upsc sanket bhondave ias book
upsc sanket bhondave ias book

IAS Success Story - स्पर्धा परीक्षेत अपयशानंतरही न खचता चालली 'आयएएसची पाऊलवाट'

प्रशासनात एक अधिकारी म्हणून आपला वेगळा ठसा उमटवलेल्या संकेत भोंडवे हे काही दिवसांपूर्वी पुण्यात आले होते. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांनी 13 पुरस्कार मिळवले आहेत. त्यांनी आएएसची पाऊलवाट हे पुस्तक लिहिलं असून त्याच्या आठव्या आवृत्तीच्या निमित्तानं मुलाखतीवेळी त्यांनी प्रवास उलगडला. 

प्रश्न  - पुस्तक लिहीण्यामागची तुमची भूमिका काय? एका अधिकाऱ्याचा लेखक म्हणून प्रवास कसा होता?
भोंडवे - केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (युपीएससी) प्राविण्य सूचीमध्ये 14 मे 2007 साली माझे नाव आले. तेव्हापासून एक प्रशासकीय अधिकारी म्हणून माझा प्रवास सुरू झाला. स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना माझ्या लक्षात आले की, मराठी भाषिक मुलांमध्ये परीक्षेविषयीची तळमळ आहे, कष्ट करण्याची क्षमता आहे. मात्र कुठेतरी मार्गदर्शनाचा अभाव दिसतो. पिंपरी-चिंचवडमध्ये लहानाचा मोठा झालेला आणि आयएएस पर्यंत पोचलेला कदाचित तेंव्हा मी एकटाच होतो. अर्थात माझ्या गावातीलही मी पहिलाच प्रशासकीय अधिकारी आहे. मराठीचा टक्का कमी का, हा विचार मी त्यावेळी केला. प्रशिक्षणाला जाण्यापूर्वी मी अनेक गावात फिरलो, विद्यार्थ्यांना भेटलो. यातूनच स्पर्धा परीक्षेबरोबरच आयुष्यातील प्रत्येक स्पर्धेसाठी मार्गदर्शन करणाऱ्या पुस्तकाची कल्पना समोर आली. माझ्या मावशीच्या मदतीने मी जमेल तसे पुस्तकासाठीचे लिखाण रेकॉर्ड करत गेलो. परीक्षेची तयारी करत असताना मी विद्यार्थांना शिकविले होते. त्यामुळे मुलांना स्पर्धा परीक्षेसाठी काय हवं, काय नको, याची कल्पना मनात पक्की होती. आपल्या विद्यार्थ्यांना परीक्षेचा मार्गदर्शनाबरोबरच वैयक्तिक आयुष्यात सभा धारिष्ट्य, तार्किक मांडणी आदींद्वारे व्यक्तिमत्त्व विकास व्हावा ही या मागची भूमिका आहे. आजवर या पुस्तकाच्या सात आवृत्त्या प्रसिद्ध आहेत. युपीएससीने वेळोवेळी अभ्यासक्रमात बदल केला आहे. त्यानुसार आवश्यक ते बदल यात करण्यात आले आहे.

प्रश्न -  हे पुस्तक नक्की कोणी वाचावे आणि का? पुस्तकातून वाचकाला काय मिळेल?
भोंडवे - शालेय विद्यार्थ्यांपासून ते आयएएसच्या मुलाखतीला जाणऱ्या उमेदवारापर्यंत सर्वांसाठी हे पुस्तक उपयोगी आहे. जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर, प्रत्येक भूमिकेतील व्यक्तीला यातून काहीना काही मार्ग मिळणार आहे. पुस्तक लिहिताना मी विद्यार्थीच होतो आणि आज नव्याने त्याची आवृत्ती लिहितानाही मी एक विद्यार्थीच म्हणून त्याकडे पाहिले. या पुस्तकात अधिकारी म्हणून मी फक्त एक धडा लिहील आहे. लिखाणाची भाषाही सर्वांना समजेल अशा लोकांच्या रोजच्या बोलण्याच्या भाषेत हे पुस्तक लिहिले आहे. वाचकाला या पुस्तकातून परिक्षे विषयी मार्गदर्शन तर मिळेलच त्याचबरोबर ‘फक्त आकाशालाच मर्यादा मानणारा दुर्दम्य आत्मविश्वास मिळेल. तुमचा मार्ग तुम्हीच गुंफता हा अपयशापासून ते यशापर्यंतचा प्रवास वाचकाला यातून मिळेल. कारण मी स्वतः अनेक स्पर्धा परीक्षांमध्ये नापास झालो होतो. त्यातून मिळालेल्या ठोकरांमधूनच पुढचा प्रवास झाला. खरं पाहिलं तर शैक्षणिक वाटचाल आणि स्पर्धा परिक्षा पूर्णतः वेगळे मूल्यमापन आहे. जिद्द, चिकाटी, मेहनत, आत्मविश्वासाबरोबरच त्या पलिकडे जाऊन प्रत्येक डोंगरापलीकडे उगवणाऱ्या सूर्याची अनुभूती या पुस्तकातून मिळेल. एक देशाप्रती विचार करणारा नागरिक घडविण्याची प्रक्रीया या माध्यमातून होईल.


