माहिती वेचणी तंत्र - भाग २ 

डॉ. आशिष तेंडुलकर 
Thursday, 23 April 2020

या तंत्रामध्ये आपण प्रथमतः तालीम संचाची निर्मिती करतो. यामध्ये वाक्य आणि त्यातून वेचलेल्या व्यक्ती, वस्तू, जागा, संस्था, वेळ-काळ यांचा समावेश केलेला असतो. 

मागील लेखामध्ये आपण वाक्यसाच्यांच्या आधाराने व्यक्ती, वस्तू, जागा, संस्था, वेळ-काळ वेचणी कशी करतात याचा ऊहापोह केला. या तंत्रामध्ये आपल्याला वाक्यसाचे तयार करावे लागतात आणि ते उपलब्ध नसल्यास हे काम करण्यात अडचणी येतात. अशा वेळी सांख्यिकी आधारित व्यक्ती, वस्तू, जागा, संस्था, वेळ-काळ वेचणी तंत्रांचा वापर करतो. या तंत्रामध्ये मुख्यत्वेकरून विविध ठोकताळ्यांचा वापर केला जातो. उदा. ‘पुण्यामध्ये काल २ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले.’ या वाक्यामध्ये २ हा अंक आहे आणि तो गणनेशी संबंधित आहे, असा ठोकताळा मांडता येतो. काल/आज/उद्या हे कालवाचक शब्द आहेत. ‘पुणे’ हे मराठी व्याकरणानुसार नाम आहे, तसेच शहराचे नावदेखील आहे. याचाच अर्थ ‘पुणे’ हा शब्द स्थाननिर्देश करतो. आता हे शहराचे नाव आहे, हे संगणकाला कसे कळेल, तर आपण यासाठी उपलब्ध स्थान सूचीचा वापर करू शकतो. अशा सूचीच्या आधाराने आपल्याला स्थान/काल वाचक शब्द शोधून काढता येतात. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

या तंत्रामध्ये आपण प्रथमतः तालीम संचाची निर्मिती करतो. यामध्ये वाक्य आणि त्यातून वेचलेल्या व्यक्ती, वस्तू, जागा, संस्था, वेळ-काळ यांचा समावेश केलेला असतो. एक वाक्य, म्हणजे एक उदाहरण! 

Image may contain: text that says "एक वाक्य, म्हणजे एक उदाहरण! पुण्यामध्ये वाक्य या तंत्रामध्ये आपण तालीम संचाची निर्मिती करतो. यामध्ये वाक्य आणि त्यातून वेचलेल्या व्यक्ती, वस्तू, जागा, संस्था, वेळ- काळ यांचा समावेश केलेला असतो. काल स्थळ माहिती प्रकार काळ संख्या कोरोनाबाधित रुग्ण रोग व्यक्ती आढळून आले इतर इतर"
अशा प्रकारची अनेक उदाहरणे तयार करावी लागतात. हा तालीम संच तयार झाल्यावर आपण सांख्यिकीय व्यक्ती, वस्तू, जागा, संस्था, वेळ-काळ वेचणी तंत्राला प्रवीण करण्यात याचा वापर करू शकतो. प्रत्येक शब्दाचे वर्गीकरण करण्यासाठी शब्दांची वैशिष्ट्ये मांडून घ्यावी लागतात. त्यानंतर या शब्दांचे स्वतंत्र किंवा एकत्रितरीत्या वर्गीकरण करता येते. स्वतंत्र वर्गीकरणामध्ये आपण शब्द संबंधांना फाटा देतो. भाषांमध्ये सर्वसाधारणपणे जवळपास आढळणारे शब्द परस्परावलंबी असतात, याचा वापर करून ही व्यक्ती, वस्तू, जागा, संस्था, वेळ-काळ वेचणी पक्की करता येते. यामध्ये सांख्यिकी शाखेतील तंत्रांचा वापर होतो. यामध्ये प्रामुख्याने घातप्रमाणी प्रारूपांचा (exponential models) समावेश असतो. पुढील लेखामध्ये आपण उर्वरित माहिती वेचणी तंत्रातील पायऱ्यांबद्दल बोलूया, तो पर्यंत घरी राहा आणि कोरोनापासून सुरक्षित राहा. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ashish tendulkar article future jobs part 2

Tags
टॉपिकस