Scholarship Exam : पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतरिम निकाल जाहीर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Scholarship exam result declare

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे फेब्रुवारीमध्ये घेतलेल्या पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतरिम (तात्पुरता) निकाल जाहीर करण्यात आला आहे.

Scholarship Exam : पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतरिम निकाल जाहीर

पुणे - महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे फेब्रुवारीमध्ये घेतलेल्या पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतरिम (तात्पुरता) निकाल जाहीर करण्यात आला आहे. यात इयत्ता पाचवीची शिष्यवृत्ती परीक्षा  पाच लाख १४ हजार १३१ आणि आठीवीची परीक्षा तीन लाख ५६ हजार ३२ विद्यार्थ्यांनी दिली.

राज्यात परीक्षा परिषदेतर्फे १२ फेब्रुवारी २०२३ रोजी शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेत इयत्ता पाचवीसाठी पाच लाख ३२ हजार ८५७ विद्यार्थ्यांनी, तर आठवीच्या परीक्षेसाठी तीन लाख ६७ हजार ७९६ अशा एकूण नऊ लाख ६५३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. दरवर्षी परीक्षा झाल्यानंतर तीन-चार महिन्यांनंतर परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात येत असे. परंतु यंदा परीक्षा झाल्यानंतर सव्वा दोन महिन्यातच अंतरिम निकाल जाहीर करण्यात आला आहे.

गुणपडताळणी आणि माहितीत दुरूस्तीसाठी आलेले अर्ज निकाली काढल्यानंतर अंतिम निकाल आणि गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचे परीक्षा परिषदेच्या आयुक्त शैलजा दराडे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे सांगितले आहे. यावेळी परीक्षा परिषदेच्या वतीने पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्तीच्या निकालासह शासकीय विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा, आदिवासी विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा, विमुक्त जाती व भटक्या जमाती विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा यांचा अंतरिम निकाल शनिवारी सायंकाळी जाहीर करण्यात आला. शाळांना आपल्या विद्यार्थ्यांचा निकाल त्यांच्या लॉगिनमधून, तसेच पालकांना पाल्यांचा निकाल संकेतस्थळावर उपलब्ध करून दिला आहे, अशी माहिती दराडे यांनी दिली आहे.

शिष्यृवत्ती परीक्षेतील आकडेवारी -

पाचवीची शिष्यवृत्ती परीक्षा :

तपशील : राज्य : पुणे

नोंदविलेले परीक्षार्क्षी : ५,३२,८७६ : ५५,१२९

परीक्षा दिलेले विद्यार्थी : ५,१४,१३१ : ५३,०८९

गैरहजर विद्यार्थी : १८,७४५ : २,०४०

शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थी : १,१३,९३८ (२२.१६टक्के) : १५,७०४ (२९.५८टक्के)

आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा -

तपशील : राज्य : पुणे

नोंदविलेले परीक्षार्क्षी : ३,६७,८०२ : ३२,३९६

परीक्षा दिलेले विद्यार्थी : ३,५६,०३२ : ३१,२४४

गैरहजर विद्यार्थी : ११,७७० : १,१५२

शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थी : ५५,५५७ (१५.६०टक्के) : ७,१४० (२२.८५ टक्के)

- विद्यार्थ्यांच्या गुणपडताळणीसाठी संबधित शाळांच्या लॉगिनमध्ये ९ मेपर्यंत ऑनलाइन अर्ज उपलब्ध राहतील

- गुणांच्या पडताळणीसाठी प्रत्येक पेपरकरिता ५० रुपये शुल्क ऑनलाइनद्वारे भरावे लागणार

- गुणपडताळणीचा निर्णय संबंधित शाळेच्या लॉगिनमध्ये अर्ज आल्यानंतर ३० दिवसांत कळविण्यात येणार

- विद्यार्थ्यांचे नाव, आडनाव, वडिलांचे नाव, आईचे नाव, शहरी/ग्रामीण, अभ्यासक्रम आदी दुरूस्तीसाठी ९ मेपर्यंत शाळेच्या लॉगिनमध्ये अर्ज उपलब्ध असेल.

अधिक माहितीसाठी संकेतस्थळ -

- www.mscepune.in

- https://www.mscepuppss.in