‘अ’ ऑनलाइनचा : अभ्यासाची जागा

शाळेतून किंवा ऑनलाइन शिकून झाल्यानंतर स्वयंअध्ययनासाठी, गृहपाठासाठी अभ्यास करावाच लागतो. अभ्यासाला आवश्यक असते पोषक असे वातावरण आणि परिसर.
Study
StudySakal

शाळेतून किंवा ऑनलाइन शिकून झाल्यानंतर स्वयंअध्ययनासाठी, गृहपाठासाठी अभ्यास करावाच लागतो. अभ्यासाला आवश्यक असते पोषक असे वातावरण आणि परिसर. सभोवतालची परिस्थितीही आपल्या अभ्यासावर परिणाम करत असते. म्हणूनच अभ्यासाची जागा ही अभ्यासपूरक असणे गरजेचे आहे. कोठेही कसेही बसून अभ्यास होइल का?

अभ्यासाच्या जागेचा विचार करायला हवा चांगला अभ्यास होण्यासाठी. घरात आपल्याला अभ्यासाची वेगळी स्वतंत्र खोली आहे का, अगदीच नाहीतर एखादा आपला असा अभ्यासाचा कोपरा आहे का, तशी जागेची निवड करणे आवश्यक आहे.

आपल्याच घरात कधी टेबलावर तर कधी गादीवर लोळत, तर कधी सोफ्यावर पाय ताणून अशी आपली अभ्यासाची जागा सतत बदलती असल्यास त्याचा परिणाम अभ्यासावर झाल्याशिवाय राहत नाही. अभ्यासाच्या आवश्यक एकाग्रतेवर परिणाम होतो नाहीतर सततच्या जागा बदलाने आपले लक्ष विचलित होते. अभ्यासाचे सर्व साहित्य परत परत हलवावे लागते ते वेगळेच.

आपण अभ्यासाला बसायचे ठरवले आहे, ती जागा किमान स्वच्छ असणे गरजेचे आहे. वस्तूंच्या गराड्यात लक्ष केंद्रित करणे अवघड होते. अभ्यासासाठी आवश्यक असणाऱ्याच वस्तू जवळ असाव्यात. इतर वस्तू त्यांना ठरवून दिलेल्या जागीच ठेवल्या जाव्यात. पाठ्यपुस्तके, शब्दकोश, पट्टी, पेन्सिल, पेन, रबर सर्व वस्तू पाहिजे तेव्हा लगेच उपलब्ध व्हायला हव्यात त्यासाठी शोधा शोध करावी लागू नये. अन्यथा बराच वेळ वस्तू शोधण्यातच खर्च व्हायचा. जपानी लोकांच्या प्रगतीचे एक कारण म्हणजे त्यांच्यामध्ये असणारा व्यवस्थितपणा.

अभ्यास व्यवस्थित व्हावा यासाठी टापटीपपणा हे कौशल्य उपयुक्त होऊ शकते. याचाच अर्थ वस्तूंच्या वापरांमधील नीटनेटकेपणा. पाठ्यपुस्तकाला, वह्यांना, फाइल्सना, क्रमांक द्यावा. प्रत्येक वस्तू ही जागच्या जागीच असायला हवी. एखादी वस्तू वापरात नसल्यास ती दूर ठेवणे, काढून टाकणे आवश्यकच आहे. आपल्या टेबलाचा कप्पा अनेक नको त्या वस्तूंनी भरलेले असतो. त्यातून आपल्याला आवश्यक असणारी वस्तू शोधण्यातच वेळ घालवला जातो. जेवढे वापरायचे तेवढेच नजरेसमोर असावे.

अभ्यासाचे वेळापत्रक तयार केले जावे. ती लावण्याची जागा नक्की करावी. जेणे करून आपले लक्ष परत परत त्या वेळापत्रकावर जाईल. त्या पद्धतीने आपला अभ्यास चाललाय का, हे तपासून पाहता येतील. वेळापत्रकाची जागा बदलती असू नये. वेळापत्रक दिसेल अशा जागी लावले नाही तर ते विसरूनही जाण्याची शक्यता.

अभ्यासाच्या जागेतील प्रकाशाची सोय याकडेही लक्ष द्यायला पाहिजे. कमी उजेडात राहून आपण वाचत आहोत किंवा ज्या कागदावर लिहीत आहोत त्यावर पुरेसा उजेड पडलेला असणे आवश्यक आहे. अनेक वेळा आपलीच सावली कागदावर पडते त्याचा आपल्याला त्रास होत असतो परंतु आपण तसेच सुरू ठेवतो, त्यामुळे अभ्यासावर आणि शरीरावर अनिष्ट परिणाम होतो. त्याची आपल्याला जाणीवही नसते. शक्यतो उजेड आल्हाददायक असावा. रंगीत, जास्त प्रकाशझोत टाकणारा नसावा. तो डोळ्यावर पडणारा नसावा. दिवसा अभ्यासाच्या जागी नैसर्गिक उजेड असेल याची खबरदारी घ्यावी.

अभ्यासाच्या जागेची रंगसंगती भडक नसावी. शांत असा गुलाबी, निळा किंवा पांढरा रंग असावा. जेणे करून आपले चित्त विचलित होणार नाही आपले लक्ष, ध्यान अभ्यासापासून परावृत्त होईल असे वातावरण असून चालणार नाही. अभ्यासाची जागा महत्त्वाची आहेच, परंतु अभ्यास डोक्यात हवा.

- डॉ. उमेश दे. प्रधान

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com