नैतिक मूल्यशिक्षणाचे धडे देणारी शाळा

Innovative-World-School
Innovative-World-School

इनोव्हेटिव्ह वर्ल्ड स्कूल, मोशी- चिखली
शालेय शिक्षण आणि आपले जीवन यांचा खूप जवळचा संबंध आहे. जीवनातून शिक्षण घडतं आणि शिक्षणाने जीवनाला आकार मिळतो. आधुनिक व पारंपरिक शिक्षण यांचा मेळ साधत असताना नैतिकतेचे धडे मुलांना देणे ही काळाची गरज आहे. शिक्षणामुळे व्यक्तीला योग्यता प्राप्त होते. म्हणूनच सुरुवातीपासूनच नैतिक मूल्ये मुलांमध्ये रुजविली पाहिजेत. याच उद्देशाने इनोव्हेटिव्ह वर्ल्ड स्कूल सुरू करण्यात आली. नैतिक मूल्ये प्रमाण मानून संपूर्ण शिक्षण शाळेमध्ये दिले जाते. याच शिक्षणपद्धतीबाबत शाळेच्या संचालिका कमला बिष्ट यांच्याशी प्रतिनिधी अमिता कारंजकर यांनी केलेली बातचीत.  

पुस्तकी शिक्षणाने विद्यार्थ्यांचा बौद्धिक विकास होईल, पण त्यांचा भावनिक व मानसिक विकास होण्यासाठी पुस्तकाबाहेरील शिक्षणचं गरजेचे आहे. मुलांना रोजगारक्षम बनविण्याबरोबरच संस्कारक्षम बनविणे हे येणाऱ्या शिक्षणसंस्थांपुढील सर्वात मोठे आव्हान आहे. हे आव्हान समर्थपणे पेलण्याचे धाडस इनोव्हेटिव्ह स्कूलच्या संचालिका कमला बिष्ट यांनी दाखविले. ‘‘पुस्तकी अभ्यासापेक्षा चारभिंतींपलीकडील अभ्यास मुलांना जास्त भावतो व लक्षातही राहतो. असे मला वाटते म्हणूनच इनोव्हेटिव्ह स्कूल व्हेजिटेबल मार्केट, फायरलेस कुकिंग, विविध ठिकाणांना भेटी, भारतीय सण, स्टोरी टेलिंग फेस्टिव्हल, कलर डे, आजी आजोबा डे, भातुकलीचा खेळ अशा कार्यशाळांचे आयोजन करते व मुलांना आपल्या परंपरेचे महत्त्व पटवून देते.’ असे त्या अभिमानाने सांगतात. त्यांचे बालपण लष्करी कुटुंबात गेल्याने शिस्त, अभ्यास, कामाचे नियोजन व संस्कार यांचे बालकडू लहानपणीच मिळाले.

अनेक नामवंत शाळांच्या उभारणीत त्यांचा मोलाचा वाटा आहे. त्यामुळे मुलांची मानसिकता, शिक्षणाचे महत्व, शिक्षण संस्थांची भुमिका व पालकांची जबाबदारी या सगळ्यांचा अतिशय सखोल अभ्यास गेली ३५ वर्ष त्या करीत आहेत. प्रत्येक मुलं हे वेगळे असते त्याच्या जडणघडणीला अनेक घटक कारणीभूत असतात. पालक आणि शाळा या दोन घटकांचा प्रामुख्याने मुलांवर प्रभाव असतो. आजीआजोबांच्या गोष्टींमधून मिळणारी नितीमूल्ये आता कमी होत आहेत. त्यामुळे मुलांना शाळेमधूनच या नितीमूल्यांचे धडे देणे काळाची गरज आहे. असे त्या मानतात. ‘‘आपल्या पूर्वजांचे यश हे त्यांच्या मुळातच आणि संस्कारातच दडलेले होते. आजकालच्या छोट्या कुटुंबपद्धतीमुळे एकत्रित कुटुंबपद्धतीतील आजी आजोबा, काका, मामा, भावंड ही मजा कुठेतरी लुप्त पावत चालली आहे. मुलांमध्ये एकटेपणा वाढत चालला आहे, त्याचबरोबर त्यांचं शेअरींगही कमी होत चालले आहे. आत्ताची लहान मुले बुद्धीने प्रचंड हुशार आहेत; पण त्यांच्यावर भावनिक संस्कार होणे गरजेचे आहे. तरच ती येणाऱ्या स्पर्धेला सक्षमपणे तोंड देऊ शकतील. अशा सर्व मानसिकतेचा अभ्यास या शाळेमार्फत केला जातो.’’ या शाळेत वर्गांची विभागणी विद्यार्थ्यांच्या बुद्धिमत्तेवर अवलंबून नसून ती नैतिक मूल्यांवर आधारीत आहे. त्यामुळे वर्गांना म्हणजेच तुकड्यांना अ, ब, क वर्ग नाव न देता एम्पथी (Empathy)- सहसहानुभूती, सिम्पथी (Sympathy)- सहानुभूती, फॉरगिवनेस (Forgiveness)- क्षमाशीलता, संवेदनशीलता अशा मूल्यांवर आधारीत ‘थीम बेस’ वर्ग आहेत, ज्यामुळे मुलांना त्या थीमचा अर्थ समजण्यास व तो आचरणात आणण्यास मदत होते. याच थीम वर आधारीत माहिती गोळा करून त्यावर वर्षातून दोन वेळा कार्यक्रम सादर केले जातात. आपण शिकत असलेल्या वर्गाच्या नावाचा अर्थ, त्याच्या आपल्या जीवनातील महत्त्व व तो कसा आत्मसात करायचा हे मुले शिकतात.

खरंतर उपदेश ऐकण्यापेक्षा समोरील व्यक्तीच्या आचरणातून मुले शिकतात. आई, वडील, शिक्षक, मुख्याध्यापक हे मुलांवर विविध मूल्यांचे संस्कार करतात. त्यांचे आचरण जर त्या मूल्यांप्रमाणे असेल तो संस्कार मुलांच्या मनावर खोल उमटतो. हेच या शाळेच्या माध्यमातून केले जाते. मुलांच्या मानसिकतेचा अभ्यास करून शाळेतील प्रत्येक शिक्षकांना प्रशिक्षणही दिले जाते. शिक्षक हा प्रत्येक विद्यार्थ्यांचा रोल मॉडेल असतो. मुले त्यांचे अनुकरण करत असतात. त्यामुळे मुलांबरोबरच शिक्षकांनाही कडक शिस्तीचे पालन करावेच लागते. या शाळेत आधुनिक तंत्रज्ञानाबरोबरच आपल्या पारंपरिक विद्येचाही समावेश केला असल्याने मुलांना त्यांची स्वत:ची ओळख होण्यास मदत होते. मग तो गोट्यांचा खेळ असो, लगोरी असो वा टिपरीपाणी किंवा विटी- दांडू.

आजी आजोबांच्या गोष्टी असो वा भातुकली या प्रत्येक खेळाची एक वेगळीच मज्जा आहे. काळाच्या ओघात हे खेळ लुप्त होत चालले आहेत. म्हणूनच येणाऱ्या पिढीला या खेळांचे महत्व काळावे यासाठी या खेळांनाही विशेष प्राधान्य देण्यात येणार आहे. 

रीमेडियल क्‍लासेस (उपचारात्मक पद्धती) 
सगळेच विद्यार्थी सगळ्याच विषयात निपुण नसतात, आजकालच्या मुलांना गणित, इंग्रजी, विज्ञान व एकूणच वागण्याबोलण्याच्या अनेक समस्या भेडसावतात व ती मुले इतरांच्या तुलनेत मागे पडतात. अशा मुलांसाठी उपचारात्मक पद्धतीचा अवलंब केला जातो. यांमध्ये विविध युक्‍त्या, गेम्स वापरून त्यांना विषयाचे आकलन करून देण्यास मदत केली जाते. या पद्धतीद्वारे मुलांच्या प्रत्येक समस्येवर मुळापासून उपचार केले जातात. त्यामुळे मुलांमध्ये आत्मविश्‍वास वाढण्यास मदत होते. पालक व विद्यार्थीही याबाबत समाधानी आहेत. 

दप्तराचे ओझे नाही 
लहान मुलांना दप्तरांच्या ओझ्यामुळे चालता येत नाही. दररोज वजन वाहून नेल्यामुळे हाडांचे, मणक्‍यांचे व पाठदुखीचे अनेक गंभीर आजार जडले आहेत. शाळेत दरदिवशी किमान पुस्तके व साहित्यांचा वापर करावा, अशी पालकांची मागणी आहे. हाच मुद्दा डोळ्यासमोर ठेवून शाळेने पूर्व प्राथमिक व प्राथमिक शिक्षणापर्यंत दप्तर बंधनकारक केले नाही. भलं मोठं दप्तराचं ओझं नसल्याने मुलांनाही ‘स्ट्रेस फ्री’ वातारणाचा आनंद घेता येतो. त्याचबरोबर शाळेतील अभ्यास शाळेतच पूर्ण होतो आणि घरच्या अभ्यासासाठी पेपर शीट दिले जातात. पाचवी पर्यंत दप्तर नसल्याने मुलांनाही मोकळ्या वातावरणात आल्यासारखे वाटते.        

