
Teacher Recruitment : शिक्षक भरतीसाठी उमेदवारांकडून स्व प्रमाणपत्र पूर्ण करण्यासाठी ६ ऑक्टोबरपर्यंत मुदत
पुणे : शिक्षक अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी २०२२ नुसार शिक्षक भरतीसाठी उमेदवारांकडून स्व-प्रमाणपत्र नोंदणीसाठी ३० सप्टेंबरपर्यंत मुदत दिली होती. त्यानुसार नोंदणी पूर्ण केलेल्या उमेदवारांना स्व प्रमाणपत्र पूर्ण करण्यासाठी येत्या शुक्रवारपर्यंत (ता.६) मुदत देण्यात आली आहे.
शिक्षक भरतीसाठी उमेदवारांनी नव्याने स्व प्रमाणपत्र नोंदणी केली आहे. शिक्षणाधिकाऱ्यांकडून आवश्यक ती कार्यवाही पूर्ण करून दिलेल्या मुदतीत नोंदणी पूर्ण केलेल्या उमेदवारांनाच ६ ऑक्टोबरपर्यंत स्व प्रमाणपत्र पूर्ण करता येणार आहे, असे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.
तर, ‘‘प्रशासनाने वारंवार मुदत वाढ न देता शिक्षक भरतीच्या प्रक्रियेचा पुढील टप्पा लवकरात लवकर सुरू करावा. गेल्या एक महिन्यापासून मुदतवाढ दिली जात आहे. अभियोग्यताधारकांमध्ये सरकारविरोधात असंतोष पसरत असून आता लवकर जाहिरात काढून शिक्षक भरतीची पुढील प्रक्रिया राबविण्यात यावी,’’ अशी मागणी डीटीएड बीएड स्टुडन्ट असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष संतोष मगर यांनी केली आहे.