तरुणींनो, स्पर्धा परीक्षांचा बाऊ कशाला? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Vaishali Patange

अतिरिक्त आयुक्त, जीएसटी, पुणे या पदावर सध्या कार्यरत असलेल्या वैशाली पतंगे यांना, तरुणींच्या स्पर्धा परीक्षांकडे पाहण्याच्या सध्याच्या दृष्टिकोनाची समीक्षा करावीशी वाटते.

Competition Exam : तरुणींनो, स्पर्धा परीक्षांचा बाऊ कशाला?

अतिरिक्त आयुक्त, जीएसटी, पुणे या पदावर सध्या कार्यरत असलेल्या वैशाली पतंगे यांना, तरुणींच्या स्पर्धा परीक्षांकडे पाहण्याच्या सध्याच्या दृष्टिकोनाची समीक्षा करावीशी वाटते. प्रशासकीय सेवेत जाऊन लोककल्याणकारी कामांची संधी या परीक्षांतील यशामुळे मिळते. घर, संसार, मूल याच्या बरोबरीने प्रशासकीय सेवेतील सेवेतही समांतरपणे गुणवत्तापूर्ण विकास शक्य असल्याचे त्या आवर्जून सांगतात.

वैशालीताई म्हणाल्या, स्पर्धा परीक्षांसाठी पुण्यात शहरी व ग्रामीण भागांतील तरुणीही मोठ्या संख्येने प्रयत्न करताना दिसतात. पहिल्या प्रयत्नात यश मिळाले नाही तर, ‘आता पुरे, लग्न करून टाकू’, असे दडपण बरेचदा पालकांकडून मुलींवर टाकले जाते. समजा तिने लग्न केले तर या परीक्षांकडे मुलींनी पूर्णपणे पाठ फिरवण्याचे प्रमाण जास्त दिसते.

वैशालीताई म्हणाल्या, मी मूळची कराडची. बारावीला गुणवत्ता यादीत आले. नंतर पुण्याच्या स. प. महाविद्यालयातून इंग्रजी साहित्यात बी.ए. व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून एम.ए. केले. कविता लिहिते. मराठी, संस्कृत व इंग्रजी साहित्याची आवड जोपासली आहे. साहित्य विषयक अनेक सभा, संमेलनांमध्ये व्याख्यानासाठी निमंत्रित असते. त्यामुळे या साहित्य विषयक ताज्या घडामोडींचा मागोवा घेत असते.

अनुभवाचे बोल

  • मी आधी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली.

  • लग्न केले आणि केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळवले.

  • या परीक्षांची तयारी, यश मिळाल्यावर विशिष्ट पदासाठीची निवड, ती जबाबदारी व लग्न आदी मुद्द्यांची गुंतागुंत होऊ न देता त्यांचा योग्य ताळमेळ राखणे अवघड नाही, हे अनुभवाने सांगते.

  • मुली स्वतःच्या लग्नात मेकअप, वेशभूषा, ठिकाण, मेनू, समारंभ कसा असावा याबाबत आता स्वतः जागरूक व आग्रही राहतात. मात्र लग्नानंतरचे आपले आयुष्य कसे असावे, याबाबत सखोल विचार केलेला नसतो.

  • अधिकारी म्हणून आपली कारकीर्द व संसार यांच्या समतोलासाठी त्यांनी, स्त्री स्वातंत्र्य व समानतेचा अधिकार वापरून जीवनसाथीशी चर्चा करून आखणी करावी.

मुलाच्या संगोपनाकडेही हल्ली प्रकल्पासारखे पाहिले जाते. याऐवजी संयुक्त कुटुंबातील सदस्यांशी नाते जोपासून तणावरहित पद्धतीने मूल वाढवता येते. अशा अनेक पैलूंचा चौफेर विचार करून तरुणींनी घरसंसार व प्रशासकीय सेवा, या दोन्ही फळ्यांवर उत्तम कामगिरीसाठी पावले उचलावीत. नियोजन, व्यवस्थापनात सकारात्मक ऊर्जा असली की, बरेच काही साध्य करता येते. प्रशासकीय पदांवरून अधिकाधिक विधायक कार्याचे योगदान करण्यासाठी तरुणींनी स्पर्धा परीक्षांकडे वळावे.

- वैशाली पतंगे, अतिरिक्त आयुक्त, जीएसटी

टॅग्स :exameducationyoung girl