अभ्यास व घटनांविषयक माहिती पुस्तिका (ॲनेकडॉटल रेकॉर्ड)
दिवसभरातील जास्तीत जास्त वेळ विद्यार्थी शाळेत घालवितात. बरेचदा शाळेत असणारा विद्यार्थी व घरी असलेले मुलं यात खूप फरक असतो. घरात व शाळेत घडणाऱ्या घटनांचा चांगला किंवा वाईट परिणाम मुलांवर होत असतो. मुलांची वागणूक त्याचं आचरण, बोलणे त्यांच्यातील मूल्ये, शाळेत घडलेल्या घटनेविषयी त्यांचे मत, त्यांचा अनुभव, एखादा प्रसंग व त्याकडे बघण्याचा त्यांचा भावनिक व व्यवहारिक दृष्टीकोन अशा घटनांचे जतन करून ठेवण्यासाठी प्रत्येक मुलाचे ‘ॲनेकडॉटल रेकॉर्ड’ ठेवले जाते. त्यांद्वारे प्रत्येक वर्षी त्याच्यात होणारे बदल, त्याच्या चांगल्या वाईट घटनांची नोंदही त्यात केली जाते. पालकांनाही ती पुस्तिका वाचायला दिली जाते. यांमुळे शालेय जीवनात मुलांच्या वर्तणुकीत होणाऱ्या बारीकसारीक बदलांची मांडणी त्यात केली जाते. यातूनच एक सक्षम व आदर्श विद्यार्थी घडण्यास मदत होते.

खेळातून शिक्षण 
मैदानी खेळातून मुलांचा सर्वांगीण विकास होत असतो. त्यांच्यातील लीडरशीप क्वालिटी ही खेळांमधूनच वाढत जाते. याच उद्देशाने इनोव्हेटिव्ह वर्ल्ड स्कूलने मुलांमध्ये खेळाची आवड निर्माण व्हावी व ती योग्यरीत्या जोपासली जावी म्हणून विविध ट्रेनिंग व स्पोटर्स कार्यशाळांचे आयोजन करते. मैदानी खेळांमुळे मुलांचा थेट मातीशी संपर्क येतो व भरपूर सूर्यप्रकाशामुळे त्यांची शारीरिक जडणघडणही चांगली होते. 

आधुनिकता व पारंपरिकता यांचा योग्य मेळ 
सध्याचे जग हे तंत्रज्ञानावर आधारीत आहे. सर्वत्र डिजिटलायझेशनचा वापर शिकविण्याच्या पद्धतीत केला जात आहे. जगभरात घडणाऱ्या घटनांची माहिती एका क्‍लीकवर उपलब्ध होते. अशातच शाळेचे विद्यार्थी भावी काळातील परीक्षेसाठी तयार असावेत म्हणूनच त्यांना प्रोजेक्‍टच्या माध्यमातून शिक्षण दिले जाते. ‘‘सीबीएसईचा अभ्यासक्रम अवघड आहे, असे अनेक पालकांचे मत आहे, पण हा अभ्यास अवघड नसून ॲक्‍टिव्हिटी बेस्ड आहे. त्यामुळे तो त्याच पद्धतीने शिकविला जातो. ज्यामुळे मुलांचा सर्वांगीण विकास होण्यास मदत होते. शाळेमध्ये रोबोटिक्‍स तंत्रज्ञानाचा अभ्यासही शिकविला जातो. आधुनिक शिक्षणाबरोबरच पारंपरिक विद्या व नैतिक मूल्यांचे शिक्षण ही काळाची गरज आहे ती ओळखून या शाळेमध्ये ते दिले जाते.’’

