
‘अप्लाईड थिएटर’ म्हणजे ‘उपयोजित रंगभूमी’ या क्षेत्राचे महत्त्व सध्या जगभरामध्ये वाढत आहे. रंगभूमीच्या या प्रकारात मुख्य प्रवाहापेक्षा वेगळ्या पद्धतीने नाट्यपद्धती व सर्जनशीलता यांचा वापर करून वास्तव जीवनातील कथा सांगितल्या जातात. अशा पद्धतीचे प्रयोग शाळा, कारागृह, रस्ते इत्यादी अपारंपरिक वातावरणात केले जातात. भारतामध्ये विविध शैक्षणिक व व्यावसायिक प्रयोग करण्यासाठी, तसेच समाजातील विविध घटकांसाठी याचा विशेष उपयोग होऊ शकतो. येत्या काळात शिक्षण, सामाजिक काम व उद्योग या क्षेत्रामधील अप्लाईड थिएटर संबंधित रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणावर वाढणार आहेत.
शिक्षण फक्त माहिती पुरवण्यापुरते मर्यादित न राहता आयुष्यातील उपयोजिता हे शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करणारी ठळक बाब ठरत आहे. माणूस म्हणून एखाद्याची जडणघडण कशी होते यावरच शिक्षणाची योग्यता इथून पुढे ओळखली जाईल. परिवर्तनशील शिक्षण हाच मूलभूत शिक्षणाचा पाया आहे. ‘अप्लाईड थिएटर’च्या माध्यमातून हा वेगळा शिक्षणविचार प्रत्यक्षात अस्तित्वात आला आहे.
यासाठी ‘अप्लाईड थिएटर’....
१. थिएटर इन एज्युकेशन
शिक्षण या शब्दाचा वापर केल्यावर साधारणतः आपल्या पुढे येते पुस्तक किंवा सध्याच्या काळात स्क्रीन. शिक्षणाच्या प्रक्रियेत साधारण दोन गोष्टी महत्त्वाच्या ठरतात, त्या म्हणजे शिकवणे आणि शिकणे. मात्र, यात बहुतेक वेळा विद्यार्थ्यांना विषय समजला आहे की नाही, हे समजत नाही. परंतु नाटक हे अत्यंत प्रभावी दृकश्राव्य माध्यम आहे. विद्यार्थ्यांची स्मरणशक्ती अधिक दृश्यात्मक असते, त्यामुळे एखादा विषय नुसता वाचण्यापेक्षा त्याचे नाट्यरूपांतर केल्यास तो अधिक परिणामकारकरीत्या कळतो. ‘अप्लाईड थिएटर’मुळे विद्यार्थ्यांना संवाद, बोलण्यातील आत्मविश्वास, निर्णयक्षमता अशा विविध गुणांची ओळख होते.
२. थिएटर इन कम्युनिटी
अप्लाईड थिएटर म्हणजे नाटकातील विविध घटकांचा वापर लोकांना विविध गोष्टी शिकवण्यासाठी अथवा समस्यांची जाणीव करून देण्यासाठी करणे. ‘अप्लाईड थिएटर’चे विविध प्रकार उदा. प्रोसेस ड्रामा, इमेज थिएटर, रोल प्ले, फोरम थिएटर इत्यादींचा वापर करून कार्यशाळा पद्धतीने एखाद्या विषयाबद्दलची माहिती अथवा त्यामुळे निर्माण होणाऱ्या समस्यांची जाणीव करून दिली जाते. आज भारतातील कित्येक समाज घटकांपर्यंत आरोग्य, शिक्षण, पाणी, मानवी हक्क, पर्यावरण अशा महत्त्वाच्या विषयांबद्दल खूप गोष्टी पोहोचविण्याचा प्रयत्न अनेक शासकीय संस्था व निमशासकीय स्वयंसेवी संस्था करत आहेत. अप्लाईड थिएटरच्या माध्यमातून या गोष्टी अधिक रंजकपणे व जास्तीत जास्त घटकांपर्यंत पोहोचविणे शक्य होते. अप्लाईड थिएटर पद्धतीने विविध विषय परिणामकारकरीत्या उलगडून सांगता येतात व समाजात जागरूकता निर्माण होऊ शकते.
३. थिएटर इन कॉर्पोरेट
कॉर्पोरेट क्षेत्रात अप्लाईड थिएटर ही संकल्पना प्रचलित होत आहे. ट्रेनिंग व नोकरीसाठी आवश्यक असणारी कौशल्ये शिकवण्यासाठी अप्लाईड थिएटरचा वापर केला जातो. या पद्धतीमुळे कार्यक्षमता वाढणे, निर्णयक्षमता वाढणे, संघभावना वाढीस लागणे असे अनेक फायदे संस्थांना होतात. कॉर्पोरेट ट्रेनर म्हणून काम करणारे किंवा करू इच्छिणाऱ्यांना या पद्धतीचा खूप चांगला फायदा होऊ शकतो. ‘एटीआय फाउंडेशन’ व ‘एपीजी लर्निंग’तर्फे अप्लाईड थिएटरशी संबंधित एक पदविका अभ्यासक्रम चालवला जातो. तज्ज्ञ शिक्षक, सराव आधारित मॉड्युल्स, मास्टर क्लास, मेन्टॉरिंग, इंटर्नशिप आदींचा लाभ अभ्यासक्रमाद्वारे दिला जातो. यासाठी अभिनयाचा किंवा थिएटरचा अनुभव असण्याची अट नाही आणि कोणत्याही शाखेतील पदवीधर प्रवेश घेऊ शकतो. अभ्यासक्रमासंबंधी अधिक माहिती पुढील संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
https://www.apglearning.in/applied-theatre/
- कौस्तुभ बंकापुरे संचालक, अप्लाईड थिएटर इंडिया फाऊंडेशन
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.