
राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी सेल) विविध प्रकारच्या व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या सीईटी परीक्षा यंदा नियोजित वेळेत पूर्ण करण्यासाठी तयारी केली आहे.
CET Exam : सीईटीची नोंदणी होणार अॅपवरून
मुंबई - राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी सेल) विविध प्रकारच्या व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या सीईटी परीक्षा यंदा नियोजित वेळेत पूर्ण करण्यासाठी तयारी केली आहे. पहिल्यांदाच उमेदवारांना सीईटी परीक्षेच्या नोंदणीची प्रक्रिया करण्यासाठी अॅपच्या माध्यमातूनही सुविधा उपलब्ध करून दिली जाणार असल्याची माहिती आज सीईटी सेल आयुक्त महेंद्र वारभुवन यांनी मुंबईत दिली. यावेळी प्रवेश नियामक प्राधिकरणाचे अध्यक्ष जे. पी.डांगे आदी अधिकारी उपस्थित होते.
राज्यात उच्च व तंत्रशिक्षण, वैद्यकीय शिक्षण, आयुष, कृषी, कला संचालनालय आदी शिक्षणाच्या विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या विविध विषयाच्या 18 अभ्यासक्रमाच्या सीईटी परीक्षा सीईटी सेल मार्फत घेतल्या जाणार आहेत. या सर्व परीक्षा त्याच्या प्रक्रियेचे वेळापत्रक आणि एकूण कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्या कार्यक्रमानुसार जुलै महिन्याच्या अखेरपर्यंत सर्व परीक्षा आणि त्यांचे निकाल आदी जाहीर केले जाणार असल्याने ऑगस्ट महिन्यात राज्यातील सर्व व्यावसायिक अभ्यासक्रमांची महाविद्यालये आणि त्यांचे शैक्षणिक सत्र सुरू होईल. त्यासाठी सीईटी सेलने नियोजन केले असल्याची माहिती देण्यात आली.
सीईटी च्या एकूण 18 परीक्षा पैकी चार अभ्यासक्रमाच्या नोंदणी प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. उर्वरित परीक्षांचे वेळापत्रक सीईटी सेलने https://mahacet.org या आपल्या संकेस्थळावर उपलब्ध करून दिले असून त्यातील माहितीप्रमाणे विद्यार्थ्यांनी आपली नोंदणी करण्याचे आवाहन आयुक्त वारभुवन यांनी केले.
यावेळी परीक्षा सुरळीत व्हाव्यात यासाठी राज्यातील ३६ जिल्ह्यांमध्ये २४० परीक्षा केंद्र असतील. तर सीईटीच्या विविध परीक्षा इतर १० राज्यातील केंद्रांवर ही घेतल्या जाणार असून यामध्ये एमबीए, एमसीए आदी परीक्षांच्या परीक्षा केंद्रांचा समावेश आहे.