
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणारी बारावीची परीक्षा मंगळवारपासून (ता. २१) सुरू होत आहे.
HSC Exam : परीक्षेपूर्वी अर्धा तास अगोदर विद्यार्थ्यांनी पोचणे आवश्यक
पुणे - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणारी बारावीची परीक्षा मंगळवारपासून (ता. २१) सुरू होत आहे. यंदा १४ लाख ५७ हजार २९३ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली आहे. गेल्या पाच वर्षाच्या तुलनेत यंदा विद्यार्थ्यांनी सर्वाधिक नोंदणी केल्याचे दिसून येते. विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या वेळेपूर्वी किमान अर्धा तास अगोदर परीक्षा केंद्रावर पोचणे आवश्यक असल्याचे राज्य मंडळाने स्पष्ट केले आहे.
राज्यातील दहा हजार ३८८ कनिष्ठ महाविद्यालयांमधून या विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली असून तीन हजार १९५ मुख्य केंद्रांवर परीक्षा होणार आहे. यात सात लाख ९२ हजार ७८० विद्यार्थी आणि सहा लाख ६४ हजार ४४१ विद्यार्थिनी आहेत. यंदा सहा हजार ५१६ दिव्यांग विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. तसेच ७२ तृतीयपंथी विद्यार्थी बारावीची परीक्षा देणार आहेत.
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित लक्षात घेता एकही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहू नये, म्हणून सोमवारपर्यंत (ता.२०) परीक्षेसाठी अर्ज स्वीकारण्यात आल्याची माहिती राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
परीक्षेपूर्वी दहा मिनिटे अगोदर प्रश्नपत्रिका वितरित करण्याची सुविधा फेब्रुवारी-मार्च २०२३ पासून रद्द केली आहे. दरम्यान पेपरच्या वेळेनंतर शेवटी दहा मिनिटे वाढवून दिले आहेत. बारावीच्या परीक्षेत ‘माहिती तंत्रज्ञान’ विषयाची परीक्षा ऑनलाइन पद्धतीने होणार असून या विषयासाठी एकूण एक लाख ६२ हजार २६३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. ही परीक्षा एक हजार ९२३ केंद्रावरून विद्यार्थी देणार आहेत. तसेच ‘सामान्यज्ञान’ विषयाची परीक्षा ऑनलाइन होत असून यासाठी एकूण दोन हजार ६८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून ४२ केंद्रांवरून ही परीक्षा होईल.
विद्यार्थ्यांचे समुपदेशन करण्यासाठी राज्य मंडळ स्तरावरून १० समुपदेशकांची नियुक्ती, तसेच विभागीय मंडळात नियंत्रण कक्ष कार्यरत करून हेल्पलाइन सुविधा उपलब्ध राज्य मंडळाने करून दिली आहे.
प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिकांचे होणार ट्रॅकिंग
परीक्षेसाठी नियुक्त केलेल्या सहाय्यक परिरक्षक (रनर) परीक्षा कालावधीत मुख्य परीक्षा केंद्रावर कार्यरत राहतील. तसेच त्यांनी परीरक्षण केंद्रावरून गोपनीय पाकिटे ताब्यात घेतल्यापासून ते परीक्षा केंद्रावर पोचेपर्यंत, वितरित करेपर्यंतचे मोबाईलमध्ये चित्रीकरण करायचे आहे. परीक्षा केंद्रावर प्रश्नपत्रिका पोचण्याकरिता आणि उत्तरपत्रिका आणण्याकरिता नेमलेल्या सहाय्यक परीरक्षक यांनी जीपीएस प्रणाली सुरू ठेवणे आवश्यक राहणार आहे, असेही गोसावी यांनी सांगितले.
गैरप्रकार टाळण्यासाठी उपाययोजना -
- गैरप्रकारांना टाळण्यासाठी राज्यात २७२ भरारी पथके कार्यान्वित
- जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली दक्षता समिती कार्यरत
- विभागीय मंडळामार्फत विशेष भरारी पथके स्थापन
- मंडळ सदस्य, शासकीय अधिकारी यांच्या आकस्मिक भेटी
'आउट ऑफ टर्न’ची सुविधा
मंडळाने दिलेल्या कालावधीत विद्यार्थी वैद्यकीय, अपरिहार्य कारणांमुळे प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी परीक्षा, प्रकल्प व तत्सम परीक्षा देऊ न शकल्यास अशा विद्यार्थ्यांची ही परीक्षा लेखी परीक्षेनंतर २३ ते २५ मार्च या कालावधीत आउट ऑफ टर्न’ने आयोजित केली आहे.
हेल्पलाइन दूरध्वनी क्रमांक
राज्य मंडळ स्तर : ०२०-२५७०५२७१ आणि ०२०-२५७०५२७२
विभागीय मंडळ (पुणे) : ०२०-२५५३६७८१, ७०३८७५२९७२ आणि ९४२३०४२६२७
शाखानिहाय नोंदणी झालेले विद्यार्थी :
शाखा : नोंदणी झालेले विद्यार्थी
विज्ञान : ६,६०,७८०
कला : ४,०४,७६१
वाणिज्य : ३,४५,५३२
व्यावसायिक अभ्यासक्रम : ४२,९५९
आयटीआय : ३,२६१
एकूण : १४,५७,२९३
बारावीच्या परीक्षेसाठी गेल्या सहा वर्षात नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांची संख्या :
परीक्षा वर्ष : नोंदणी केलेले विद्यार्थी
२०१८ : १४,१८,६४५
२०१९ : १४,२३,५०३
२०२० : १४,२०, ५७५
२०२१ : १३,१९,७५४
२०२२ : १४,४९,६६४
२०२३ : १४,५७,२९३