CBSE HSC SSC Result : सीबीएसईचा बारावीचा निकाल तब्बल ५ टक्क्यांनी घटला; दहावीच्या निकालही झाला कमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

CBSE

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (सीबीएसई) घेतलेल्या बारावीच्या परीक्षेत ८७.३३ टक्के, तर दहावीच्या परीक्षेत ९३.१२ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

CBSE HSC SSC Result : सीबीएसईचा बारावीचा निकाल तब्बल ५ टक्क्यांनी घटला; दहावीच्या निकालही झाला कमी

पुणे - केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (सीबीएसई) घेतलेल्या बारावीच्या परीक्षेत ८७.३३ टक्के, तर दहावीच्या परीक्षेत ९३.१२ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. बारावीचा निकालात यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत तब्बल ५.३८ टक्क्यांनी, तर दहावीच्या निकालात १.२८ टक्क्यांनी घट झाल्याचे दिसून येते.

सीबीएसईने नेहमीप्रमाणे यंदाही कोणतीही पूर्व सूचना न देता अचानकपणे शुक्रवारी सकाळी बारावीचा आणि दुपारी दहावीचा निकाल ऑनलाइन पद्धतीने जाहीर केला. देशभरातील २८ हजार ४७१ शाळांमधील, तर देशाबाहेरील २६ देशांमधील शाळांच्या जवळपास ३८ लाख ८२ हजार ८३४ विद्यार्थ्यांनी दहावी-बारावीच्या परीक्षेला नोंदणी केली. यंदा २१ लाख ६५ हजार ८०५ विद्यार्थ्यांनी दहावीची, तर १६ लाख ६० हजार ५११ विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली.

दहावीची परीक्षा १५ फेब्रुवारी ते २१ मार्च दरम्यान घेण्यात आली. देशभरातील २४ हजार ४८० शाळांमधील २१ लाख ८४ हजार ११७ विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यातील २१ लाख ६५ हजार ८०५ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यातील २० लाख १६ हजार ७७९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विद्यार्थ्यांच्या तुलनेत उत्तीर्ण विद्यार्थिनींचा निकाल १.९८ टक्क्यांनी अधिक आहे.

तर बारावीची परीक्षा १५ फेब्रुवारी ते ५ एप्रिल या कालावधीत घेण्यात आली. देशभरातील १६ हजार ७२८ शाळांमधील १६ लाख ८० हजार २५६ विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यातील १६ लाख ६० हजार ५११ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली असून त्यातील १४ लाख ५० हजार १७४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विद्यार्थ्यांच्या तुलनेत उत्तीर्ण विद्यार्थिनींचा निकाल ६.०१ टक्क्यांनी अधिक आहे.

पुणे विभागाचा निकाल

सीबीएसईच्या पुणे विभागात महाराष्ट्र, गोवा, दीव-दमण, दादरा आणि नगर हवेली समाविष्ट आहे. त्यानुसार पुणे विभागातील दहावीची परीक्षा दिलेले ९६.९२ टक्के विद्यार्थी, तर बारावीचे ८७.२८ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

पुढीलवर्षी बोर्डाची परीक्षा १५ फेब्रुवारीपासून होणार सुरू

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने २०२४मध्ये घेण्यात येणाऱ्या परीक्षेची तारीखही जाहीर केली आहे. त्यानुसार दहावी आणि बारावीची बोर्डाची परीक्षा १५ फेब्रुवारी २०१४ या एकाच दिवशी सुरू होणार असल्याची माहिती सीबीएसईतर्फे देण्यात आली आहे.