
करिअर घडविताना : चार्टर्ड अकाउंटंट अंतिम परीक्षा
- के. रवींद्र
मागील लेखात आपण चार्टर्ड अकाउंटंट बनण्यासाठी लागणाऱ्या तीन टप्प्यांपैकी दोनची माहिती घेतली. चार्टर्ड अकाउंटंट फायनल परीक्षेचा आज आढावा घेऊया.
इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया (ICAI)द्वारे प्रमाणित व्यक्ती एखाद्या व्यक्तीसाठी किंवा संस्थेसाठी लेखा, लेखापरीक्षण, कर आकारणी आणि आर्थिक मूल्यांकनाच्या संबंधित बाबींची काळजी घेण्यासाठी पात्र आहे.
याचबरोबर चार्टर्ड अकाउंटन्सीमध्ये टॅक्स रिटर्न भरणे, आर्थिक स्टेटमेंट्स आणि व्यवसाय पद्धतींचे ऑडिट करणे, सरकारकडे व्यवसाय संस्थेची नोंदणी करणे, गुंतवणुकीचे रेकॉर्ड ठेवणे, आर्थिक अहवाल आणि कागदपत्रे तयार करणे आणि त्यांचे पुनरावलोकन करणे इत्यादींचा समावेश होतो. हा कोर्स पूर्ण केल्यानंतर तुम्ही ऑडिटिंग, कॉस्ट अकाउंटिंग, टॅक्स मॅनेजमेंट, मॅनेजमेंट अकाउंटिंग, कन्सल्टन्सी आणि फायनान्शिअल वर्क या उद्योगात जाऊ शकता. बारावीनंतर सीए अभ्यासक्रमाला सुमारे पाच वर्षे लागतात प्रयत्नांच्या संख्येनुसार कमी जास्त होऊ शकते.

सीए फायनलच्या परीक्षा वर्षातून दोनदा घेतल्या जातात -
एकदा मे मध्ये आणि नंतर नोव्हेंबरमध्ये.
परीक्षेचे माध्यम - इंग्रजी आणि हिंदी
परीक्षेचा कालावधी - प्रत्येक पेपरसाठी ३ तास
प्रश्नांचे प्रकार - वस्तुनिष्ठ, लघूत्तरी किंवा दीर्घोत्तरी
निगेटिव्ह मार्किंग - चुकीच्या उत्तरांसाठी निगेटिव्ह मार्किंग नाही
पात्रता - ICAIच्या फाउंडेशन कोर्ससाठी नोंदणी करून बारावीनंतर सीए कोर्स करता येतो. तसेच ज्यांनी वाणिज्य शाखेत किमान ५५ टक्के एकूण आणि इतर विषयांमध्ये एकूण ६० टक्के गुणांसह पदवी किंवा पदव्युत्तर पदवी पूर्ण केली आहे किंवा सीए इंटरमिजिएट अभ्यासक्रम उत्तीर्ण केला आहे त्यांच्यासाठी थेट प्रवेश मार्ग आहे.
अभ्यासक्रम - अंतिम अभ्यासक्रमाची दोन गटात विभागणी केली आहे. ः गट १ आणि गट २. गट १ मध्ये चार मूलभूत (कोअर) पेपर्स आहेत. आणि गट २ मध्ये ३ मूलभूत तर १ वैकल्पिक पेपर आहे. नोंदणी करताना विद्यार्थ्यांना वैकल्पिक पेपरची निवड करता येते. ग्रुप क्लिअर करण्यासाठी अर्जदारांना प्रत्येक विषयात किमान चाळीस टक्के गुण मिळणे बंधनकारक आहे. सीए फायनल परीक्षेच्या नवीन पॅटर्ननुसार एकूण किमान पन्नास टक्के गुण आवश्यक आहेत.
महत्त्वाच्या लिंक -
१) https://www.icai.org २) https://vidyarthimitra.org/news
(लेखक विद्यार्थी मित्र www.VidyarthiMitra.org चे संस्थापक आहेत.)