"प्री-प्रायमरी'त ऍडमिशन करताय?... मग हे वाचाच! 

pri-primary education
pri-primary education

नगर ः घरात मूल जन्माला आलं, की संपूर्ण परिवार आनंदात न्हाऊन निघतो. मूल वर्ष-दोन वर्षांचं झालं, की त्याच्या शिक्षणाची तयारी सुरू होते. मेट्रो सिटीत तर वर्षांनंतर लगेच ऍडमिशनसाठी शाळा धुंडाळायला सुरवात केली जाते. अमक्‍या शाळेत तमके शिकवले जाते, तमक्‍या शाळेत या फॅसिलिटी आहेत... याही पलीकडे जाऊन, "पॅटर्न' कुठला निवडायचा? स्टेट बोर्ड, की सीबीएसई? या चक्रव्यूहात अडकलेल्या पालकांना भाषेचा पेच पडतो तो तिसराच. मातृभाषेतून शिक्षण घेतलेलं चांगलं, की इंग्रजी माध्यमाला पर्याय नाही?...

याचा सल्ला आणि त्याचा ऍडव्हाईस... यामध्ये संबंधित पालक पुरता गांगरून जातो. आणि ज्या शाळेत प्रवेश घ्यायला नाही पाहिजे, तिथं ऍडमिशन घेऊन बसतो. त्यामुळे बऱ्याचदा, ही शाळा चांगली नाही म्हणून तेथून काढ, या "पॅटर्न'ला तो चालत नाही म्हणून दुसरीकडे घाल... अशा गोष्टी होतात आणि त्यातून मुलांचे संपूर्ण आयुष्य नासून जाते. 

सरकार काय म्हणते? 
आपले माय-बाप सरकार "प्री-प्रायमरी एज्युकेशन' मानायला तयार नाही. त्यामुळे खरे शिक्षण सुरू होते ते पहिलीपासून. अंगणवाड्या प्रत्येक गावात व शहरात आहेत; मात्र, मुलांनी तिकडं जाऊन खेळकूद करायचं. तिकडे त्यांना पोषणआहार दिला जातो, लसीकरण केलं जातं, असे नगरचे प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी रमाकांत काठमोरे सांगतात. 

खरंच "प्री-प्रायमरी'ची गरज आहे? 
अलीकडे सामाजिक संरचना बदलली आहे. पूर्वीची एकत्रित कुटुंबपद्धती लोप पावते आहे. कुटुंबे छोटी झाल्याने अर्थातच मुलांची संख्याही कमी झाली आहे. घरात आजी-आजोबा नसतात. एकत्र कुटुंबात पूर्वी चुलत भाऊ-बहिणी असायच्या. शेजारच्या घरातही तीच स्थिती असायची. त्यांच्यासोबत खेळून आपोआप सामाजिक विकास व्हायचा. मात्र, विभक्त कुटुंबपद्धतीमुळे मूल घरात एकटं पडतं. एकलकोंडेपणामुळे अनेक प्रॉब्लेम निर्माण होतात. त्यामुळे त्याला "प्री-प्रायमरी' शिक्षण गरजेचे बनले आहे. 

"हे' असायला हवंच! 
पूर्वप्राथमिकसाठी प्रवेश घेताना किमान "या' गोष्टी पालकांनी पाहिल्याच पाहिजेत. तेथे शिक्षिका असाव्यात. कृतीतून, अनुभवातून शिक्षण दिले जाते का? खेळासाठी मैदान आहे का? शिक्षिकांनी "मॉंटेसरी' कोर्स केला आहे का? पॅटर्न कोणता आहे? मुलांची संख्या किती आहे? बंदिस्त फ्लॅट नको. 

वय किती असलं पाहिजे? 
"नर्सरी'साठी तीन वर्षे. 
"एलकेजी'साठी चार वर्षे. 
"यूकेजी'साठी पाच वर्षे. 
अंगणवाडीत तीन वर्षांनंतर प्रवेश दिला जातो. 

तज्ज्ञ काय म्हणतात?... 
"प्री-प्रायमरी' ही गरज बनली आहे. कृतीतून जिथं शिक्षण दिलं जातं, त्या शाळेत प्रवेश घेतला पाहिजे. ज्या शाळा केवळ "सिलॅबस' समोर ठेवतात, तिथे प्रवेश म्हणजे मुलांना केवळ "रोबोट' बनविल्यासारखे आहे. ऐकणे, बोलणे आणि वाचणे या प्रक्रिया आहेत. त्या टप्प्याटप्प्यानेच व्हायला हव्यात. केवळ शिस्तीच्या शाळा नसाव्यात. 
- संज्योत वैद्य, स्ट्रॉबेरी स्कूल

पंचेंद्रियांचा विकास व्हायला हवा 

सामाजिक बदलांमुळे "प्री-प्रायमरी' शिक्षणाची आवश्‍यकता आहे. मूल वयाच्या सातव्या वर्षापर्यंतच 70 टक्के शब्दसंग्रह करीत असते. त्या वयात अनुभवातून शिक्षण दिलं पाहिजे. परीक्षा तर घेतल्याच जाऊ नयेत. भाषेचा आग्रह तर धरूच नये. मुलांच्या पंचेंद्रियांचा विकास व्हायला हवा. मुलं ही रोपासारखी असतात. त्यांना हवं तसं वाढू दिलं पाहिजे. मैदानावर धडपडू द्यायला हवं. त्यांनी श्‍लोक म्हणावेत, कविता म्हणाव्यात. चांगले शिक्षक असतील तर ते सहा भाषा बोलू शकतात. 
- संजय मालपाणी, शिक्षणतज्ज्ञ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com