वेध भवितव्याचा : फार्मसीतील रोजगाराच्या संधी

कोरोना काळात आरोग्यसेवा क्षेत्रावर प्रचंड ताण पडला, औषधांना अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आणि जगभरात आरोग्यसेवेवर सर्वांचे लक्ष केंद्रित झाले.
Employment in Pharmacy
Employment in PharmacySakal
Summary

कोरोना काळात आरोग्यसेवा क्षेत्रावर प्रचंड ताण पडला, औषधांना अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आणि जगभरात आरोग्यसेवेवर सर्वांचे लक्ष केंद्रित झाले.

कोरोना काळात आरोग्यसेवा क्षेत्रावर प्रचंड ताण पडला, औषधांना अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आणि जगभरात आरोग्यसेवेवर सर्वांचे लक्ष केंद्रित झाले. ही कठीण परिस्थिती हाताळणारे डॉक्टर्स, परिचारिका, साहाय्यक कर्मचारी यांच्या कार्याचे कौतुक करावे तेवढे कमी. मात्र याचबरोबर आरोग्यसेवेशी निगडित अनेक घटक काम करत होते. त्यातील एक महत्त्वाचा घटक म्हणजे फार्मासिस्ट. कोरोना पश्‍चात औषधनिर्माण क्षेत्राचे अनन्यसाधारण महत्त्व सर्वसामान्य जनतेला देखील लक्षात आले आहे.

तज्ज्ञ डॉक्टरांनी निदान केल्यानंतर उपचारासाठी औषधांची गरज असते. एखाद्या औषधाने आपण बरे झालो की ते औषध गुणकारी आहे, असे आपण म्हणतो. मात्र त्यामागे अनेक वर्षांचे संशोधन, विकास, परीक्षण, विश्‍लेषण लोकांपर्यंत आणण्याची व्यवस्था यांचा समावेश असतो. म्हणूनच फार्मसी क्षेत्राची व्याप्ती मोठी असून अनेक करिअर आणि रोजगारांच्या संधी यामुळे निर्माण होतात. या औषधांचा रुग्णांना बरे करण्यात किंवा जीवनदान देण्यात मोठा वाटा असतो. त्यामुळेच जगभरात असलेल्या व नव्याने उद्‍भवणाऱ्या रोगांवर सतत संशोधन करून औषधनिर्माण करणे ही एक निरंतर प्रक्रिया असते. या प्रक्रियेमुळे करिअरचे अनेक दरवाजे विद्यार्थ्यांसाठी खुले होतात. फार्मसी क्षेत्रामध्ये आपले कौशल्य विकसित करण्यासाठी अनेक अभ्यासक्रम उपलब्ध आहेत.त्यामध्ये बॅचलर ऑफ फार्मसी (बी.फार्म), मास्टर ऑफ फार्मसी (एम. फार्म), डॉक्टर ऑफ फार्मसी (फार्म. डी), पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन रेग्युलेटरी अफेअर्स (पीजीडीआरए), पीएचडी इन फार्मसी, अशा अनेक अभ्यासक्रमांचा समावेश असतो.

बॅचलर ऑफ फार्मसी (बी.फार्म)

फार्मसी क्षेत्रात जाऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा बारावीनंतर विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी सर्वांत लोकप्रिय अभ्यासक्रमांपैकी एक आहे. यामध्ये फार्मास्युटिकल फॉम्युलेशन्स, औषध रसायनशास्त्र, फार्माकोलॉजी, फार्मास्युटिकल इंजिनिअरिंग, पॅथोफिजिओलॉजी, मायक्रोबायोलॉजी, फार्माकोलॉजी, हर्बल औषधे, सौंदर्य प्रसाधने इत्यादी विषय शिकविले जातात. क्रेडीट सिस्टिमवर आधारित हा चार वर्षांचा अभ्यासक्रम असून यानंतर विद्यार्थ्यांना अनेक खासगी व सरकारी संस्थांमध्ये संधी मिळू शकतात.

