहोत. सॉफ्ट स्किल्सच्या दृष्टिकोनातून विचार करता काही महत्त्वाचे मुद्दे खालीलप्रमाणे.

दृष्टिकोन - कॉलेज कॅम्पसमध्ये वर्गमित्र, ज्युनिअर इतकेच नव्हे शिक्षकांचेही आवडते आहात. त्यामुळेच कॉर्पोरेट जगताविषयीचा अॅटिट्यूड योग्यच असेल असे तुम्हाला वाटत असेल तर ते चूक आहे. आपल्या शिक्षकांचे आवडते विद्यार्थी असणे, तासन तास अभ्यास करणे किंवा चांगले गुण मिळवणे म्हणजे यशाची खात्री नव्हे. उद्दिष्ट साध्य करण्यासाठी स्मार्टवर्क गरजेचे आहे. आपल्याला देण्यात आलेले काम पूर्ण करून देण्याप्रती योग्य दृष्टिकोन असलेली व्यक्ती करियरच्या प्रवासात एक पाऊल पुढे असते.

कामाच्या ठिकाणी अभिव्यक्त होताना - आपले कार्यालय म्हणजे एखादे महाविद्यालयच आहे असे अनेकांना वाटत असते. त्यामुळे ते आपल्या वरिष्ठांबरोबर आणि मिटिंगमध्ये औपचारिकपणे संवाद साधत असले तरी सहकारी आणि कनिष्ठ कर्मचारी यांच्याबरोबर बोलताना ते महाविद्यालयात वावरताना असते तशी देहबोली आणि भाषा वापरतात. हे योग्य नाही. कंपनीच्या अंतर्गत किंवा बाहेर व्यवसायाशी संबंधित संवाद साधताना आपली भाषा औपचारिकच असावी. प्रत्यक्ष संवाद साधताना, ई-मेल लिहिताना आणि सोशल मीडिया वापरताना औपचारिक भाषा कशी वापरायची ते शिकून घेतले पाहिजे.

हास्यविनोद की शाब्दिक हिंसा? - महाविद्यालयामध्ये असताना एखाद्या व्यक्तीवर आपत्तीजनक टिप्पणी केल्यामुळे त्या विद्यार्थ्याला गैरवर्तन प्रतिबंधक समितीसमोर हजर व्हावे लागते. या चुकीसाठी त्याची चांगलीच खरडपट्टी काढण्यात येते. एखाद्याच्या शरीराविषयी टिप्पणी करणे, लैंगिक बाबतीत नको ते बोलणे, एखाद्याची जात, समाज, लिंग, वांशिकता, देश, शिष्टाचाराच्या पद्धती या बाबतींत अवमानजनक बोलणे हे सर्व गैरवर्तन या श्रेणीत येते. अशा प्रकारचे गैरवर्तन कामाच्या ठिकाणी अजिबात सहन केले जात नाही.

गॉसिपिंग - तुम्हाला कंपनीच्या इतिहासात ‘सर्वाधिक चढउतार पाहिलेला माणूस’ अशा प्रकारे आपले नाव नोंदवायचे असल्यास बिनधास्त गॉसिपिंग करा. सुरुवातीला तुम्ही गॉसिपिंगमुळे लोकप्रिय होता; परंतु तुम्हाला अशा प्रकारच्या गॉसिपिंगमध्ये फार रस आहे हे इतरांना कळते तेव्हा तितक्याच वेगाने तुमची घसरण सुरू होते. तुमचे काम, सहकारी किंवा तुमच्या करिअरविषयी मार्गदर्शन करणारे वरिष्ठ यांच्या बाबतीत हे नकारात्मक परिणाम दिसून येतात.

वेळेचे व्यवस्थापन - तुम्ही तुमच्या डेडलाईन्स पाळता किंवा नाही यावर तुम्ही भरवशाचे कर्मचारी आहात किंवा नाही याबाबतचे मत ठरते. तुमच्या कामाची गुणवत्ता आणि अचूकता यामुळे तुम्ही तुमच्या सहकाऱ्यांपेक्षा उजवे ठरता. याचा अर्थ असा नाही की तुम्ही प्रत्येक वेळी विचार न करता ‘वेळेचे बंधन’ स्वीकारावे.

अ) तुम्ही ठरलेल्या वेळेत काम पूर्ण करून देऊ शकता का? याचे मूल्यमापन करणे.

ब) तुम्ही वेळेत काम पूर्ण करू शकत असाल तर उत्तमच आहे; परंतु याबाबत तुमच्यासमोर काही आव्हान किंवा जोखीम असल्यास स्पष्टपणे आणि नेमकेपणे चर्चा करणे.

क) एकदा तुम्ही कालमर्यादा स्वीकारल्यास तिचे काटेकोरपणे पालन करणे या तीनही मुद्द्यांविषयी आपण अगदी पक्के असले पाहिजे.

टीमवर्क - टीम म्हणून काम करण्यास शिकून घ्या. कमी कालावधीत गुणवत्तापूर्ण काम करण्याच्या क्षमतेमध्ये वाढ होऊन करिअरमध्ये पुढे जाण्यासाठी तुमची टीम तुम्हाला मदत करू शकते. संपूर्ण टीमकडून तुम्हाला नावीन्यपूर्ण संकल्पना मिळू शकतात. काही टीम डिस्कशन्स आणि आयडीएशन्समधून उद्योगक्षेत्राचा कायापालट घडवणाऱ्या सूचना मिळालेल्या आहेत. केवळ एकाच व्यक्तीने संपूर्ण टीमच्या गुणवत्तेची हमी घेणे हे अत्यंत जोखमीचे आहे. ग्रुप थिअरी (सामुहिक काम), लिखित, मौखिक किंवा शब्दविरहित संवाद, टीममधील प्रत्येक सदस्याची पार्श्वभूमी जाणून घेणे, प्रत्येकाने बोलते व्हावे यासाठी त्यांना प्रोत्साहित करणे किंवा इतरांना बोलण्याची संधी देणे असे उपक्रम कॅम्पसमध्ये राबविण्यात यावेत. त्याचा उपयोग कॉर्पोरेटमध्ये काम करताना होतो. डोमेन स्किल्स ही तुमच्या करियरची इमारत असेल तर सॉफ्ट स्किल्स हा त्या इमारतीचा पाया आहे.

(लेखक ‘फॉक्सबेरी टेक्नॉलॉजीज’चे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत.)

टॅग्स :educationjobSkills