
केंद्रीय विद्यापीठांची प्रवेश परीक्षा परीक्षार्थींची संख्या वाढल्यामुळे एक ते सहा जूनदरम्यानही पार पडेल असे राष्ट्रीय परीक्षा एजन्सीकडून (एनटीए) स्पष्ट करण्यात आले आहे.
CUET Exam : केंद्रीय विद्यापीठांची प्रवेश परीक्षा जून दरम्यान होण्याची शक्यता
पुणे - केंद्रीय विद्यापीठांमध्ये प्रवेशासाठी घेतली जाणारी सामाईक प्रवेश परीक्षा (सीयुईटी) २१ ते २८ मे यादरम्यान घेतली जाणार आहे. मात्र काही शहरांमध्ये परीक्षार्थींची संख्या वाढल्यामुळे आता ही परीक्षा एक ते सहा जूनदरम्यानही पार पडेल असे राष्ट्रीय परीक्षा एजन्सीकडून (एनटीए) स्पष्ट करण्यात आले आहे.
सीयुईटीसाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांचे परीक्षा केंद्र कोणत्या शहरात आहे, याची माहिती प्रसिध्द करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे काही शहरांमध्ये विद्यार्थी संख्या वाढल्याने परीक्षेचा कालावधीही वाढविण्यात आला आहे.
‘एनटीए’कडून देशभरात काही ठराविक शहरांमध्येच परीक्षा केंद्र निश्चित केली आहेत. त्यामुळे परीक्षेच्या काही दिवस आधीच विद्यार्थ्यांना संबंधित शहरात परीक्षेसाठी वेळेवर पोहचता यावे, या उद्देशाने एनटीएकडून सिटी इंटीमेशन स्लीप प्रसिध्द केली जाते. त्यामध्ये परीक्षेची तारखी, परीक्षेची वेळ, विषय आणि शहराचा उल्लेख असतो. विद्यार्थ्यांनी अर्ज भरतेवेळी दिलेल्या पर्यायांमधून संबंधित शहरांची निवड करण्याचा आल्याचे एनटीएकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
विद्यार्थ्यांची नाराजी...
विद्यार्थ्यांना त्यांनी निवडलेल्या पर्यायांमधून शहर मिळालेले नसल्याची तक्रार ट्वीटर वरून केली आहे. काही विद्यार्थ्यांना ९०० किलोमीटर लांबचे शहर देण्यात आले आहे. त्यामुळे परीक्षा केंद्रांवर पोहचताना विद्यार्थ्यांची दमछाक होणार आहे. आर्थिक भुर्दंडासाठी बराच वेळ प्रवासात घालवावा लागणार असल्याने विद्यार्थ्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे.