
योग ही निरोगी राहण्याची कला असून हजारो वर्षांपूर्वी भारतात जन्मली आणि बहरली. त्यामुळे आरोग्याबद्दल जागरूकता निर्माण झाली आहे.
खेलेगा इंडिया... : योगासनाचे महत्त्व
- महेंद्र गोखले
योग ही निरोगी राहण्याची कला असून हजारो वर्षांपूर्वी भारतात जन्मली आणि बहरली. त्यामुळे आरोग्याबद्दल जागरूकता निर्माण झाली आहे. योग, प्राणायाम आणि ध्यानधारणा यांच्या एकत्रित सरावाने मन आणि शरीर यांच्यात संबंध निर्माण होऊन एकूणच आरोग्य सुधारते. योगाचे अनेक प्रकार प्राणायाम आणि ध्यान यांचे संयोगाने करत असल्याने श्वासोच्छ्वास नियंत्रित केला जातो. आपण प्राणायामाबद्दल बोलतो तेव्हा आपल्या प्राण-शक्तीच्या विस्ताराबद्दल असते. हे श्वासोच्छवासाचे तंत्र असून विशिष्ट परिणाम साधण्यासाठी श्वासाची लय जाणूनबुजून बदलली जाते. खूप अभ्यासानंतर, लोकांना त्यांच्या जीवनात योग, प्राणायाम आणि ध्यान यांचे महत्त्व पटू लागले आहे.
तणावाचे प्रभावी व्यवस्थापन
श्वासावर लक्ष केंद्रित करून योगाचा सराव करता तेव्हा ते तुमच्या शरीरातील तणाव आणि चिंता कमी करण्यास मदत करते. आपण प्राणायाम करतो, तेव्हा काही तणाव-संबंधित स्थिती जसे की उच्च रक्तदाब आणि इतर हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोग कमी होतात. जसजसे हे कमी होते, तसतसे तणावग्रस्त व्यक्तीची तणावाबद्दलची प्रतिक्रिया कमी होते. ध्यानधारणेच्या सरावाने पेशींना आराम मिळतो आणि तणाव कमी करण्यासाठी मदत होते.
वजनावर नियंत्रण
अष्टांग योगाच्या प्रकाराने तुमचे शरीर श्वासोच्छ्वासाच्या सिंक्रोनाइझेशनसह योगासनांच्या मालिकेतून जाते. तुमच्या कॅलरीज बर्न करण्यासाठीदेखील मदत करते. अनेकांना दिवसभर डेस्कटॉपसमोर बसावे लागते, यामुळे स्नायूंचे मास कमी होते, तुमचे स्नायू घट्ट होतात त्याचा परिणाम तुमच्या फिटनेसवर होतो. योगासनांमुळे स्नायूंची आणि सांध्यांची लवचिकता वाढते आणि त्यांना दीर्घकाळ तंदुरुस्त राहण्यास मदत करतात.
मानसिक आरोग्यासाठी उपयुक्त
योग, ध्यान आणि प्राणायामचा सराव केल्याने मनाची एकाग्रता सुधारते आणि भावनिक आरोग्याला मदत मिळते. योगाभ्यास करणारी व्यक्ती इतर व्यायाम करणाऱ्यांपेक्षा जास्त आनंदी आणि सकारात्मक असतात. ध्यानधारणेमुळे मनाला संपूर्ण विश्रांती देऊन मानसिक स्थिती सुधारते आणि त्याचा सराव कुठेही केला जाऊ शकतो.
विविध आजारांशी लढण्यास मदत
योगासने, ध्यानधारणेचा नियमित सराव रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यास, उच्च रक्तदाब कमी करण्यास आणि वजनावर नियंत्रण ठेवण्यास मदत करू शकते. दररोज योगासने आणि प्राणायाम केल्याने कोणत्याही हृदयविकाराची लक्षणे कमी होतात. योगामुळे मधुमेहाची लक्षणे कमी होतात आणि गुंतागुंत निर्माण होण्याची शक्यता कमी होते. योगाचा नियमित सराव आणि ध्यानधारणेबरोबर श्वासोच्छ्वासाचे व्यायाम केल्याने मन आणि शरीरावरील ताण प्रभावीपणे कमी होतो.
आहार आणि आरोग्यात सुधारणा
ध्यानधारणेबरोबर योगाभ्यास आपल्याला जागरूक करत असतो. त्यामुळे आपल्याला खाण्याच्या योग्य सवयी लागतात. अर्थातच वजन कमी करण्याची इच्छा वाढते आणि आत्मविश्वास वाढतो. आधुनिक जीवन तणावपूर्ण आहे. आपल्याला कमी झोप, तणाव आणि इतर चिंता यांचा सामना करावा लागतो. योगामुळे मन-शरीर यांचा समन्वय सुधारतो आणि देहभान सुधारते तर प्राणायाम श्वास आणि मनावर नियंत्रण सुधारण्यास मदत करते. प्राणायाम आणि ध्यानधारणेसह योगासन व्यक्तीला सर्वांगीण जीवन जगण्यास मदत करतात.