esakal | ‘अ’ ऑनलाइनचा : शिकायचे कसे हे शिकूया
sakal

बोलून बातमी शोधा

Learn

‘अ’ ऑनलाइनचा : शिकायचे कसे हे शिकूया

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

शाळा बंद असल्यातरी ‘जरा अभ्यास करा,’ असा शिक्षकांचा आणि घरी आई-बाबांचा घोषाही सुरू असेल नाही का? फक्त वाचायचे, लिहायचे म्हणजे अभ्यास का? पुस्तकातला पाठांतर करायच, परीक्षेची तयारी करायची म्हणजे अभ्यास का? सारखासारखा अभ्यास करा म्हणून उपदेश केला जातो ते नक्की काय? सगळेच जण अभ्यास करा सांगतात, परंतु म्हणजे नक्की कोणती कृती करू हे कोणीच सांगत नाही. अनेक वेळा अभ्यास करणे ही प्रक्रिया गृहित धरली जाते. नक्की काय करायचे, हे न कळल्याने मुलांचा अभ्यासाचा प्रयत्न मात्र मग दिशाहीन होऊन जातो. प्रत्येक जण आपल्याला पाहिजे त्या पद्धतीने स्वतःला विविध प्रकारे मग्न ठेवत असतो. शिक्षक सांगतील ते, मित्रमंडळी ठरवतील ते, मनाला वाटेल ते असे सर्व प्रकार सुरू होतात.

अभ्यासात स्वतःहून केलेली कृती महत्त्वाची असते. अभ्यासासाठी दुसऱ्या कोणीतरी श्रम घेऊन चालत नाहीत. म्हणजे तुझा अभ्यास मी करतो, असे होत नाही. आपला अभ्यास आपल्यालाच करावा लागतो. त्यामुळे कोणतीही व्यक्ती ज्ञान मिळवण्यासाठी स्वतःहून धडपडत असते कारण वैयक्तिक बौद्धिक विकास हा शेवटी प्रत्येक व्यक्तीवर अवलंबून असतो. या प्रक्रियेत शिक्षक हा केवळ त्याला मार्गदर्शन करणारा दिशादर्शक असतो. म्हणूनच अभ्यासाची पद्धती, तंत्रे, प्रक्रिया जाणून घेणे गरजेचे.

शिकवून झाल्यानंतर प्रत्येकाला ती माहिती लक्षात ठेवण्यासाठी, त्याचा योग्य वापर करता यावा यासाठी तो पक्का करावा लागतो. तो आत्मसात करावा लागतो. जेणे करून प्राप्त माहितीचा आणि ज्ञानाचा वापर तो कधीही आणि कोठेही करता येईल. तसेच, प्राप्त ज्ञानाचा उपयोग करून आपले वर्तमान आणि भविष्य उज्ज्वल करता येईल. अभ्यासू वृत्ती ही नैसर्गिक असेलही परंतु प्रत्येकाने स्वतःला प्रशिक्षित करण ही तितकेच महत्त्वाचे आहे. आता अभ्यास ही एक जाणीवपूर्वक केलेली क्रिया म्हणून तिचा विचार केला पाहिजे.

अभ्यासाच्या कोणत्या सवयी आपण स्वतःला लावतो, कोणती पद्धती वापरतो हे समजून घेतले पाहिजे. शिवाय अशी अभ्यासाची दिशा योग्यवेळीच मिळाली तर त्याचा फायदा हा वेळ, श्रम वाचवण्यासाठी होईल. अभ्यासासंदर्भात अनेक प्रश्न विद्यार्थी म्हणून पडत असतात. अभ्यास कसा करावा? अभ्यास मित्रांबरोबर करावा की एकट्यानेच? अभ्यासाची जागा कशी निवडावी? अभ्यासाचे वेळापत्रक कसे बनवावे? शिकण्याची प्रक्रिया नक्की कशी असते आणि असली पाहिजे? या सर्वांविषयी बोलणं, स्पष्टीकरण मिळवणे आवश्यक आहे.

परीक्षा आहे म्हणून आपण अभ्यास करतो. परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी अभ्यास करण्याची गरज वाटते. परंतु मग हे अभ्यास करण्यामागचे एक संकुचित कारण झाले. या जीवनात यशस्वीरीत्या जगण्यासाठी आवश्यक असलेली कौशल्य आणि माहिती मिळवणे गरजेचे आहे. जीवन सुसह्य आनंददायी होण्यासाठी आवश्यकता असलेले ज्ञान मिळवलेच पाहिजे. म्हणून अभ्यास. म्हणूनच केवळ परीक्षेतील यशासाठी आवश्यक आहे म्हणून अभ्यास हा विचार बदलला पाहिजे. त्यामुळे त्यामागील खरी भूमिका, स्वरूप, त्यातील टप्पे समजून घेणे अगत्याचे होईल.

- डॉ. उमेश दे. प्रधान

loading image
go to top