
IAS Officer : बारामतीकर सुपुत्र प्रतीक जराड बनला आयएएस अधिकारी
बारामती - बारामतीकर सुपुत्र असलेल्या प्रतीक अनिल जराड याने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तीर्ण होत बारामतीतील आयएएस अधिकारी होण्याचा सन्मान प्राप्त केला आहे. शालेय जीवनापासूनच वरिष्ठ सनदी अधिकारी होण्याचे स्वप्न उराशी बाळगलेल्या प्रतीक याने कठोर मेहनत करीत अखेर आयएएस होण्याचे स्वप्न साकारले आहे.
आज जाहीर झालेल्या निकालामध्ये बारामतीच्या प्रतीक जराड याने देशात 112 वा क्रमांक प्राप्त करीत उज्वल यश संपादन केले. या यशामुळे आता थेट वरिष्ठ अधिकारी बनवण्याचा त्याचा मार्ग खुला झाला आहे. बारामती येथील म. ए. सो. विद्यालय येथे माध्यमिक तर तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयात बारावीपर्यंतचे शिक्षण त्यांनी पूर्ण केले. त्यानंतर इस्लामपूर येथील राजारामबापू पाटील महाविद्यालयातून त्यांनी अभियांत्रिकीची पदवी संपादन केली.
ही पदवी संपादन केल्यानंतर केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करण्यासाठी त्यांनी दिल्ली गाठली होती. दिल्लीला त्याने सलग प्रयत्न करून अखेर या परीक्षेत यश संपादन केले. प्रतीक याचे वडील बारामती येथील आयएसएमटी कंपनीमध्ये क्लर्क असून, आई गृहिणी आहे. इयत्ता दहावी मध्ये त्याला 97 टक्के तर बारावी मध्ये 92 टक्के गुण प्राप्त झाले होते.
सुरुवातीपासून अतिशय हुशार असलेल्या प्रतीक याने नियोजनबद्ध रीतीने वाटचाल करून केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होण्याचे स्वप्न साकारले आहे. आज देशात 112 व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाल्याची बातमी आल्यानंतर जराड कुटुंबीयांनी आनंद व्यक्त केला. त्यांच्या घरी अभिनंदन करण्यासाठी बारामतीकरांनी मोठी गर्दी केली होती. स्वतः प्रतीक हा परीक्षेनिमित्त दिल्ली येथे आहे. तो येत्या काही दिवसात पुन्हा बारामतीला परतणार असल्याचे त्याच्या वडिलांनी सांगितले.