आगामी वर्षातील ‘सीईटी’ परीक्षेचा अभ्यासक्रम जाहीर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

cet exam

उच्च शिक्षण संचालनालयाने २०२३-२४ या शैक्षणिक वर्षाच्या प्रवेशासाठी उच्च शिक्षण विभागांतर्गत असणाऱ्या आठ अभ्यासक्रमांच्या सामाईक प्रवेश परीक्षेचा (सीईटी) अभ्यासक्रम जाहीर केला आहे.

CET Exam : आगामी वर्षातील ‘सीईटी’ परीक्षेचा अभ्यासक्रम जाहीर

पुणे - उच्च शिक्षण संचालनालयाने २०२३-२४ या शैक्षणिक वर्षाच्या प्रवेशासाठी उच्च शिक्षण विभागांतर्गत असणाऱ्या आठ अभ्यासक्रमांच्या सामाईक प्रवेश परीक्षेचा (सीईटी) अभ्यासक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार विधी अभ्यासक्रमासाठी १५०, बीएड-एमएड आणि बीपीएड-एमपीएडसाठी १०० गुणांची परीक्षा घेण्यात येणार आहे.

उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी दरवर्षी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत (सीईटी सेल) सीईटी परीक्षा घेण्यात येते. तंत्रशिक्षण विभागाच्या अखत्यारित असलेल्या सीईटी परीक्षांचा अभ्यासक्रम आणि गुणांचे निकष नुकतेच सीईटी सेलने जाहीर केले आहेत. त्यानंतर आता उच्च शिक्षण संचालनालयाच्या अखत्यारितील सीईटीसाठीचा अभ्यासक्रम उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेश देवळाणकर यांनी जाहीर केला आहे. या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी गुण आणि निकष आणि परीक्षेसाठी आवश्यक सविस्तर अभ्यासक्रम सीईटी सेलवर जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना सीईटी परीक्षांच्या तयारीसाठी मदत होणार आहे.

उच्च शिक्षण संचालनालयाने जाहीर केलेल्या निकषांनुसार विधी तीन आणि पाच वर्षे अभ्यासक्रमांची प्रत्येकी १५० गुणांची सीईटी परीक्षा होणार आहे. त्यासाठी विषय समान असले तरी गुणभार स्वतंत्र असेल. बीपीएड आणि एमपीएडसाठी प्रत्येकी ५० गुणांची लेखी, ५० गुणांची शारीरिक चाचणी अशी १०० गुणांची परीक्षा होणार आहे. संबंधित अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी होणाऱ्या सीईटी परीक्षेत कोणत्या अभ्यासक्रमाला किती गुण असणार आहेत, अभ्यासक्रमात कशावर आधारित असणार आहे, अशी सविस्तर माहिती देण्यात आली आहे.  संबंधित अभ्यासक्रमांची सीईटी परीक्षा ऑनलाइन पद्धतीने होणार आहे. परीक्षेत निगेटिव्ह गुण पद्धत राहणार नाही, असे डॉ. देवळाणकर यांनी स्पष्ट केले आहे.

‘सीईटी’ परीक्षेत असे असतील गुण (शैक्षणिक वर्ष २०२३-२४) :

अभ्यासक्रम : एकूण गुण

विधी तीन वर्ष : १५०

विधी पाच वर्ष : १५०

बी.एड. : १००

एम. एड. : १००

बी.ए-बी.एड./बी.एस्सी-बी.एड. : १०० (प्रत्येकी)

बी.एड-एम.एड (एकात्मिक) : १००

अधिक माहितीसाठी : https://cetcell.mahacet.org/