प्रेस वर्किंग व क्वालिटी कंट्रोलमधील रोजगार

फेरस आणि नॉन फेरस धातूंच्या पत्राकामाला शीट मेटल वर्क्स असे संबोधण्यात येते. हे पत्राकाम उत्पादन अभियांत्रिकीतील एक विशिष्ट व नियमित वापरण्यात येणारी प्रक्रिया आहे.
education news Rajesh Ohol writes Employment in Press Working and Quality Control
education news Rajesh Ohol writes Employment in Press Working and Quality Controlsakal

- राजेश ओहोळ

फेरस आणि नॉन फेरस धातूंच्या पत्राकामाला शीट मेटल वर्क्स असे संबोधण्यात येते. हे पत्राकाम उत्पादन अभियांत्रिकीतील एक विशिष्ट व नियमित वापरण्यात येणारी प्रक्रिया आहे. शीट मेटल वर्क्समार्फत निर्मित वस्तू किंवा सुटे भाग यांचा घरगुती सांधनांपासून ते ऑटोमोबाईल व अन्य अभियांत्रिकीतील यंत्रंणांमध्ये मोठ्या प्रमाणावर वापर होत आहे. शीट मेटल वर्क्स हे प्रेस मशिनवर केले जाते. त्यासाठी डायसेटचा वापर करण्यात येतो. अपेक्षित आकाराच्या वस्तूनूसार डाय सेटचे डिझाइन व डेव्हलपमेंट करावे लागते. डाय सेटमध्ये पंच व डाय हे दोन मुख्य कार्यकारी घटक असतात. बहुसंख्य औद्योगिक व बिनऔद्योगिक वस्तूंचे उत्पादन शीट मेटल वर्क्समार्फत होत असल्याने प्रेस वर्किंग उद्योग रोजगाराभिमुख ठरला आहे.

प्रेसवर होणाऱ्या प्रक्रिया

कटिंग आणि फॉर्मिंग या दोन मुख्य शीर्षकांखाली प्रेसवर करण्यात येणाऱ्या सर्व प्रक्रियांची वर्गवारी झालेली आहे. कटिंग प्रक्रियेत शीट मेटल त्याच्या उच्चतम शक्तीपेक्षा जास्त शक्तीवर ताणले जाऊन ते हव्या त्या आकारात शिअरिंग स्टेसेसने कापले जाते. फॉर्मिंगमध्ये मात्र शीट मेटल त्याच्या उच्चतम शक्तीच्या खाली ताणले जाते. त्यामुळे या प्रक्रियेत सीट मेटलचे कापणे न होता शीट मेटल हव्या त्या आकारात रूपांतरित होते. कटिंग आणि फॉर्मिंगच्या वेगवेगळ्या प्रक्रिया आहेत. कटिंग प्रक्रियेत ब्लँकिंग, पंचिंग, नॉचिंग, परफोरेटिंग, ट्रिमिंग, शेव्हिंग, स्लिटिंग आणि स्किजिंग या प्रक्रिया मोडतात. वरील सर्व कटिंग आणि फॉर्मिंग प्रक्रियांनुसार बहुतांश सर्व प्रकारचे शीट मेटल वर्क्स चालते.

कटिंग आणि फॉर्मिंग प्रक्रियांसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या प्रोसेस असतात. शक्ती स्रोत, रॅम चालविण्याची पद्धत, स्लाइडची संख्या, फ्रेमचा प्रकार ठरतो. प्रेस वर्किंग करणारे अनेकदा मोठे, मध्यम आणि लघु स्वरूपाचे उद्योग पहावयास मिळतात. प्रत्येक उद्योगाची स्वतःची शीट मेटल वर्क्समधील ठरावीक वैशिष्ट्यता दिसते. फेरस व नॉनफेरस मेटलचे प्रेस वर्किंग हे वैविध्यपूर्ण स्वरूपाचे काम आहे.

आयटीआय/एनसीव्हीटी प्रमाणपत्रधारक, अभियांत्रिकीच्या मेकॅनिकल, उत्पादन आणि औद्योगिक शाखांतील पदवी/पदविका उमेदवारांना प्रेस वर्किंगमधील रोजगार नेहमीच खुणावतो. डाय सेट डिझाइन आणि डेव्हलपमेंट हे काम अभियांत्रिकी ज्ञानाधिष्ठित असावे लागते. अंतिम अपेक्षित वस्तूंच्या रचनेनुसार डायसेट डिझाइन व डेव्हलमेंट काम अभियंत्यांची शास्त्रशुद्ध कल्पकता वाढविते.

