खेलेगा इंडिया... : मुलांसाठी योग्य खेळ कसा निवडाल?

पालक आपल्या मुलांसाठी योग्य खेळ शोधत असतात. मुलं अनेक खेळ खेळण्याचा प्रयत्न करतात आणि शेवटी कोणता तरी एक खेळ आवड म्हणून निवडतात.
Games
GamesSakal
Summary

पालक आपल्या मुलांसाठी योग्य खेळ शोधत असतात. मुलं अनेक खेळ खेळण्याचा प्रयत्न करतात आणि शेवटी कोणता तरी एक खेळ आवड म्हणून निवडतात.

- महेंद्र गोखले

पालक आपल्या मुलांसाठी योग्य खेळ शोधत असतात. मुलं अनेक खेळ खेळण्याचा प्रयत्न करतात आणि शेवटी कोणता तरी एक खेळ आवड म्हणून निवडतात. खरंतर ती योग्य पद्धत आहे. सगळ्याच मुलांना रोजच्या रोज कोणत्यातरी खेळामध्ये सहभागी होण्याची इच्छा असतेच असं नाही. काहीजण धावपटू म्हणजे ॲथलिट होणं पसंत करतात. काही मुल सांघिक, काही वैयक्तिक, काही जास्तीत जास्त शारीरिक हालचाली असलेला, काही शरीरावर कमीत कमी परिणाम होणारा खेळ निवडतात. एखाद्या मुलाने वैयक्तिक खेळ खेळणं निवडलं तर त्यांना छंद म्हणून एखादा सांघिक खेळण्यासाठी प्रोत्साहित करा.

पालकांना आपल्या मुलांना त्यांच्या आवडीचा आणि गरजेचा खेळ निवडण्यासंदर्भात काही टिप्स...

1) वेगवेगळ्या खेळाचे अनुभव घेऊ दे

मुलांची आवड लक्षात घेऊन त्यांना एखादा खेळ खेळून आनंद मिळतो का, यावरून त्यांनी तो खेळ खेळावा की नाही हे ठरवता येते. मुलांना खेळाचे शक्य ते सगळे अनुभव घेऊ द्यावे. प्रत्यक्ष मैदानात जाऊन खेळ बघणे चांगला अनुभव देऊ शकते. मुलांना प्रत्येक खेळाबद्दल काय आवडते आणि काय आवडत नाही याबद्दल चर्चा करावी.

2) मुलांच्या उत्साहाचे निरीक्षण करा

मुलांना कोणत्या खेळात जास्त आवड आहे याचा अंदाज घ्या. त्यांच्या खेळाच्या निवडीबाबत मुलांच्या बोलण्यातून किंवा प्रतिसादातून अंदाज बांधा. कदाचित ते इतर कोणाशीतरी खेळाच्या अनुभवाबद्दल किंवा एखाद्या खेळाडूबद्दल किंवा खेळातल्या एखाद्या रणनीतीबद्दल बोलत असतील. त्यांचे कोणी मित्र एखादा खेळ खेळत असतील त्याचे त्यांना आकर्षण वाटू शकते. तुम्ही त्यांचं वागणं आणि बोलणं नीट लक्ष देऊन ऐकलं आणि पाहिलं तर आवडीचा अंदाज बांधून निर्णय घेता येईल.

3) सांघिक, वैयक्तिक खेळातील प्राधान्यक्रम

काही मुलांना फुटबॉल, क्रिकेट किंवा बास्केटबॉल सारखे सांघिक खेळ आवडतात. काही मुलं सांघिक खेळापेक्षा स्वतःचे कौशल्य दाखवण्यासाठी वैयक्तिक खेळ खेळणे पसंत करतील. उदा : जलतरण, टेनिस, गोल्फ, बॅडमिंटन, सायकलिंग किंवा जिम्नॅस्टिक्स. आपल्या मुलांचे निरीक्षण करून त्यांचे प्राधान्य कुठे आहे हे ठरवा. त्यामुळे मुलांसाठी योग्य खेळ निवडणे तुम्हाला सोपे जाईल.

4) शारीरिक रचनेप्रमाणे खेळाची निवड

उंचीला कमी आणि धष्टपुष्ट मुलगा बास्केटबॉल ऐवजी फुटबॉल जास्त चांगला खेळू शकेल. उंच आणि सडपातळ मुलगा बास्केटबॉल किंवा ॲथलेटिक्समध्ये चांगली कामगिरी करू शकेल.

5) वैयक्तिक प्रशिक्षणावर भर

कोणत्याही खेळाची मूलभूत कौशल्ये आत्मसात करण्यासाठी पालकांनी पाल्याच्या वैयक्तिक प्रशिक्षणाकडे लक्ष द्यावे. मूलभूत तंत्र शिकण्यासाठी पोषक वातावरण हवे. कोणत्याही खेळात सक्रिय सहभागी होण्यापूर्वी मुलांचे मूल्यांकन करून घ्या. अनेकवेळा मुले शारीरिकदृष्ट्या खेळासाठी तयार नसतात किंवा शारीरिक मर्यादांची जाणीव नसते. त्यामुळेच त्यांना दुखापतींचा सामना करावा लागतो.

6) जबाबदारी घ्यायला शिकवा

खेळात सहभाग होण्यासाठी पालक आणि मुले यांना जबाबदारीची आणि शिस्तीची जाणीव असणे गरजेचे आहे. घरी सराव करणे, खेळाच्या साहित्याची गरज, सरावासाठी वेळेवर पोचणे आणि सतत सक्रिय असणे यासाठी इतर काही गोष्टींना किंवा आवडीला बाजूला ठेवावे लागते. खेळातूनच व्यक्तिमत्त्व विकास होतो.

आपल्या मुलाचे वजन जरा जास्त असेल किंवा थोडा आळशीपणा असल्यास अगदी छोट्या गोष्टींपासून सुरुवात करावी. मुलाला व्हिडिओ गेम्सपासून दूर नेण्यासाठी स्केटबोर्ड, सायकल किंवा ट्रॅम्पोलिन याचा उपयोग होऊ शकतो.

पालकांनी आपले अनुभव, आवड याचा मुलांवर प्रभाव होऊ देऊ नये. विशिष्ट खेळाच्या आग्रहापेक्षा मुलाने कोणत्यातरी खेळात सहभागी व्हावे असा कटाक्ष ठेवा. तुमच्या आवडीच्या खेळात मुलांना ढकलणे विपरीत परिणाम देऊ शकते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com