प्रश्न  - स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना काही कारणाने मागे फिरायची वेळ येते. अशा वेळी त्याने काय करायला हवे?
भोंडवे - नोकरी करताना स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करास करावा यासंबंधीचा धडा पुस्तकात दिला आहे. स्पर्धा परिक्षेच्या तयारीला लागताना निदान स्वतःच्या पायावर भक्कम उभे राहता येईल, एवढा अनुभव असायला हवा. कारण जेंव्हा आपण अभ्यासाला लागतो तेंव्हा पूर्णपणे त्यात झोकून दिलेलं असते. स्पर्धा परिक्षा ही अटीतटीची परिक्षा आहे. दुर्दैवाने आपली निवड नाही झाली. तरी विद्यार्थ्यांकडे अभ्यासाच्या काळात आत्मसात केलेल्या कौशल्यांची शिदोरी असते. तार्किक विचार पद्धती, इंग्रजी बोलणे, व्यक्तीमत्त्व विकास अशी कौशल्ये विद्यार्थ्यांकडे असतात. माझा प्रवासातही मी काही परीक्षा नापास झालो. मी बीएस्सी नंतर एमसीए केले. इन्फोसिसला कामाला लागलो. तिथे ज्या दिवशी परमनंट झालो त्या दिवशी राजीनामा दिला. आणि अभ्यासाला लागलो. असं करताना तुमच्याकडे बॅकअप प्लॅन असायला हवा. मुख्यत्वे तुमच्याकडे नियोजन असालयाला हवे.

प्रश्न - तुमच्यातला विद्यार्थी कसा विकसित झाला आणि स्पर्धापरिक्षेकडे कल कसा निर्माण झाला?
भोंडवे - पिंपरी चिंचवडमध्ये खराळवाडीत माझा जन्म झाला. तिथेच हिंदुस्तान ॲटीबायोटीकच्या प्राथमिक शाळेत शिक्षण झाले. आम्ही मुळचे दावडी निमगांवच्या (राजगुरूनगर) शेतकरी कुटुंबातील वडील नगरपालिकेत रुजू झाले होते. कासारवाडीत चाळीच्या खोलीत आम्ही राहत. तेथेच माझे बालपण गेले. वडील अधिकारी असल्यामुळे त्यांना बघूनच प्रशासकीय सेवा आणि अधिकारी जवळून बघायला मिळाले. साधारणतः पुणेकर ज्या सार्वजनिक कार्यक्रमात भाग घेतो. त्यात मी भाग घेतला होता. त्या काळात व्यवस्थापन आणि व्यक्तिमत्त्व विकास झाला. आकुर्डीतच म्हाळसाकांत विद्यालयात माझे बारावीपर्यंत शिक्षण झाले. पुढे मी बीएस्सीचे शिक्षण करायच ठरलं. डी.वाय.पाटील महाविद्यालयात माझे शिक्षण झाले. त्याच काळात एनसीसी, सीसॅट केले. मी रांगोळीत प्रथम क्रमांक मिळवले. माझ्या आईमुळे मी रांगोळी शिकलो. कॉलेजच्या जीवनात माझा खरा व्यक्तिमत्त्व विकास झाला.

प्रश्न - प्रशासकीय अधिकारी बनण्यासाठी कोणते धडे उपयोगात आले? 
भोंडवे - स्पर्धा परिक्षेच्या संघर्षात आत्मविश्वास, मेहनत करण्याची तयारी, धरसोड वृत्ती टाळून ठेवलेली चिकाटी आणि जिद्द, या प्रवासात मला महत्त्वपूर्ण टप्प्यांवर मार्गदर्शन होत गेले. गुरुजन, आईवडील यांचे मार्गदर्शन आणि आशीर्वाद हे महत्त्वाचे ठरले. आपल्यापेक्षा अनुभवी असलेल्या आईवडिलांचे ऐकले पाहिजे. कारण त्याचे फायदे नंतर समोर येतात. आयुष्यात परीक्षेची तयारी करताना पूर्ण लक्ष केंद्रित केलं तर यश नक्की आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com