पाच वर्षांपासून टीएआयटी जाहिरात नाही; तीन लाख ‘डीएड-बीएड’ धारक संतप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Teacher Recruitment 2023

राज्यभरातील सुमारे ६७ हजाराहून अधिक शिक्षकांची पदे रिक्त असून, दिवसेंदिवस शिक्षकांविना ओसाड पडणाऱ्या शाळांची संख्या वाढतच चालली आहे.

Teacher Recruitment 2023: 5 वर्षांपासून टीएआयटी जाहिरात नाही; 3 लाख ‘डीएड-बीएड’ धारक संतप्त

पुणे - राज्यभरातील सुमारे ६७ हजाराहून अधिक शिक्षकांची पदे रिक्त असून, दिवसेंदिवस शिक्षकांविना ओसाड पडणाऱ्या शाळांची संख्या वाढतच चालली आहे.

एकीकडे राज्यसरकार स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त ७५ हजारांच्या भरतीची घोषणा करत असून, दुसरीकडे मात्र शिक्षक भरतीसाठी आवश्यक अभियोग्यता चाचणीबद्दल (टीएआयटी) अजून कोणतीच हालचाल होताना दिसत नाही. तब्बल पाच वर्षांपासून रखडलेली ही अभियोग्यता चाचणी नक्की केंव्हा होणार, असा प्रश्न उमेदवारांनी उपस्थित केला आहे.

राज्यातील सर्व व्यवस्थापनांच्या शाळांमध्ये शिक्षकांची भरती करण्यासाठी ‘पवित्र पोर्टल’ विकसित करण्यात आले. या संगणकीय प्रणालीव्दारे भरती करण्याचा निर्णय राज्य शासनाने २०१७ मध्ये घेतला होता, त्यानुसार डिसेंबर २०१७ मध्ये टीएआयटी परीक्षा महापरीक्षा पोर्टलच्यावतीने ऑनलाइन घेण्यात आली होती.

त्यानंतर आज पाच वर्षे उलटली तरी परीक्षा घेण्यात आलेली नाही. राज्यातील तीन लाखाहून अधिक डीएड-बीएड धारक आणि ५४ हजार पात्र शिक्षक या अभियोग्यता चाचणीसाठी प्रतिक्षेत आहे. निदान स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षातील महा भरतीत तरी शिक्षकांची पदे भरली जातील, अशी अपेक्षा उमेदवारांनी व्यक्त केली आहे.

आतापर्यंत काय घडले?

- शालेय शिक्षण विभागाचे कक्ष अधिकाऱ्यांनी ३ ऑगस्ट २०२२ रोजी शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेचे आयोजन बाह्य यंत्रणेमार्फत करून घेण्यासाठी मान्यता दिली.

- विभागाने सदर परीक्षा घेण्यासाठी आयबीपीएस या संस्थेची निवड केल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्र्यांनी हिवाळी अधिवेशनात दिली.

- मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे स्वतःहून २२ सप्टेंबर आणि १३ ऑक्टोबर २०२२ रोजी टीएआयटी परीक्षा घेण्यासंदर्भात शासनाला आदेश दिले आहेत.

- सदर आदेशानुसार टीएआयटी परीक्षा घेणार असल्याचे सरकार सांगते. मात्र, या बद्दल अजूनही जाहिरात नाही.

शिक्षक पात्रता परीक्षेतील (टीईटी) पात्र उमेदवारांची आकडेवारी:

वर्ष - पेपर एक - पेपर दोन

२०१७ - ७४४५ - २९२८

२०१८ - ४०३० - ५६४७

२०१९ - १०४८७ - ६१०५

२०२१ - ९६७४ - ७६४८

एकूण - ३१,६४३ - २२३५५

टीईटीतील पात्र बोगस उमेदवार -

२०१८ - १६६३

२०१९ - ७८८०

अभियोग्यता चाचणी...

शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण (टीईटी) झाल्यानंतर घेण्यात येणारी दुसरी चाचणी म्हणजे ‘अभियोग्यता व बुद्धिमत्ता’ परीक्षा होय. या चाचणीतील गुणांच्या आधारे आता शिक्षक भरती केली जात आहे. भरतीसाठी पात्र ठरण्यासाठी उमेदवारांनी या दोन्ही परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.

मी केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा डिसेंबर २०१९ यावर्षी उत्तीर्ण केली आहे, तरी शासनाने मागील पाच वर्षांपासून अभियोग्यता परीक्षेचे आयोजन केले नाही. तीन वर्ष झालेत शिक्षकभरती परीक्षेची वाट बघत आहोत. आता तरी शासनाने परीक्षेची जाहिरात प्रसिद्ध करून आम्हाला न्याय द्यावा.

- मो. काजिम शेख, पात्र उमेदवार