
दरवर्षी उन्हाळ्याची चाहूल लागली की शाळा-कॉलेजमध्ये असणाऱ्या मुलामुलींना आणि त्यांच्या पालकांना वेध लागतात ते वार्षिक परीक्षेचे.
तयारी परीक्षेची
- डॉ. भाग्यश्री झोपे
दरवर्षी उन्हाळ्याची चाहूल लागली की शाळा-कॉलेजमध्ये असणाऱ्या मुलामुलींना आणि त्यांच्या पालकांना वेध लागतात ते वार्षिक परीक्षेचे. वर्षाच्या अखेरीला परीक्षा येणार हे माहीत असते, वर्षभर त्या दृष्टीने अभ्यास केलेला असतो, पण तरीही शेवटच्या २-३ महिन्यांत बाकी सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून परीक्षेची तयारी घराघरांत केली जाते. त्यातही दहावी-बारावी असेल तर अख्खे घरच परीक्षामय होऊन गेलेले दिसते.
वर्षभर अभ्यास केलेला असला तरी परीक्षेच्या आधी १-२ महिने थोडी काळजी घेतली तर त्यामुळे ऐन परीक्षेत ताण येणे, आजारपण येणे, प्रश्नाचे उत्तर येत असूनही ऐन वेळी न आठवणे यापासून दूर राहता येणे शक्य असते. ‘शेवटचा दिस गोड व्हावा’ असे जे आपण म्हणतो त्याप्रमाणे परीक्षेतून सुखरूप बाहेर पडता येण्यासाठी आयुर्वेदाची कशी मदत घेता येईल ते पाहू या.
कितीही अभ्यास केलेला असला तरी परीक्षेला जाताना मनात थोडीशी उत्कंठा, उत्सुकता, ताण येणार हे गृहीत धरावेच लागते. ‘अभ्यास’ असो वा ‘परीक्षा’ यात चार गोष्टी महत्त्वाच्या असतात. शिक्षकांना शिकवलेल्या किंवा पाठ्यपुस्तकात लिहिलेल्या गोष्टी समजणे (मेधा), हे होण्यासाठी चित्तवृत्ती स्थिर असणे, एका ठिकाणी म्हणजे अभ्यासात लक्ष राहणे (एकाग्रता), जे समजले ते मेंदूमध्ये साठले जाणे (स्मृती), आणि योग्य वेळेला म्हणजे परीक्षेमध्ये जो प्रश्न आला असले त्याला अनुसरून मेंदूतील साठ्यातून उत्तराच्या रूपात लिहिता येणे. या सर्व गोष्टी पटकन व्हाव्यात, नेमकेपणाने व्हाव्यात, त्यांची एकमेकांशी सरमिसळ होऊ नये यासाठी बुद्धी कुशाग्र असावी लागते. परीक्षेमध्ये एका प्रश्नाचे उत्तर लिहिताना त्यावर पूर्ण लक्ष केंद्रित करता येणेही आवश्यक असते. एकाच वेळी सगळ्या प्रश्नांची उत्तरे डोक्यात भिरभिरत राहिली तर त्या गोंधळातून सगळे माहीत असूनही नीट उत्तर लिहिता न आल्याचीही अनेक उदाहरणे असतात.
आकलनशक्ती वाढवावी
मेधा म्हणजे ग्रहणशक्ती किंवा आकलनशक्ती. विषयाचे आकलन होणे किंवा विषय समजणे हे जितके महत्त्वाचे, तितकेच प्रश्नपत्रिका वाचताना प्रश्न समजणेही महत्त्वाचे होय. कित्येकदा पेपर झाल्यावर एकमेकांबरोबर बोलताना विद्यार्थ्यांच्या लक्षात येतो की आपण भलतेच उत्तर भलत्याच प्रश्नाला लिहिले आहे. यासाठी घाई न करणे, मन शांत ठेवून प्रश्न नीट वाचण्याची सवय लावून घेणे गरजेचे असते. यासाठी मेधावर्धक शतावरी उपयुक्त असते. शतावरी, शंखपुष्पी, गुडूची वगैरे मेंदूला पोषक व शक्तिवर्धक वनस्पतींपासून तयार केलेल्या मेमोसॅन गोळ्या, परीक्षेच्या आधीपासून घेता येतात. सुवर्णसिद्ध जल हे सुद्धा मेधासंपन्नतेसाठी, बुद्धिवर्धनासाठी उपयोगी असल्याने दिसून येते. घरात फिल्टर असला तरी फिल्टर केलेल्या पाण्यात २४ कॅरेट शुद्ध सोन्याचे नाणे किंवा वेढणे (रोज बोटात न घालायचे) टाकून २० मिनिटांसाठी उकळून गाळून ठेवलेले पाणी म्हणजे सुवर्णसिद्ध जल. दिवसभर हे पाणी पिण्याने बुद्धीला, मेंदूला तर शक्ती मिळतेच पण प्रतिकारशक्ती चांगली राहण्यासही मदत मिळते.
