
कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी तुमचे ध्येय निश्चित करणे हेच महत्त्वाचे आहे, खेळही त्याला अपवाद नाही.
खेलेगा इंडिया... : खेळातील ध्येयही महत्त्वाचे
- महेंद्र गोखले
कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी तुमचे ध्येय निश्चित करणे हेच महत्त्वाचे आहे, खेळही त्याला अपवाद नाही. आजच्या लेखात आपण गोल सेटिंग (ध्येयनिश्चिती) ही संकल्पना म्हणजे काय आणि खेळाची उद्दिष्टे कशी ठरवायची ते पाहू.
मोजता येण्याजोगे ध्येय
क्रिकेटमध्ये गोलंदाजी किती टक्के सुधारली यासारखे सामान्य ध्येय निश्चित करणे सोपे आहे. परंतु विशिष्ट निकष किंवा निश्चित दिशा मिळाल्याशिवाय हे कसे करायचे हे ठरवणे कठीण असते. मोजता येऊ शकणारी उद्दिष्ट्ये विशिष्ट असतात. अशाप्रकारे, सामान्य उद्दिष्ट काय आहे हे ओळखता आले तर ते साध्य करण्याचे कोणते विशेष निकष असावेत हे ठरवता येते; असे निकष स्पष्ट दिसतात आणि मोजण्याजोगे असतात.
वेळेची मर्यादा
खेळाडूंना त्यांच्या गोलंदाजीमध्ये काही टक्के सुधारणा करण्यास सांगणे उपयोगी होणार नाही तर त्याला त्या सुधारण्यासाठी विशिष्ट कालावधी देणेही आवश्यक आहे.
मध्यम अवघड उद्दिष्टे
मध्यम अवघड उद्दिष्टे नेहमी अगदी सोप्या किंवा अतिशय अवघड उद्दिष्टांपेक्षा चांगली असतात. ती पूर्ण करण्यासाठी खेळाडूंना कठोर परिश्रम करण्यास आणि स्वतःला झोकून देण्यास प्रोत्साहित करतात. ती साध्य झाल्यावर समाधान मिळते.
उद्दिष्टे लिहा
उद्दिष्टे लिहिण्यासाठी डायरी किंवा मॉनिटरिंग चार्ट मदत करू शकतात. अपेक्षित परिणाम साध्यासाठी योग्य प्रक्रियेचा वापर करावा.
ध्येयनिश्चिती
ध्येय निश्चित करणे हे डोंगरावर चढण्यासारखे आहे. शेवटच्या शिखरावर पोहोचण्यासाठी वाटेत येणारी लहान शिखरे पार करावीत. त्यामुळे मुख्य ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी विशिष्ट योजना आखावी.
सराव करताना खेळाची नीति आणि त्याबद्दलचा दृष्टिकोन ध्येय निश्चितीसाठी आवश्यक आहे. सरावासाठी वेळेवर तयार होणे, उत्साहाने सराव करणे आणि प्रशिक्षकाकडे लक्ष देणे या महत्त्वाच्या गोष्टी आहेत. प्रशिक्षकांनी हे लक्षात ठेवले पाहिजे की खेळाडूंच्या व्यक्तिमत्त्वाची वैशिष्ट्ये ध्येय निश्चितीची परिणामकारकता ठरवू शकतात. खेळाडूच्या मते यश म्हणजे इतरांना पराभूत करणे असते तेव्हा त्या खेळाडूचे खेळाच्या परिणामांवर कमी नियंत्रण असते. अहंकार बाळगणारे खेळाडूंमध्ये अवास्तवपणे उच्च किंवा कमी उद्दिष्टे ठेवण्याची प्रवृत्ती असते जेणेकरून त्यांचे ध्येय साध्य न झाल्यास त्यांना त्याचे निमित्त मिळू शकते. केवळ खेळावर लक्ष केंद्रित करणारे खेळाडू त्यांची सर्वोत्तम कामगिरी करण्याबद्दल आणि त्यात सुधारणा करण्याबद्दलची ध्येये निश्चित करतात आणि त्यातून त्यांना वारंवार यशाचा अनुभव घेता येतो. असे खेळाडू दीर्घ काळ खेळ खेळत राहतात आणि अधिक आत्मविश्वासाने खेळतात. ध्येय-प्राप्तीची योजना आखा. ध्येय निश्चित करणे आणि आपली उद्दिष्टे पूर्ण करण्यात मदत करणारी रणनीती आखणे यामधील फरक समजून घेणे महत्त्वाचे आहे.
अॅथलिटच्या जीवनातील इतर महत्त्वाच्या व्यक्ती ध्येय साध्य करण्यात मदत करू शकतात. संघाच्या प्रशिक्षकाव्यतिरिक्त, यामध्ये इतर प्रशिक्षक, कुटुंब, मित्र, शिक्षक आणि सहकारी यांचा समावेश होतो. या व्यक्तींना तुम्ही स्वतःसाठी कोणत्या प्रकारची ध्येये ठेवत आहात आणि त्याच्या दिशेने प्रगती करण्यासाठी त्यांच्याकडून मिळणाऱ्या प्रोत्साहनाबद्दल त्यांच्याशी मोकळेपणाने बोला. त्यांना समजावून सांगा. सर्व वयोगटातील खेळाडूंना त्यांच्या संबंधित वयोगटांमध्ये यशस्वी होण्यासाठी ध्येय निश्चित करणे आवश्यक आहे.
Web Title: Mahendra Gokhale Writes Game Play Important
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..