त्यामुळे पुढे शिक्षण संपल्यावर जेव्हा ते समाजात वावरू लागतात तेव्हा त्यांच्यापुढे ज्या परीक्षा येतात त्यात बऱ्याच वेळा ते कमी भावनिक तडजोड करण्यात ते कमी पडतात. त्यामुळेच विद्यार्थ्यांच्या बौद्धिक क्षमतेबरोबरच त्यांची भावनात्मक क्षमता, नैतिक क्षमता व आध्यात्मिक क्षमता वाढवणे अत्यंत आवश्‍यक आहे. मानवी जीवनात दिव्यता व पूर्णता आणणे हा शिक्षणाचा खरा उद्देश असला पाहिजे, असे शाळेच्या संचालिका कमला बिष्ट यांचे प्रामाणिक मत आहे.  टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू बनविण्याचे प्रशिक्षणही मुलांना दिले जाते. 

शाळेच्या प्रत्येक स्टेशनरी जसे, लिफाफा (Envelope) फोल्डर, फाईल हे वर्तमान पत्रापासून तयार केले जाते. त्यामुळे येणाऱ्या पाहुण्यांना त्याचे विशेष आकर्षण असते. 

  • विद्यार्थ्यांच्या शारीरिक विकासासाठी फुटबॉल, 
  • बास्केट बॉल, बॅडमिंटन, हॉर्स रायडिंग, रायफल शूटिंग, स्विमिंग.  
  • वादविवाद, प्रश्‍नमंजूषा, सामान्य ज्ञानावर 
  • आधारीत प्रोजेक्‍ट, निबंध लेखन, हस्ताक्षर स्पर्धा यांसारखे उपक्रम.  
  • विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी नृत्य,
  • नाटक, गायन, फाईन आर्ट, कला प्रदर्शन यांसारखे उपक्रम.
  • विद्यार्थ्यांमधील सामाजिक जाणीवांचा विकास
  • व्हावा, यासाठी सामाजिक स्वच्छता अभियान, वृक्षलागवडीबाबत जागरूकता यासारखे सामाजिक उपक्रम राबविण्यात येतात.

पालकांच्या नजरेतून
शाळेचा प्रत्येक दिवस नवीन असतो. खेळातून शिक्षण यांमुळे मुले आनंदी असतात. सकारात्मक वातावरणामुळे मुलांना शिक्षणाची गोडी लागते.
- सोनल परमार

असंख्य शाळांमधून योग्य शाळेची निवड करणे खरं तसं कठीण काम. आमच्या मुलीची ही तिसरी शाळा आहे. पण यावेळी आमचा निर्णय योग्य आहे की एका चांगल्या शाळेत मुलीचे भविष्य घडत आहे. ऍक्‍टीव्हीटी लर्निंगमुळे तिची चांगली प्रगती झाली आहे.
- प्रशांत गावडे

शाळेत जायला लागल्यापासून खुप सकारात्मक बदल मी माझ्या मुलामध्ये पाहीले. शाळेतील संपुर्ण स्टाफ खुप सहकार्य करणारा आहे.
- विजय सुतार

खरतरं मुलांना शाळा म्हटलं तर भीती वाटते, शाळेत जायचं नसते, पण इनोव्हेटीव्ह स्कुल मध्ये प्रवेश घेतल्यापासून शाळेला सुट्टी असेल तर माझी मुलगी नाराज होते. शाळा म्हणजेच तिचे घर आहे.
- किरण पाटील

इनोव्हेिटव्ह स्कूल मुलांसाठी शाळा नसून दुसरे घरंच आहे. जेथे, सगळे सण साजरे केले जातात व भारतीय संस्कृतीची ओळख मुलांना करून दिली जाते.
- रीटा सिंग

मोशी, चिखली परिसरात इनोव्हेटीव्ह स्कूल सारखी बौद्धीक शिक्षणाबरोबरच नैतिक शिक्षणाचे धडे देणारी शाळा आहे. ही चांगली बाब आहे. आम्हाला आम्ही या शाळेचा भाग आहोत याचा आनंद आहे.
- ज्ञानेश्‍वर घाडगे

नुकत्याच सुरू झालेल्या या शाळेला अल्पावधीतच खुप चांगला प्रतिसाद आहे. यांचे कारण मुलांमध्ये झालेला चांगला बदल आम्ही व इतर पालकांनी अनुभवला आहे.
- नुपूर सिन्हा

शाळेचे वातावरण, शिक्षकवर्ग, शाळेमांर्फत देण्यात येणाऱ्या सुविधा, शिकविण्याची पद्धत, पालकांशी संवाद यांमुळे आम्ही समाधानी आहोत.
- निवेदीता जुंगारे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com