
Pune News : विद्यार्थ्यांच्या तक्रारी सोडविण्यासाठी ‘ई-समाधान’ पोर्टल कार्यन्वित
पुणे : देशभरातील उच्च शिक्षण संस्थांमधील विद्यार्थ्यांना रॅगिंग यासह विविध समस्या, शैक्षणिक-अशैक्षणिक समस्या, विद्यापीठ किंवा महाविद्यालयातील अन्य तक्रारी असतील, तर आता एक खिडकी पद्धतीने ‘ई-समाधान’ पोर्टलद्वारे सोडविल्या जाणार आहेत. विद्यापीठ अनुदान आयोगाने हे नवे पोर्टल कार्यान्वित केले आहे.
विद्यार्थ्यांच्या तक्रारी सोडविण्यासाठी यापूर्वी वापरली जाणारी तक्रार निवारण प्रणाली बंद करण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे. तसेच ‘ई-समाधान’ या नव्या पोर्टलद्वारे विद्यार्थ्यांच्या तक्रारीचे निवारण होणार असून प्रलंबित तक्रारीही सोडविल्या जाणार असल्याचे आयोगाने परिपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे
यापूर्वीची तक्रार निवारण प्रणालीचे संकेतस्थळ संवादात्मक होते. त्याद्वारे विद्यार्थ्यांना तक्रार दाखल केल्यानंतर पुढे झालेल्या कार्यवाहीची माहिती ऑनलाइनद्वारे मिळत होती. दाखल केलेली तक्रार उच्च शिक्षण संस्था, युजीसीचे प्रादेशिक कार्यालय आणि युजीसी मुख्यालय अशा तीन स्तरांत ठराविक मुदतीत सोडवली जात होती. आता या प्रणालीचा वापर थांबविण्यात आला असून ‘ई-समाधान’ हे नवे संकेतस्थळ सुरू करण्यात आले आहे.
हे संकेतस्थळ केंद्रीय पद्धतीने आणि एक खिडकी पद्धतीने काम करणार आहे. या संकेतस्थळाद्वारे तक्रारींची पुनरावृत्ती टाळता येणार आहे. या पोर्टलद्वारे विद्यार्थ्यांना त्यांचे विविध प्रश्न, समस्या यावर आवाज उठविता येणार आहे.
विद्यापीठ अनुदान आयोगामार्फत नव्याने सुरू केलेल्या पोर्टलची लिंक : https://samadhaan.ugc.ac.in/Home/Index