मास्टर ऑफ फार्मसी (एम. फार्म)

एम.फार्म हा बी.फार्म नंतर दोन वर्षे असणारा संशोधनावर आधारित अभ्यासक्रम आहे. संशोधनाचा विषय हा फार्मास्युटिकल इंडस्ट्रीमधील तज्ज्ञ आणि रिसर्च गाईडच्या सल्ल्याने विद्यार्थी निवडू शकतात. नॅनो टेक्नोलॉजी, मॉलिक्युलर फार्मास्युटिक्स, क्लिनिकल रिसर्च, फार्मा इकॉनॉमिक्स असे अनेक नवीन आणि आव्हानात्मक विषय विद्यार्थी निवडू शकतात.

पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन रेग्युलेटरी अफेअर्स

रेग्युलेटरी अफेअर्स हे आरोग्यसेवा उद्योगातील सर्वांत महत्त्वाच्या घटकांपैकी एक आहे. या क्षेत्रात कार्यरत असणारे तज्ज्ञ हे नवीन औषधे, उपकरणे इत्यादींच्या विकासाशी निगडित देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय नियमांबाबत सल्ला व साहाय्य देतात. या क्षेत्रातील तज्ज्ञांना जागतिक पातळीवरच्या नियामक प्रक्रियांचे सखोल माहिती व ज्ञान असणे गरजेचे आहे. या अपेक्षांची पूर्तता करण्याच्या दिशेने हा अभ्यासक्रम महत्त्वाचा आहे. हा अभ्यासक्रम ११ महिन्यांचा असून हा वीकएंड किंवा पार्ट टाइम कोर्स असून या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या व्यावसायिकांसाठी व पदवी आणि पदव्युत्तर विद्यार्थांसाठी योग्य आहे.

फार्म-डी

हा बारावीनंतर सहा वर्षांचा अभ्यासक्रम असून पाच वर्षे महाविद्यालयीन शिक्षण आणि एक वर्ष रुग्णालयात प्रशिक्षण अशी याची रचना आहे. यामध्ये फार्माकोथेरपियुटिक्स, हॉस्पिटल फार्मसी, फार्माकोएपिडेमियॉलॉजी अँड फार्माकॉइकॉनॉमिक्स इत्यादी विषयांवर लक्ष केंद्रित केले जाते.

पीएच. डी. इन फार्मसी

एम फार्मनंतर आपला संशोधनाचा विषय निवडून ३ ते ४ वर्षे या कालावधीत पीएचडी पूर्ण करता येते. फार्मसी केल्यानंतर फार्मासिस्ट किंवा रिटेल क्षेत्रातील संधी, प्रॉडक्ट मॅनेजमेंट, मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह, महाविद्यालयात अध्यापन अशा अनेक संधी निर्माण होतात. पदवी व पदव्युत्तर विद्यार्थ्यांना कंपन्यांमध्ये उत्पादन, क्वालिटी अ‍ॅनालिसिस, बौद्धिक संपदा, क्लिनिकल चाचण्या, संशोधन, न्युट्रास्युटिकल्स इत्यादी क्षेत्रात मागणी वाढतच आहे. ही मागणी शासकीय तसेच खासगी क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर दिसून येते.

संशोधन, सेवा, संवाद कौशल्य, चिकित्सक वृत्ती, संशोधनामध्ये संयम, जिद्द हे गुण असल्यास या क्षेत्रात चांगली प्रगती होऊ शकते. ज्यांना व्यवसाय करायचा आहे ते पदवी घेतल्यानंतर फार्मसी, प्रयोगशाळा, औषधविषयक चाचण्यांचे युनिट, औषधनिर्माण याचा परवाना काढून आपला व्यवसाय सुरू करू शकतात. इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजी सारखेच भारताने औषध क्षेत्रात देखील मोठी प्रगती केली असून जागतिक पातळीवर आपला ठसा उमटविला आहे. औषधनिर्माणशास्त्र म्हणजेच फार्मसी हा रुग्णसेवेचाच महत्त्वाचा घटक आहे,म्हणून आपण विकसित केलेल्या किंवा लोकांपर्यंत पोचविलेल्या औषधांमुळे होणारे सकारात्मक बदल हे आपल्याला समाधान देऊन जातात. या क्षेत्राला युवापिढी आणि नवोद्योजकांची गरज आहे.

(लेखक - एमआयटीडब्ल्यूपीयूमध्ये प्र-कुलगुरू आहेत)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com