
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या बारावीची परीक्षा मंगळवारपासून सुरू झाली.
HSC Exam : बारावीच्या परीक्षेला मोठ्या उत्साहात सुरवात
पुणे - सकाळी नऊ वाजल्यापासूनच परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांसह पालकांची झालेली गर्दी...काही परीक्षा केंद्रावर करण्यात येणारे विद्यार्थ्यांचे औक्षण करून व गुलाबपुष्प देऊन दिलेल्या शुभेच्छा, पोलिसांचा कडक बंदोबस्त, परीक्षार्थींची होणारी तपासणी आणि शेवटच्या क्षणापर्यंत अभ्यासाची उजळणी करणारे विद्यार्थी...अन् पहिला पेपर संपल्यानंतर हुश्श करत आनंदाने बाहेर पडणारे विद्यार्थी अशा वातावरणात बारावीची बोर्डाची परीक्षा सुरू झाली.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या बारावीची परीक्षा मंगळवारपासून सुरू झाली. परीक्षेची सुरवात इंग्रजी विषयाच्या पेपरने झाली. राज्यात बारावीच्या परीक्षेसाठी १४ लाख ५७ हजार २९३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. तर पुणे विभागातून दोन लाख ४८ हजार ३७५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केल्याची माहिती राज्य मंडळाने दिली आहे. सकाळपासूनच परीक्षेला जाण्याची लगबग सुरू होती.
परीक्षा केंद्रावर पोचल्यावर आत प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांच्या रांगा लागल्या होत्या. काही कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये परीक्षार्थींचे औक्षण करून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. विद्यार्थी परीक्षा सुरू होण्यापूर्वी शेवटच्या क्षणापर्यंत अभ्यास करत असल्याचे चित्र पाहायला मिळाले. काहीशी धाकधूक अन् उत्साहाने आणि आत्मविश्वासाने राज्यातील लाखो विद्यार्थ्यांनी बारावीच्या परीक्षेचा पहिला पेपर मंगळवारी दिला. ‘पहिला पेपर चांगला, सोपा गेला’ असा अनुभवही काही विद्यार्थ्यांनी आवर्जून सांगितला. परीक्षेदरम्यान पहिल्याच इंग्रजीच्या पेपरमध्ये चुका झाल्याचे निदर्शनास आले.
परंतु प्रत्यक्ष परीक्षेदरम्यान, संबंधित प्रश्न सोडविताना ‘प्रश्नच दिलेला नाही, मग उत्तर काय लिहायचे’, ‘तर, प्रश्नाएवजी उत्तरच दिले आहे,’ अशा प्रश्नपत्रिकेतील चुका पाहून विद्यार्थ्यांचा मात्र चांगलाच गोंधळ उडाला. परीक्षा झाल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांनी पालकांना, किंवा आपल्या संबंधित शिक्षकांना याबाबत विचारणा केली. त्यानंतर इंग्रजीच्या पेपरमध्ये झालेल्या छपाईच्या चुका शिक्षक, पालक यांच्याही लक्षात आल्या.
तर, परीक्षा केंद्राबाहेर उन्हातान्हात पालक मुलांचा पेपर संपण्याच्या प्रतीक्षेत थांबल्याचे दिसून आले. ‘पेपर कसा असेल’, ‘पेपर नीट जाईल ना’ असा काहीसा ताण पालकांच्या चेहऱ्यावरून लपू शकला नाही. प्रत्येक परीक्षा केंद्रावर पोलिसांचा चोख बंदोबस्त असल्याचे दिसून आले.