एकाग्रता महत्त्वाची
एकाग्रता हा अभ्यासासाठी किंवा परीक्षेसाठी नाही तर नंतर जीवन जगताना कायम उपयोगी पडणारा एक बुद्धीचा पैलू असतो. यासाठी सर्वांत चांगले असते ते ज्योतिध्यान. श्रीगुरू डॉ. बालाजी तांबे यांनी विकसित केलेल्या ‘सोम’ध्यानांतर्गत सकाळी किंवा संध्याकाळी (किंवा दोन्ही वेळेला) विशिष्ट मंत्र ऐकत ज्योतिध्यान करण्याचा व शेवटी ॐकार म्हणत ज्योत बंद डोळ्यांनी भ्रूमध्यात बघण्याच्या सरावामुळे एकाग्रता, स्मृती सुधारते, हॉर्मोनल बॅलन्स सुधारतो असा अनुभव आहे. याखेरीज रोज सकाळी सूर्यनमस्कार घालणे, अनुलोम-विलोम करणे याचाही मन स्थिर होण्यासाठी, आवश्यक त्या ठिकाणी एकाग्र होण्यासाठी उत्तम उपयोग होताना दिसतो.
विषय समजला तरी तो लक्षात राहणे आणि हवा तेव्हा आठवणे हे सुद्धा तेवढेच आवश्यक असते. यादृष्टीने स्मृतिवर्धनासाठी प्रयत्न करता येतात. पुन्हा पुन्हा अभ्यास करणे हे विषय लक्षात राहण्यास मदत करणारे असते. चैतन्य कल्प टाकून दूध घेणे, अमृतशर्करायुक्त पंचामृत घेणे हेसुद्धा स्मृती-बुद्धिवर्धनासाठी उपयोगी असते. आधुनिक शास्त्रानेही ब्राह्मी, वेखंड वगैरे वनस्पतींचे स्मृतिवर्धनातील योगदान सिद्ध केलेले आहे. अशा अजूनही बऱ्याच प्रभावी स्मृतिवर्धक वनस्पतींपासून तयार केलेले ब्रह्मलीन सिरप परीक्षेच्या आधीपासून घेणे चांगले असते. चवीला गोड असल्याने लहान मुलेही हे सिरप आवडीने घेतात.
सध्या मानसिक ताण हा सर्वांना पुरून उरलेला आहे. लहान मुलेही याला अपवाद नाहीत. आपल्या मुलाने किंवा मुलीने उत्तम गुणांनी उत्तीर्ण व्हावे ही अपेक्षा रास्त असली तरी पालकांनी आपल्या अपेक्षा मुलांवर लादणे किंवा त्याचा ताण मुलांना देणे योग्य नाही. घरातल्यांनी तर ही काळजी घ्यावीच, पण बरोबरीने अवाजवी ताण कमी व्हावा, ६-७ तास तरी शांत झोप लागावी यासाठी सॅन रिलॅक्स सिरप घेण्याचा उपयोग होतो. ऐन वेळी मनाचा गोंधळ होणे, अभ्यास झालेला असूनही उत्तर लिहिता न येणे यावरही याचा उपयोग होताना दिसतो.
परीक्षेच्या काळात आणि परीक्षेच्या आधी घरातील सर्वांनी थोडे ‘पथ्याने’ वागणे हितावह होय. घर छोटे असल्यास घरातल्या सर्वांनीच टी. व्ही. बघणे, गप्पा मारणे वगैरे गोष्टींवर नियंत्रण ठेवावे. ज्या गोष्टींनी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्याच्या मनात चलबिचल होईल त्या गोष्टी आपणही करायला नकोत, याचे भान सर्वांनीच ठेवावे, तसेच विद्यार्थ्याचा आत्मविश्र्वास वाढेल, त्याच्या मनातील भीती कमी होईल असे मोकळे वातावरण ठेवावे. आहार साधा, पचायला हलका आणि सात्त्विक असण्यावर भर द्यावा. बाहेरचे पदार्थ किंवा घरातही वारंवार हॉटेलमधल्यासारखे खाणे टाळावे. पाणीही शक्यतो उकळून पिण्यावरच भर ठेवावा. आहार संतुलित तर असावाच, पण मनाची एकाग्रता साधता येण्याच्या दृष्टीने सात्त्विक असावा.
आरोग्य बिघडू नये यासाठी विद्यार्थ्यांनी रात्री फार जागरणे टाळावीत. परीक्षेच्या ताणामुळे अधिकाधिक वाचण्याची इच्छा स्वाभाविक असली तरी वाचलेले लक्षात राहण्यासाठी मेंदूला पुरेशी विश्रांती देणे आवश्यक असते. तेव्हा मेंदू थकून जाईल, जागरणे कर-करून शरीर-मन थकून जाईल, असा अतिरेकी अभ्यास करू नये. अर्थात सुरुवातीपासूनच मनापासून अभ्यास केलेला असला तर शेवटच्या घडीला अभ्यासाचा असा अतिरेक करण्याची पाळीच येणार नाही.
परीक्षा म्हणजे काही तरी भयंकर, त्रास देण्यासाठी केलेली गोष्ट नाही तर वर्षभर केलेल्या अभ्यासाचे फळ पदरात टाकणारी एक आवश्यक गोष्ट आहे. त्यामुळे शांत मनाने, आत्मविश्र्वासाने व पूर्ण तयारीने परीक्षेला सामोरे गेले तर व यशाचे मानकरी होता येईल.
सर्वच विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी आणि नंतरच्या यशासाठी अनेक शुभेच्छा!!