esakal | वेळापत्रक स्वयंशिस्तीचे
sakal

बोलून बातमी शोधा

School Close
वेळापत्रक स्वयंशिस्तीचे

वेळापत्रक स्वयंशिस्तीचे

sakal_logo
By
डॉ. समीर दलवाई

शाळेत जाणे ही परंपरा आहे. फक्त मुलांनाच नाही तर पालकांनाही त्याची पूर्वतयारी करावी लागते. कोरोना काळात लागलेला ब्रेक हा चांगला नाही. त्यामुळे पालकही जास्त तणावात होते. कधी काय होईल याबाबतची खात्री नसल्याने प्रत्येकात बदल झाला आहे. आणि आपल्यापेक्षा जास्त आपली मुले बदलली आहेत. मुलांच्या वर्तनाचे निरीक्षण केल्यास आताची परिस्थिती आपण सर्वांनीच खूप नाजूकपणे हाताळली पाहिजे.

४ ऑक्टोबरपासून शाळा सुरू झाल्या आहेत. पहिले सहा महिने म्हणजेच शैक्षणिक वर्ष एप्रिल २०२२ हे आपल्याला खूप नाजुकपणाने हाताळले पाहिजे. मुलं रात्री उशिरापर्यंत जागायला लागली आहेत. उशिरा झोपतात. मग ब्रश करायला अर्धा तास. अंघोळ करायला एक तास, असा वेळ घेतात. त्यामुळे त्यांच्यासाठी एक नवीन वेळापत्रक बनवलं पाहिजे. रात्री कितीही वाजता तो झोपला तरी सकाळी एका निश्चित वेळी उठायची सवय त्याला लावायला हवी.

कोविडच्या आधी स्कूल बस यायच्या १५ मिनिटं आधी पालक त्यांना उठवायचे आणि मग कसं तरी तोंडात कोंबून भरवून बसमध्ये बसवायचे. त्यामुळे मुलं व्यवस्थित शौचाला जात नव्हती. शाळेत झोपायचे, अशा कंप्लेंट्स यायच्या. आता स्कूल बस येण्याच्या एक तास आधी मुलांना उठवलं तर व्यवस्थित तयारी करता येईल. फ्रेश होऊन त्यांना शाळेत जाता येईल.

घरी आल्यावर मुलं हातातून मोबाईल खेचून घेऊ शकतात. कारण त्यांना मोबाईलचं व्यसन लागलं आहे. हे व्यसन कमी व्हायला थोडा वेळ लागेल, पण ते कमी करण्यासाठी वेळापत्रक मदत करेल. वेळापत्रक म्हणजे मुलाला काही गोष्टी करायला देऊ नये असं नाही. मुलांनी फक्त अभ्यासच केला पाहिजे असेही नाही. वेळापत्रकाचा खरा अर्थ म्हणजे मुलाला कोणती गोष्टी कधी करावी यासाठी स्वयंशिस्त लागली पाहिजे. वेळापत्रकानुसार त्याला त्याच्या गोष्टीचे व्यवस्थापन करता आले पाहिजे. त्याला स्क्रीन टामपेक्षा पालकांचा वेळ द्या.

आता लॉकडाऊनचे नियम शिथिल झाले आहेत. त्याला जास्तीत जास्त मैदानी खेळ खेळू दिले तर वाढलेले वजन कमी करण्यासाठी मदत होईल. त्याच्या सवयीनुसार जेवणाच्या वेळाही बदलल्या आहेत. त्यामुळे तो सकाळी खाईलच असे नाही. भूक लागेल तेव्हा खाईल. मुलांच्या सवयी बदलण्यासाठी वेळ लागणार आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे त्याचे जे वेळापत्रक बनवले असेल, त्यानुसार मुलं वागतात का, याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे लागेल. त्याचा दिवस कसा गेला यावर चर्चा करा, पण वेळापत्रक पाळले नसेल तर त्याला त्यासाठी ओरडू नका. त्याला समजावून सांगा. वेळापत्रक पाळण्यासाठी मदत करा. पालकांना सुट्ट्या असतील तेव्हा बराचसा वेळ त्यांनी मुलांसोबत घालवायला हवा.

