खेलेगा इंडिया... : मार्ग उद्याचे ‘चॅम्पियन्स’ बनवण्याचे...

खेळाडू ‘तयार’ करण्यासाठी सर्वसमावेशक आणि दीर्घकालीन वापरता येणारा कार्यक्रम बनवणे कठीण असते. तो खूप लहान वयात सुरु झाला पाहिजे.
Champions
ChampionsSakal
Summary

खेळाडू ‘तयार’ करण्यासाठी सर्वसमावेशक आणि दीर्घकालीन वापरता येणारा कार्यक्रम बनवणे कठीण असते. तो खूप लहान वयात सुरु झाला पाहिजे.

- महेंद्र गोखले

खेळाडू ‘तयार’ करण्यासाठी सर्वसमावेशक आणि दीर्घकालीन वापरता येणारा कार्यक्रम बनवणे कठीण असते. तो खूप लहान वयात सुरु झाला पाहिजे. आजच्या लेखात आपण वय वर्षे ३ ते १४ या कालावधीचा विचार करूया. आजच्या लेखातली माहिती पालकांसाठी शिक्षकांसाठी आणि क्रीडा संस्थेच्या अधिकाऱ्यांसाठी फायदेशीर ठरू शकते.

अगदी लहान मुलांना कसे शिकवावे आणि त्यांच्या हालचालीचे तंत्र कसे विकसित करावे, हे माहीत असणारे क्रीडाप्रशिक्षक लहान मुलांना मिळावे यासाठी फार कमी प्रयत्न झाले आहेत. प्रशिक्षक अनेक वेळा जास्तीत जास्त स्पर्धा, खेळाडूचा अपूर्ण क्रीडा विकास आणि केवळ क्रीडा प्रकारासाठीची कौशल्य यावरच भर देतात. अनेक खेळाडूंना अतिश्रमामुळे किंवा अयोग्य प्रशिक्षणामुळे आणि वारंवार हालचालींच्या ताणामुळे दुखापत होते. 

ॲथलेटिझम विकासामधला दुरावा

अनेक दशकांपासून क्रीडा प्रशिक्षकांनी खेळाडू विकसित करण्यासाठी दीर्घकालीन धोरणाची गरज व्यक्त केली आहे. खेळाडूंचा विकास, वाढ आणि परिपक्वता याबद्दल खूप माहिती लिहिली गेली आहे. खेळाडूंचे पालक आणि प्रशिक्षक यांना वैज्ञानिक-आधारित संशोधनातून मिळालेली माहिती पुरवणे हे देखील शिक्षणाचे काम आहे. आजच्या काळात खेळाडूंना अनेक समस्या भेडसावत आहेत. खेळातील सहभाग हा व्यायामाची जीवनशैली आत्मसात करण्याचा एक मार्ग असू शकतो. अनेकदा, व्यक्तीला शिस्तबद्ध खेळांमध्ये सहभागी होण्याच्या अयशस्वी प्रयत्नांचा अनुभव येतो कारण यामध्ये स्पर्धा करण्यावर आणि जिंकण्यावर जास्त भर असतो. योग्य ॲथलेटिसिझम आणि योग्य शारीरिक कौशल्ये विकसित करण्यावर कमी लक्ष दिले जाते. त्यामुळे खेळ आणि शारीरिक हालचाल कौशल्ये कमी असलेल्या व्यक्ती सहसा सहभागी होणे थांबवतात. त्यानंतर एक बैठी जीवनशैली सुरू होते. या जीवनशैलीमुळे लठ्ठपणा, मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदय या समस्या निर्माण होतात.

दीर्घकालीन ॲथलेटिक विकास

शालेय क्रीडा कार्यक्रम आणि स्थानिक युवा क्रीडा कार्यक्रम यांनी दीर्घकालीन ॲथलेटिक विकास (LTAD करण्यासाठी दीर्घकालीन ॲथलेटिक विकास मॉडेलचा उपयोग करणे आवश्यक आहे. शारीरिक हालचालींची जाण, ॲथलेटिझम सुधारण्यासाठी योग्य प्रशिक्षण आणि क्रीडा कौशल्य विकास यांमध्ये दीर्घकालीन सातत्य राखणे उत्तम खेळाडू आणि त्यांच्या क्षमता निर्माण करण्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. खेळाडू ‘तयार’ करण्यासाठी योग्य प्रशिक्षण, वेळ आणि प्रक्रिया आवश्यक आहे. ॲथलेटिझम हा ॲथलेटिक हालचाली कौशल्य विकासाचा परिणाम आहे, ज्यामध्ये चपळता, संतुलन, समन्वय, लवचिकता, वेग, सामर्थ्य आणि सहनशक्ती या तंत्रांचा समावेश होतो.

क्रीडाप्रतिभेचा विकास

वैज्ञानिक संशोधनाने असा निष्कर्ष काढला आहे, की एका प्रतिभावान खेळाडूला उच्च स्तरावर पोहोचण्यासाठी ८ ते १२ वर्षांचे प्रशिक्षण गरजेचे असते. त्यासाठी दर्जेदार युवा प्रशिक्षकांची गरज आहे. ॲथलेटिक यशासाठी कोणतेही शॉर्टकट नाही. प्रशिक्षण, सराव, स्पर्धा आणि पुनर्प्राप्तीचे सुनियोजित आणि संतुलित वेळापत्रक खेळाडूच्या संपूर्ण क्रीडा कारकिर्दीत प्रगतीचा आलेख दाखवेल. ब‍ऱ्याचदा प्रशिक्षण मॉडेल्सच्या अंमलबजावणीमध्ये बदल करणे अवघड असते, पालकांचा दृष्टिकोन आणि सहभाग प्रतिसाद देत नाही, कारण त्यांना लवकर निकाल अपेक्षित असतात जे LTAD मॉडेलमध्ये शक्य नसते. जलद स्पेशलायझेशन ट्रेनिंग मॉडेलमुळे गळतीचे प्रमाण वाढते, अतिश्रमाच्या दुखापती होतात.

प्रशिक्षक प्रशिक्षणाचे महत्त्व

प्रशिक्षक प्रशिक्षण हा दीर्घकालीन ॲथलेटिक विकासाचा पाया आहे. एक सर्वसमावेशक कार्यक्रम आणि एक असा प्रशिक्षक ज्याला क्रीडा प्रशिक्षक आणि सामर्थ्य आणि कंडिशनिंग प्रशिक्षक या दोघांची कौशल्ये आणि ज्ञान याची माहिती आहे; तोच खेळाडूंची कामगिरी उंचावण्यासाठी महत्त्वाचा ठरू शकतो. योग्य तंत्र आणि कौशल्य विकास हे प्रशिक्षित आणि अनुभवी प्रशिक्षकांद्वारे शिकवले जाणे आवश्यक असते. तसेच, युवा प्रशिक्षकांना उच्च दर्जाचे शिक्षण देऊन प्रमाणित केले पाहिजे. भारतात खूप कमी खेळांसाठी प्रशिक्षक प्रमाणपत्र कार्यक्रम आहेत. खेळाडूंची क्रीडा कौशल्ये, प्रशिक्षण, सामर्थ्य, क्रीडा आहार यासाठी अभ्यासक्रम विकसित करणे आणि डेटा गोळा करणे ही काळाची गरज आहे.

(क्रमशः)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com