
School Admission : पसंतीच्या शाळांसाठी पालकांची धावपळ
अकोला : विद्यार्थ्यांची परीक्षा आटोपली असली तरी प्रथमच शाळा प्रवेश घेणाऱ्या पाल्यांच्या पालकांची खरी परीक्षा सुरू झाली आहे. पसंतीच्या शाळांसाठी पालकांची धावपळ सुरू असून, ठराविक शाळांमध्येच प्रवेश मिळावा म्हणून पालकांनी धावाधाव सुरू केली आहे. इंग्रजी माध्यमाच्या शाळांनाच पसंती दिली जात असून, त्यातही सीबीएससीच्या शाळांना पालकांचे अधिक प्राधान्य असल्याचे दिसून येत आहे.
अकोल्यातील शाळा उन्हाळी सुटीनंतर ३० जूनपासून सुरू होणार आहेत. त्यापूर्वी विविध वर्गातील प्रवेशप्रक्रिया सुरू झाली आहे. आरटीई अंतर्गत २५ टक्के प्रवेशाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. यात ज्यांना प्रवेश मिळाले नाहीत, ते आता लाखोंचे डोनेश भरून पसंतीच्या शाळांसाठी धावपळ करताना दिसून येत आहे.
गेले दोन महिन्यांपासून प्रवेशासाठी पालकांची भटकंती सुरू असून, अनेकांना पसंतीच्या शाळा मिळाल्या नसल्याने त्यांचा हिरमोड होताना दिसत आहे. सध्या शहरातील बहूतांश खासगी सीबीएसई इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये प्रवेश अर्जांची विक्री बंद झाली आहे. राज्य मंडळाच्या खासगी इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये प्रवेश प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे.
त्यामुळे पालक आपल्या पसंतीच्या शाळांमध्ये पाल्याला प्रवेश मिळविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. सीबीएसई व काही प्रमुख राज्य मंडळाच्या खासगी शाळांमध्ये फेब्रुवारीतच प्रवेश प्रक्रिया आटोपली आहे. राज्य मंडळाच्या शाळांमध्ये एप्रिल ते मे महिन्यात प्रवेशाची प्रक्रिया असली तरी अनेक शाळांच्या बाहेर प्रवेश बंदच्या पाट्या मार्चमध्येच लागल्या आहेत.
वाढत्या स्पर्धेने सीबीएसईला पसंती
व्यावसायीक अभ्याक्रम व उच्च शिक्षणासाठीचा विचार करून आतापासूनच पाल्यांना स्पर्धात्मक शिक्षणासाठी तयार करण्याच्या दृष्टीने पालक सीबीएसईच्या शाळांना पसंती देत आहेत. राज्य मंडळाच्या शाळा इंग्रजी माध्यमाच्या असल्या तरी पालकांना सीबीएसई शाळेतच त्यांच्या पाल्यांना प्रवेश हवा असतो. परिणामी शहरातील सीबीएसई शाळांमध्ये प्रवेशासाठी गर्दी होताना दिसत आहे.
डोनेशमुळे अनेकांचा हिरमोड
सीबीएसई व काही राज्य मंडळाच्या शाळांनी प्रवेशासाठी लाखोंचे डोनेशन घेणे सुरू केले असल्याची माहिती आहे. त्यामुळे लाखो रुपये डोनेशन देवून प्रवेश घेण्याची क्षमता नसलेल्या पालकांना त्यांच्या पाल्यास पसंतीच्या शाळांमध्ये प्रवेश देता आला नाही. अनेकांची डोनेशन देण्याची तयारी असूनही पसंतीच्या शाळांमधील प्रवेश आधीच पूर्ण झाले असल्याने हिरमोड झाला आहे.