पहिले काही दिवस मुलं शाळेत कशी वागतात याबाबत पालकांनी शिक्षकांकडून जाणून घेतले पाहिजे. बरीच मुलं शाळेत गेल्यावर हरवलेली, कंटाळलेली, झोपेत असलेली दिसतील. सुरुवातीपासूनच लगेचच अभ्यासक्रमाला सुरुवात करू नये. काही दिवस त्यांना एकमेकांशी भेटू देत, गप्पा मारू दे, मस्ती करू दे, त्यातून मुलांना शाळेची आवड निर्माण होईल. मोठी मुलं असतील त्यांना एका ठिकाणी बसून गप्पागोष्टी करायच्या असतील. लहान मुलांना पळापळीचा खेळ खेळायचा असेल. हे सर्व पहिले दोन आठवडे होऊ दे. मुलांना घरी राहून एक भावनिक आघात झाला आहे. त्यामुळे त्यांना शाळा हे एक मानसिक पुनर्वसनाचे केंद्रही बनले पाहिजे. त्याप्रमाणे आपण तयारी केली पाहिजे.

शिक्षकांनीसुद्धा आईसारखे वागले पाहिजे. शिक्षक हे चांगले मार्गदर्शक, सल्लागार असतात, तसेच त्यांनी मुलांशी वागले पाहिजे. त्यांना जे बोलायचे आहे ते त्यांना बोलू द्या, वाटेल तसे व्यक्त करू द्या. ते अभ्यास करत आहेत की नाही, याच्याव्यतिरिक्त ते हसत आहेत की नाही, आनंदात आहेत की नाही याकडे लक्ष द्या. एका आठवड्यानंतरही जी मुलं हसत नसतील किंवा आनंदात नसतील, अशा मुलांकडे विशेष लक्ष द्यायला हवे. त्यांच्याशी आपण बोलले पाहिजे. त्यांना विचारले पाहिजे. काही मुलांच्या घरी मारहाण झाली असेल, काही मुलांनी त्यांच्या आजी-आजोबांना गमावले असेल, काही मुलांनी त्यांच्या पालकांना व्यसन करताना पाहिले असेल, या सर्व गोष्टींचा त्यांच्यावर परिणाम झालेला असू शकतो. काही मुलांना अगदी मजुरी करावी लागली आहे. या गोष्टींमुळे दोन आठवड्यांनंतरही जर मूल रमत नसेल तर त्याच्यावर लक्ष दिले पाहिजे. काही विशेष असक्षम मुलं असतात, त्यांच्याकडेही बारकाईने लक्ष दिले पाहिजे.

मुलांना शाळेत सोडून थोडी सुटका झाली असे वाटेल, पण त्याचबरोबर मुलांकडे आता अजिबात लक्ष द्यायचे नाही असे होता कामा नये. असे झाले तर फार मोठी चूक होईल. कारण हा लॉकडाऊन जेवढा पालकांना कठीण गेला आहे, त्यापेक्षा किती तरी पटीने जास्त तो मुलांनाही कठीण गेला आहे. पालकांना सुरुवातीचा काळ कठीण गेला होता. मुलांना मजा वाटत होती, की एक महिना सुट्टी मिळणार आहे वैगरे... पण नंतर पालकांना घरून काम करायची सवय झाली आणि मुलांना घरात राहणे अवघड वाटू लागले. त्यामुळे पुढील एप्रिल २०२२ पर्यंत मुलांना शाळेत जाणे आणि त्यांच्याशी जुळवून घेणे खूप कठीण जाणार आहे. पालकांनी आणि शिक्षकांनी असे जराही गृहीत धरू नये की पुढच्या सहा महिन्यांत मागील दोन वर्षांचा अभ्यासक्रम भरून निघेल. अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी जराही घाई करू नये; अन्यथा परिणाम उलटे होतील. कारण प्रत्येक मूल हे वेगळ्या प्रकारे शिकत असते. काही मुलांना शिक्षण विकार झाले असतील, काही मुलांना चष्म्याचा नंबर लागला असेल, हे आणि असे अनेक प्रकार आपल्याला माहीतही नसतील. मुलांनाही माहीत नसतील. प्रत्येक मुलाच्या घरी शिकण्याची पद्धत वेगळी होती. काही पालकांनी घरीच शाळा सुरू केली होती; तर काही मुलं शेतमजुरी करत होती. याप्रकारे प्रत्येक मुलाकडे वेगवेगळे लक्ष देणे जरुरी आहे.

samyrdalwai@gmail.com

(लेखक बालरोगतज्ज्ञ असून, मुलांच्या विकास आणि वर्तनाचे अभ्यासक आहेत.)

loading image
go to top