
MPSC : एमपीएससीची टंकलेकन चाचणी पुन्हा होणार ; तांत्रिक अडचणीमुळे गट ‘क’ची आधिची परीक्षा रद्द
पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून गट-क सेवा मुख्य परीक्षा-२०२१ मधील टंकलेखन कौशल्य चाचणी रद्द करण्यात आली आहे. लिपिक टंकलेखक व कर सहायक या संवर्गासाठी ७ एप्रिल रोजी ही चाचणी घेतली होती. पण या याचणीदरम्यान अनेक तांत्रिक अडचणी उद्भवल्याने विद्यार्थ्यांना समस्यांना तोंड द्यावे लागले.
परिणामी, ही चाचणी पुन्हा घेण्याची मागणी विद्यार्थ्यांकडून केली जात होती. आयोगानेही विद्यार्थ्यांची ही मागणी आता मान्य केली आहे. मात्र, या परीक्षेत चांगले प्रदर्शन करणाऱ्या उमेदवारांनी नाराजी व्यक्त केली आहे.
आयोगाकडून राज्यातील उमेदवारांची मुंबई येथील केंद्रावर टंकलेखन कौशल्य चाचणी ७ एप्रिल रोजी घेतली होती. अनेक उमेदवारांनी चाचणीदरम्यान तांत्रिक अडचणी आल्याच्या तक्रारी आयोगाकडे केल्या होत्या.
याअनुषंगाने सोमवारी आयोगाकडून ही चाचणी पुन्हा घेतली जाणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार ७ एप्रिल रोजी आयोजित टंकलेखन कौशल्य चाचणीस उपस्थित असलेल्या सर्व उमेदवारांची टंकलेखन कौशल्य चाचणी नव्याने आयोजित करण्यात येईल.
प्रस्तावित टंकलेखन कौशल्य चाचणी ही आयोगाच्या ०३ एप्रिल २०२३ रोजीच्या प्रसिध्दीपत्रकामध्ये नमूद मानकांनुसार घेण्यात येईल. चाचणीच्या अनुषंगाने उमेदवारांना सूचना नव्याने प्रसिद्ध केल्या जातील. या सूचना उमेदवारांवर बंधनकारक असतील.
प्रस्तावित चाचणीस अनुपस्थित उमेदवारांचा अथवा चाचणीमध्ये अपात्र उमेदवारांचा निवडप्रक्रियेकरीता विचार करण्यात येणार नाही. प्रस्तावित टंकलेखन कौशल्य चाचणी फक्त मुंबई येथे आयोजित करण्यात येईल. चाचणीचा दिनांक व वेळ स्वतंत्रपणे अवगत करण्यात येईल, असे आय़ोगाने स्पष्ट केले आहे.
संयुक्तीक आहे का?
टंकलेकन कौशल्य चाचणी पुन्हा घेण्याबाबत काही उमेदवारांनी आक्षेप नोंदविला आहे. चाचणी जर आधीच झाली होती तर पुन्हा घेण्याची गरज आहे का? असे झाले तर प्रत्येक परीक्षा पुन्हा घ्यावी लागेल. या चाचणीसाठी उमेदवारांना राज्यातील इतर शहरांमधून पुन्हा एकदा मुंबईला यावे लागल, त्यांच्यासाठी हे संयुक्तीक ठरणार नाही, असा आक्षेप काही उमेदवारांनी घेतला आहे. एमपीएससीच्या चुकांची आम्हाला भूर्दंड का? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.