
NEET Exam : नोंदणी प्रक्रियेसाठी या तारखेपर्यंत मुदत; 7 मेस पार पडणार परीक्षा
नाशिक : वैद्यकीय शाखेतील प्रथम वर्ष पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी नॅशनल इलिजिब्लिटी कम एंट्रान्स टेस्ट (NEET) परीक्षा घेतली जाणार आहे. शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मध्ये वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी येत्या ७ मेस 'नीट २०२३' परीक्षा देश-विदेशातील परीक्षा केंद्रांवर पार पडेल.
या परीक्षेला प्रविष्ठ होण्यासाठी नोंदणी प्रक्रिया सुरु झाली असून, इच्छुक व पात्र विद्यार्थ्यांना ६ एप्रिलपर्यंत ऑनलाइन नोंदणी करावी लागणार आहे.
नॅशनल टेस्टींग एजन्सी यांच्यामार्फत याबाबत नुकतेच सूचनापत्र जारी केले आहे. त्यानुसार नीट २०२३ परीक्षेकरीता ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया काल (ता.६) पासून सुरु झाली आहे. इयत्ता बारावीची परीक्षा देत असलेल्या पात्रताधारक विद्यार्थ्यांना येत्या ६ एप्रिलच्या रात्री नऊपर्यंत ऑनलाइन अर्ज दाखल करता येईल. तर याच दिवशी मध्यरात्री बारापूर्वी विद्यार्थ्यांना निर्धारित शुल्क ऑनलाइन स्वरुपात अदा करावे लागणार आहे.
असे असेल परीक्षेचे स्वरुप
परीक्षेत दोनशे प्रश्न वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपाचे विचारले जातील. भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र (बॉटेनी व झुऑलॉजी) या विषयांचे प्रत्येकी पन्नास प्रश्न संच अ व संच बच्या माध्यमातून परीक्षेला विचारले जातील.
अ गटातील सर्व ३५ प्रश्न सोडविणे बंधनकारक असेल. तर ब गटात दिलेल्या पंधरा प्रश्नांपैकी कुठलेही दहा प्रश्न सोडवायचे असतील. प्रश्नपत्रिका सोडविण्यासाठी तीन तास २० मिनिटे कालावधी उपलब्ध असेल. प्रत्येकी चार गुणांसाठी अशी एकूण ७२० गुणांसाठी ही परीक्षा होणार असून प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी एक गुणाची कपात केली जाईल.
विद्यार्थ्यांना इंग्रजी, हिंदी, मराठी, उर्दुसह वेगवेगळ्या तेरा भाषांमधून प्रश्नपत्रिका सोडविण्याचा विकल्प उपलब्ध करुन दिला आहे.
राज्यातील या शहरांतील परीक्षा केंद्रावंर होणार परीक्षा
नाशिक, पुणे, मुंबईसह नगर, अकोला, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, बीड, बुलढाणा, जळगाव, कोल्हापूर, लातूर, नागपूर, नांदेड, नवी मुंबई, सातारा, सोलापूर, ठाणे, सांगली, सिंदुदुर्ग, रत्नागिरी, धुळे, भंडारा, चंद्रपुर, गडचिरोली, गोंदिया, नंदुरबार, उस्मानाबाद, पालघर, परभणी, रायगड, वर्धा, वाशिम, यवतमाळ, मालेगाव या शहरांतील परीक्षा केंद्रांवर ऑफलाईन पद्धतीने (पेन व पेपरवर आधारित) परीक्षा येत्या ७ मेस दुपारी दोन ते सायंकाळी पाच वाजून २० मिनिटे यादरम्यान पार पडणार आहे.
अर्ज भरतांना या गोष्टींची घ्या काळजी..
* वैयक्तिक माहिती दाखल करतांना अचूक असल्याची खात्री करा.
* अर्ज भरण्यापूर्वी सूचनापत्रातील सूचना व्यवस्थित वाचा.
* अर्ज भरण्यासाठी आवश्यक बाबींची तरतूद करुन मग अर्ज भरा.
* अर्ज भरुन झाल्यावर ॲर्ज क्रमांक व पासवर्ड जतन करुन ठेवा.
* अर्ज क्रमांक किंवा पासवर्डबाबतची माहिती गोपनीय ठेवा.
* अर्ज भरतांना परीक्षा केंद्र शहराचा पर्याय काळजीपूर्वक निवडा.
* वेळोवेळी जारी केल्या जाणाऱ्या सूचनांकडे लक्ष ठेवा.