
SSC Exam 2023 : पहिल्या पेपरला नाही एकही कॉपी
छत्रपती संभाजीनगर : दहावीच्या परीक्षेला गुरुवारी (ता.दोन) सुरुवात झाली. राज्यात सुरू असलेल्या कॉपीमुक्त अभियानाला छत्रपती संभाजीनगर विभागात चांगला प्रतिसाद मिळाला. विभागात एकही कॉपीचा प्रकार आढळून आला नाही.
मात्र, बारावी प्रमाणेच दहावीच्या विद्यार्थ्यांना लिखाणाचा सराव नसल्याने पेपर लिहिण्यासाठी वेळच कमी पडल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. यंदा कॉपीमुक्त अभियान राबविण्यात येत असल्याने अत्यंत काटेकोर नियोजन करण्यात आले आहे. याशिवाय विद्यार्थ्यांवरील ताण कमी व्हावा, यासाठी दोन पेपर्समध्ये अंतर ठेवण्यात आले असून समुपदेशकांचीही नियुक्ती करण्यात आलेली आहे.
दरम्यान, यावर्षी विभागात दहावीच्या पहिल्याच मराठी पेपरला एकही कॉपी केस झाली नाही. त्यामुळे कॉफी मुक्त अभियानाला विभागात चांगला प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले आहे. दरम्यान, मराठीच्या पेपरला खूप लिखाण करावे लागते. दहा मिनिटांचा कालावधी वाढवून दिला असला तरी, पेपर लिहिण्यासाठी वेळच पुरला नसल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले.
यंदा विभागातून ६२९ केंद्रांवर १ लाख ८० हजार २१० विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ट झाले आहेत. यासाठी ६३ परीक्षक केंद्रे नेमण्यात आले आहेत. सकाळी अकरा वाजता मराठीच्या पेपरला सुरुवात झाली. तत्पूर्वी साडे दहा वाजताच विद्यार्थ्यांना तपासणी करून परीक्षा हॉलमध्ये प्रवेश देण्यात आला.
परीक्षेत कोणताही गैरप्रकार घडू नये, यासाठी महसूल विभागाची १०, शिक्षण विभागाची सहा भरारी पथके प्रशासनाकडून तैनात करण्यात आली आहेत. यासह प्रत्येक केंद्रावर तीनजणांचे बैठे पथक असून ते परीक्षेच्या एक तास अगोदर आणि परीक्षेनंतर एक तास केंद्रावर उपस्थित राहणार आहेत. महिलांचेही एक स्वतंत्र पथक तैनात करण्यात आले आहे.
मुलांच्या भविष्यासाठी दिली परीक्षा
माणूस जन्मभर विद्यार्थी असतो, याचे प्रत्यक्ष उदाहरण गुरुवारी (ता.दोन) दहावीच्या परीक्षेदरम्यान पाहायला मिळाले. एका ४० वर्षीय महिलेने आपल्या मुलासोबत दहावीची परीक्षा दिली. लग्न लवकर झाल्यामुळे नववीला असताना शाळा सोडावी लागली होती. किमान दहावी तरी पास व्हावे, अशी इच्छा त्या मातेने आपल्या पती व मुलाकडे बोलून दाखवली.
त्यांनीही होकार देत १७ नंबरचा परीक्षा अर्ज भरला. पतीची साथ, अन् जिद्दीच्या जोरावर परीक्षा देत असलेल्या या महिलेने ‘सकाळ’ शी बोलताना सांगितले. तसेच शहरातील अजून एका केंद्राबाहेर दोन महिन्यांच्या बाळाला घेऊन एका आईने दहावीची परीक्षा दिली. मुलाच्या उज्ज्वल भविष्यासाठी परीक्षा देणाऱ्या या मातांचे कौतुक होत आहे.
ऐनवेळी विद्यार्थी वाढले
गुरुवारी दहावीची बोर्ड परीक्षा सुरु झाली. मात्र, बुधवारी (ता.एक) सायंकाळपर्यंत विद्यार्थ्यांनी परीक्षेचे अर्ज भरल्याने ऐनवेळी विद्यार्थी संख्या वाढल्याने बोर्डसमोर मोठे आव्हान उभे राहिले होते. परंतु, विभागातील प्रत्येक केंद्रावर विद्यार्थ्यांचे नियोजन करून वाढीव प्रश्नपत्रिका पाठविल्याने धावपळ कमी झाली असल्याचे बोर्डातील अधिकाऱ्यांनी सांगितले.