क्वालिटी कंट्रोल

नवनवीन तंत्रज्ञानामुळे प्रत्येक ठिकाणी गुणवत्तेचा निकष अतिशय गांभीर्याने हाताळला जात आहे. सहाजिकच सर्व उद्योगांना स्पर्धेत टिकविण्यासाठी गुणवत्तेशी मैत्री करणे भाग पडले आहे. अभियांत्रिकी प्रक्रियेतून उत्पादित झालेल्या वस्तूची गुणवत्ता पडताळणी पद्धती व गुणवत्ता नियंत्रण साधणे ही उत्पादित वस्तूच्या अचुकतेनुसार निवडली जातात. अभियांत्रिकीतील उत्पादित वस्तूंचे मोजमाप शास्त्र म्हणजे मेट्रोलॉजी होय. उत्पादित झालेली अंतिम वस्तू ठरलेल्या मोजमापात मोडते की नाही याचा निर्णय गेजिंगमध्ये होतो. मोठ्या संख्येत उत्पादित झालेल्या वस्तूंची गुणवत्ता ठरविण्यासाठी गेजिंगचा वापर होतो. तेव्हा मेट्रोलॉजीमध्ये गेजिंग हे गुणवत्ता नियंत्रणाचे प्रमुख प्रभावी अस्त्रांपैकी एक समजले आहे.

अभियांत्रिकीच्या सुट्या घटकांची अथवा अंतिम असेम्बलीची गुणवत्ता उत्पादन करणाऱ्या मशिनच्या अचूकतेवर ठरते. यंत्र अभियांत्रिकीमध्ये उच्चतम अचूकता देणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या मशिनचा सातत्याने विकास होत आहे. उच्चतम अचूकता असणाऱ्या घटकांची, सुट्या भागांची अथवा अंतिम अॅसेम्बलीची गुणवत्ता नियंत्रण साधनेही अधिकाधिक संवेदनशील व तुल्यबळ अचूकतेची विकसित झालेली आहेत.

उच्च अचूकता निर्माण करणाऱ्या मशिनची अचूकता पडताळणी हेही काम विशेष बनले आहे. मशिनच्या अचूकतेचे मूल्यांकन वेळोवेळी करावे लागते. कारण कोणत्याही स्वरूपाचे उत्पादन बाद होऊ न देण्याचा प्रत्येक उद्योजक काळजी घेत असतो. अभियांत्रिकी वस्तूची एकसारख्या अचूकतेची जोपासना ही गुणवत्ता व्यवस्थापनात क्वॉलिटी इंजिनिअर अंतिम वस्तू, घटक किंवा अॅसेम्बली प्रमाणिक करतो. अभियांत्रिकीच्या सर्व छोटे मोठे उद्योग, कारखाने, प्रकल्प यामध्ये क्वॉलिटी इंजिनिअर हे पद हमखास पहावयास मिळते.

मेकॅनिकल, प्रॉडक्शन आणि इंडस्ट्रिअल इंजिनिअरिंग शाखांच्या पदवी अथवा पदविकाधारकांनी क्वॉलिटी इंजिनिअर म्हणून खासगी यंत्र अभियांत्रिकी उद्योग, कंपनी अथवा मोठ्या प्रकल्पांमध्ये नोकरी मिळविता येते. मेट्रोलॉजीमध्ये मोडणाऱ्या सर्व मोजमाप साधनांचे राष्ट्रीय प्राधिकृत प्रयोगशाळांकडून किंवा त्यांनी परवानगी दिलेल्या माध्यमांकडून कॅलिब्रेशन प्रक्रियेशी क्वॉलिटी इंजिनिअरिंगचा थेट संबंध येतो. कॅलिब्रेशन निष्णात इंजिनिअरिंग हा देखील गुणवत्ता व्यवस्थापन प्रणालीचा महत्त्वाचा घटक असतो. क्वॉलिटी इंजिनिअर म्हणून मिळविलेला अनुभव उमेदवाराला डिझाइन आणि उत्पादन यातील ताळमेळ कसा असतो हे शिकवतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com