
दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांचे परीक्षांचे शुल्क पालिका भरणार
पुणे - महापालिकेच्या (Municipal) शिक्षण विभागाच्या शाळांतील (School) इयत्ता दहावी (SSC) आणि बारावीच्या परीक्षेला (HSC Exam) बसणाऱ्या विद्यार्थ्यांचे (Students) परीक्षा शुल्क (Exam Fee) राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडे भरण्यास स्थायी समितीने दिली.
महापालिकेच्या शिक्षण विभागातील ४४ माध्यमिक शाळांमधून चार हजार ३९२ विद्यार्थी यावर्षी दहावीच्या परीक्षेला बसणार आहेत. त्यांचे प्रती विद्यार्थी ४१५ रुपये आणि तंत्रशाळेतील २०० विद्यार्थ्यांचे प्रती ५२५ रुपये परीक्षा शुल्क भरण्यास स्थायी समितीने मान्यता दिल्याची माहिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी पत्रकार परिषदेत दिली. महापालिकेच्या शिक्षण विभागातील पाच कनिष्ठ महाविद्यालयातील ४४९ विद्यार्थी बारावीच्या परीक्षेला बसणार आहेत. वाणिज्य शाखा ४३० रुपये आणि विज्ञान शाखेसाठी प्रती ४९० रुपये परीक्षा शुल्क भरण्यास मान्यता देण्यात आली आहे.
कात्रज येथील संतोषनगर आणि आंबेगावातील पोतदार शाळेसमोर जलवाहिनी क्रॉसिंग करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे परवाना १३ लाख ३० हजार रुपयांचे शुल्क आणि अनामत रक्कम भरण्यास स्थायी समितीने मान्यता दिली. या निर्णयामुळे कात्रज, आंबेगाव परिसरातील पाणीपुरवठ्याचा प्रश्न सोडविण्यास मदत होणार आहे, असे रासने यांनी सांगितले.