करिअर अपडेट : बिझनेस पर्यटन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Business Tourism

भारत प्राचीन काळातही व्यापारासाठी प्रसिद्ध होता. भारतातून प्रामुख्याने मसाल्याचे पदार्थ जगभरात पाठवले जातात. त्याकाळात सिल्क रूट हा व्यापारी मार्ग जगभरात प्रसिद्ध होता.

करिअर अपडेट : बिझनेस पर्यटन

- डॉ. वंदना जोशी

भारत प्राचीन काळातही व्यापारासाठी प्रसिद्ध होता. भारतातून प्रामुख्याने मसाल्याचे पदार्थ जगभरात पाठवले जातात. त्याकाळात सिल्क रूट हा व्यापारी मार्ग जगभरात प्रसिद्ध होता. हा मार्ग युरोप व आशिया खंडांना जोडला होता. याच व्यापारी व्यावसायिक किंवा देवाणघेवाणासाठी केलेल्या प्रवासाचे सध्याचे स्वरूप म्हणजे ‘बिझनेस पर्यटन’ होय. या पर्यटनाला जगभरात एम.आय.सी.ई. (MICE) पर्यटन (एम (मीटिंग), आय (इन्सेन्टिव्ह), सी (कॉन्फरन्स), इ (एक्झिबिशन)) म्हणून ओळखले जाते.

हे पर्यटन एकाच उद्देशासाठी अनेक लोकांना एकत्र येऊन आयोजित केले जाते. या पर्यटनामधील प्रवास हा ज्ञान, तंत्रज्ञान यांची देवाण- घेवाण किंवा प्रसार याचबरोबर व्यावसायिक करार, बैठक, प्रदर्शन इ. स्वरूपातील प्रवास होय. या पर्यटनामध्ये विविध क्षेत्रातील कर्मचारी मुख्यत्वे माहिती व तंत्रज्ञान कंपन्या, ऑटोमोबाईल, आरोग्य क्षेत्र, उत्पादन क्षेत्र, अभियांत्रिकी क्षेत्रातील कर्मचारी देश-विदेशातील शहरांना प्रशिक्षणासाठी, कार्यशाळेसाठी किंवा परिषदेसाठी भेट देतात. दिवसभर नोकरीशी संबंधित कामे करून संध्याकाळी किंवा आपल्या सोयीनुसार पर्यटक शहरातील आणि परिसरातील पर्यटन स्थळांना भेटी देतात. हे पर्यटक हे इतर पर्यटकांपेक्षा १.४ टक्के अधिक खर्च करतात.

पर्यटनाचे प्रकार

एम (मीटिंग) - सभा, संमेलन किंवा बैठक यात विशिष्ट विषयाची माहिती किंवा प्रसारासाठी केलेले आयोजन व त्यासाठीचा प्रवास होय. यामध्ये अनेक व्यक्ती सहभागी होतात.

आय (इन्सेन्टिव्ह) - यात सहभागींना त्याच्या मागील सर्वोकृष्ट कामगिरीबद्दल पुरस्कृत केले जाते. कर्मचाऱ्यांना पुढील वर्षांमध्ये अधिक चांगले काम करण्यास प्रोत्साहित करण्यासाठी देश-विदेशातील सुंदर पर्यटनस्थळी नेले जाते.

सी (कॉन्फरन्स) - यात परिषद किंवा अधिवेशनामध्ये चर्चासत्र, समस्या सोडवणे, संशोधन, सल्ला मसलत, सादरीकरण, कार्यशाळा, माहिती देवाण- घेवाणासाठीच्या प्रवासाचा तसेच सामाजिक विषयाशी निगडित परिषदांचा समावेश आहे.

ई (एक्झिबिशन) - नवीन उत्पादने व सेवा, माहिती व विक्रीसाठी प्रदर्शित केल्या जातात. विशिष्ट क्षेत्राशी निगडित हजारो लोक प्रदर्शनाला भेट देतात.

या सर्व बिझनेस पर्यटनामध्ये पर्यटक त्यांच्या कंपनीसाठी प्रवास करतो. या प्रवासाची जबाबदारी कंपनी घेते. हा प्रवास खूप आधी ठरलेला असतो किंवा कामाच्या गरजेनुसार कर्मचाऱ्याला तत्पर प्रवास करावा लागतो. या पर्यटनामध्ये कर्मचाऱ्यांसाठी उत्तम दर्जाच्या सोयी-सुविधांचा अंतर्भाव केला जात असल्यामुळे देशाच्या आर्थिक प्रगतीसाठी नवीन पर्याय म्हणून ओळखले जात आहे. पर्यटन अभ्यासक्रमात या पर्यटनाचा समावेश आहे. डिप्लोमा इन ट्रॅव्हल अँड टुरिझम किंवा पर्यटनाशी निगडित इतर कोणताही अभ्यासक्रम करून या क्षेत्रात काम करता येते. ट्रॅव्हल एजन्सी व्यतिरिक्त या क्षेत्रात कॉर्पोरेट ट्रान्स्पोर्ट ऑपरेटर, कॉर्पोरेट तिकिटींग, इन्सेन्टिव्ह प्लॅनर, इव्हेंट कॉर्डिनेटर, ग्रुप ॲक्टिव्हिटी प्लॅनर म्हणून काम करता येते.

आवश्यक कौशल्ये

  • नेतृत्व गुण व संभाषण

  • निगोसिएशन

  • संशोधन ग्राहकांबद्दलची अधिक माहिती

  • आय. टी. समस्या सोडविण्याचे ज्ञान

  • टीम वर्क

  • ॲबिलिटी टू वर्क टू डेडलाइन्स

  • सादरीकरण

Web Title: Dr Vandana Joshi Writes Career Update Business Tourism

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top