टेक करिअर : सिव्हिल इंजिनिअरिंगमधील संधी

सिव्हिल इंजिनिअरिंगला मराठीमध्ये स्थापत्य अभियांत्रिकी म्हणतात. ही अभियांत्रिकीची अशी शाखा आहे की, ज्यामध्ये विविध क्षेत्रे, नोकऱ्या, कौशल्य आणि लोक समाविष्ट होतात.
Civil Engineer
Civil EngineerSakal
Summary

सिव्हिल इंजिनिअरिंगला मराठीमध्ये स्थापत्य अभियांत्रिकी म्हणतात. ही अभियांत्रिकीची अशी शाखा आहे की, ज्यामध्ये विविध क्षेत्रे, नोकऱ्या, कौशल्य आणि लोक समाविष्ट होतात.

- डॉ. एच. आर. मगर पाटील

बांधकाम म्हटलं की त्याबरोबर येणारे शब्द म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंग. बारावीनंतर या अभ्यासक्रमाची निवड करता येते. काय आहे हे क्षेत्र आणि रोजगार आणि स्वयंरोजगारासाठी त्या उपयुक्तता किती हे जाणून घेऊयात.

सिव्हिल इंजिनिअरिंगला मराठीमध्ये स्थापत्य अभियांत्रिकी म्हणतात. ही अभियांत्रिकीची अशी शाखा आहे की, ज्यामध्ये विविध क्षेत्रे, नोकऱ्या, कौशल्य आणि लोक समाविष्ट होतात. स्थापत्य अभियांत्रिकी ही यांत्रिकी अभियांत्रिकी (मेकॅनिकल इंजिनिअरिंग), रसायन अभियांत्रिकी (केमिकल इंजिनिअरिंग) आणि विद्युत अभियांत्रिकी (इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग) समवेत अभियांत्रिकीच्या इतर सर्व शाखांची मातृशाखा आहे. तसेच जल संसाधन, सिंचन आणि बांधकाम अभियांत्रिकी या स्थापत्य अभियांत्रिकीच्या शाखांद्वारे अन्न, वस्त्रे आणि निवारा यासारख्या मानवाच्या तिन्ही मूलभूत गरजा पूर्ण होतात. स्थापत्य अभियांत्रिकीमध्ये इमारती, पूल, रस्ते, रेल्वे, धरणे आणि सिंचन (डॅम व इरिगेशन) व्यवस्था, घुमट (डोम), चिमणी, मायक्रोवेव्ह टॉवर्स, मास्ट, पाणी आणि सांडपाणी प्रक्रिया संयंत्र (वॉटर व वेस्ट वॉटर ट्रीटमेंट प्लांट) आदींचा समावेश होतो. पायाभूत प्रकल्पांच्या बांधकामात जगभरातील गुंतवणुकीचा दर खूपच जास्त आहे. तेल आणि वायू (ऑइल अँड गॅस) प्रकल्प, अणु ऊर्जा (ॲटॉमिक एनर्जी) प्रकल्प, कोळसा आणि पाण्यापासून वीजनिर्मिती या क्षेत्रातील बांधकामामधील गुंतवणूकदेखील जास्त आहे. म्हणूनच, या संबंधित क्षेत्रात चांगले कौशल्य असलेल्या अभियंत्यांची गरज सध्या वाढत आहे.

सर्वच क्षेत्रांत गरजेचे

याबरोबरच स्ट्रक्चरल डिझाईन करून बांधकाम करणे, प्रकल्प नियोजन करणे, नगर संरचना व बांधकाम करणे, अंदाज व मूल्यांकन (एस्टिमेशन व व्हॅल्युएशन) करणे, पायपिंग डिझाईन करून बांधकाम करणे, धरण व सिंचन व्यवस्थेचे जाळे तयार करणे, भुमार्ग, लोहमार्ग तसेच जलमार्ग यांचे व्यवस्थापन करून बांधकाम करणे, पिण्याचे पाणी व सांडपाणी यांच्यावर उपचार करणे (वॉटर व वेस्ट वॉटर ट्रीटमेंट) व त्याचे व्यवस्थापन करून बांधकाम करणे, जलसंधारण व जल प्रेरित (वॉटर रिसोर्स व हायड्रॉलिक्स) शास्त्र यांचे व्यवस्थापन करणे, भू, भौगोलिक व भूकंप शास्त्र (जिओलॉजी, जिओटेक्निकल व अर्थक्वेक इंजिनिअरिंग) यांचे व्यवस्थापन करणे, सब सी व ऑफशोर इंजिनिअरिंग इत्यादींसाठी ही स्थापत्य अभियंत्याची आवश्यकता असते.

स्वयंरोजगाराची संधी अधिक

कंत्राटदार (कॉन्ट्रॅक्टरशिप), बांधकाम करून घेणे (बिल्डरशिप), स्थावर मालमत्तेचे नियोजन करणे (रिअल इस्टेट वर्क्स), सनदी अभियंता (चार्टर्ड इंजिनिअर) असेही काही संबंधित व्यवसाय आहेत ज्यामध्ये स्थापत्य अभियंत्याची अत्याधिक मागणी आहे. तसेच, पीडब्ल्यूडी, सिंचन, रेल्वे, गोदी आणि बंदर (डॉक्स आणि हार्बर) आणि विमानतळ (एअरपोर्ट) यांचे बांधकाम अशा सरकारी क्षेत्रात सुद्धा स्थापत्य अभियंत्याची आवश्यकता भासते. हे एक सर्जनशील क्षेत्र आहे ज्यामध्ये विचार (थिंकिंग), नियोजन (प्लॅनिंग), डिझाईनिंग आणि वास्तूंच्या रचनांचे वास्तविक बांधकाम समाविष्ट आहे. म्हणून, हे सुरुवातीला मनामध्ये सुरू होते नंतर कागदावर उतरते, साहित्याची गुणवत्ता ठरवून व डिझाईन करून आवश्यक सामुग्रीचे प्रमाण शोधले जाते. एखाद्याचे स्वप्न साकार करण्याकरिता विविध तज्ज्ञ कार्य करतात आणि महत्त्वाचे म्हणजे या सर्व गोष्टी अंतिम वापरकर्त्याच्या निरीक्षणाखाली केल्या जातात व त्यामुळे हे खरोखरच आव्हानात्मक असते. म्हणूनच स्थापत्य अभियांत्रिकी ही अशी शाखा आहे, ज्याला शहरी तसेच ग्रामीण भागातही कायमच मागणी असते.

स्थापत्य अभियांत्रिकी शिक्षणाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात बदलत आहे. मेटल फायबर्स, फ्लाय अॅश, कृत्रिम वाळू (आर्टिफिशियल सँड), ऍडमिक्स्चर, सुपर प्लास्टिसाइजर इत्यादी नॅनो आणि अद्ययावत सामग्रीचा वापर, तसेच डिझाईन तत्त्वज्ञानामध्ये होणारी प्रगती आणि या व्यतिरिक्त, आर्टिफिशियल इंटेलिजन्स व इंटरनेट ऑफ थिंग्ज यांचा वापर हे नेहमीच स्थापत्य अभियंत्यांना अद्ययावत राहण्यासाठी भाग पडतात. बांधकामामध्ये त्यांची सद्यःस्थिती (प्रेझेंट स्टेट्स), शक्ती आणि टिकाऊपणा (स्ट्रेंथ व ड्यूऱ्याबिलिटी) हा तांत्रिक दृष्टिकोनातून जाणून घेण्यासाठी अत्यंत संवेदनशील इलेक्ट्रॉनिक सेन्सरचा उपयोग होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com