Positive Story: IIT पासआउट पोरीनं सोडली २२ लाखाची नोकरी अन् करु लागली सेंद्रिय शेती!

टीम ई-सकाळ
Tuesday, 24 November 2020

शेती करणे हा माझा हेतू होता. त्यासाठी मी २२ लाख पॅकेजची नोकरी सोडली. मी आता नोकरी करत असते, तर आता माझा पगार वर्षाला जवळपास ३३ लाख असला असता. इतकं उत्पन्न मी शेतीतून मिळवत नाही, तरी मी पूर्वीपेक्षा कितीतरी अधिक आनंदी आणि निरोगी आहे.

नवी दिल्ली : आयआयटी पासआऊट असलेली पूजा भारतातील गेल (गॅस ऑथोरिटी ऑफ इंडिया लिमिटेड) या सरकारी कंपनीमध्ये नोकरी करत होती, पण जेव्हा जेव्हा तिला तिचे गाव आठवायचे तेव्हा तिचे मन उदास व्हायचे. 

नालंदा जिल्ह्यातील बिहारशरीफ हे तिचं मूळ गाव. लहानपणापासूनच पूजा भारती ही खूप हुशार विद्यार्थिनी म्हणून ओळखली जात होती. २००५ मध्ये तिनं आयआयटीची प्रवेश परीक्षा उत्तीर्ण केली आणि २००९ मध्ये केमिकल इंजिनिअरिंगमधून पदवी घेतल्यानंतर तिला गेलमध्ये नोकरी मिळाली. गावात पूजाचे मोठे घर होते, शेती होती. तिला नोकरीमध्ये पैसे मिळाले, पण आराम नाही.

नोकरी करत असताना तिला जेव्हा निसर्गाच्या जवळ जाण्याची इच्छा व्हायची तेव्हा ती गावी जायची. तिचा एक मित्र मनीष आयआयटीमधून पास आऊट झाल्यावर बिहारमध्ये त्याच्या गावी गेला. गावातील बेरोजगारीवर काहीतरी उत्तर शोधायचं, आपल्या लोकांसाठी काहीतरी करण्याची त्याची इच्छा होती त्यामुळं तिथं त्यानं शेतीशी संबंधी स्टार्टअप सुरू केलं. पूजालाही जेव्हा वेळ मिळायचा ती मनीषशी सेंद्रीय शेतीबद्दल बोलायची. त्या दोघांनी सेंद्रिय शेती करणाऱ्या अनेक गावांना भेटी दिल्या.  

'मनीष आणि मी शेतीबद्दल बोलत होतो. तेव्हा मला समजले की, विचार करून शेती करणाऱ्या लोकांची शेती क्षेत्राला गरज आहे. कारण शेती मुख्यतः अशा लोकांशी संबंधित आहे ज्यांच्याकडे नोकरी नाही किंवा त्यांचा स्वतःचा व्यवसाय नाही. पर्याय नसल्याने ते शेती करत आहेत. २०१५मध्ये नोकरी सोडल्यानंतर पुढील एक वर्ष सेंद्रिय शेतीबद्दल अभ्यास केला. दीपक सचदे माझे गुरू, गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये त्यांचे निधन झाले. त्यांना भेटल्यानंतर माझा सेंद्रिय शेतीवरील विश्वास अधिकच दृढ झाला आणि मला वाटलं की शेती करण्याचा हा योग्य मार्ग आहे, असं पूजा सांगते. 

२०१६मध्ये आम्ही 'बॅक टू व्हिलेज' सुरू केलं. त्याचा उद्देश फक्त सेंद्रिय शेती करणे नव्हे, तर ग्रामीण जीवनशैलीला चालना देणे हा आहे. आम्हाला शहरात नाही तर गावांत जायचं आहे आणि तिथं रोजगाराच्या संधी निर्माण करायच्या आहेत. मी आणि मनीष आम्ही दोघांनी आधी ओडिशामध्ये काम सुरू केले. दीड वर्ष खेड्यात जाऊन शेतकर्‍यांना भेडसावत असलेल्या समस्या समजून घेतल्या. मग त्यावर तोडगा काढण्याचं काम केलं. हळूहळू आमची टीम वाढत गेली आणि कामही वाढत गेले.

आम्ही कॉर्पोरेटसारखं काम करत नाही. आमच्या टीममध्ये प्रत्येकजण एकसमान आहे. आमच्या टीममध्ये दहावी नापास असेही लोक आहेत, पण एका सुशिक्षिताला लाजवेल, असं त्यांचं वर्तन आहे. आम्ही शेतकर्‍यांसाठी नाही, तर शेतकऱ्यांसोबत काम करतो, असं पूजा म्हणाली.

Success Story: गैर मुस्लीम विद्यार्थ्यानं टॉप केली इस्लामिक स्टडीजची परीक्षा!​ 

बॅक टू व्हिलेज मॉडेल


या कंपनीतर्फे गावात प्रगत असे कृषी केंद्रे चालविले जाते. अशी दहा केंद्रे सध्या ओडिशामध्ये कार्यरत आहेत. पूजा सांगते की, 'आम्ही खेड्यातील प्रगतशील अशा शेतकर्‍याला प्रशिक्षण देतो आणि तिथे छोटे कार्यालय आणि सुमारे दोन एकर क्षेत्रावर शेती सुरू करतो. या शेतात आम्ही स्थानिक शेतकऱ्यांच्या मदतीने सेंद्रिय शेती करतो. कमी खर्चात चांगले उत्पादन मिळत असल्याने ते शेतकरी आनंदाने शेती करतात. 

"बाजारात सेंद्रिय उत्पादने सहसा महाग असतात. सेंद्रिय शेती करणारे लोक दीड ते दोन पटीने किंमती सांगतात. त्यामुळे चुकीचा संदेश जातो. कंपोस्ट खत आणि कीटकनाशके स्वतः तयार केल्याने सेंद्रिय शेतीतील खर्च कमी होतो. सुरुवातीला कामगारांवर जास्त खर्च होतो, परंतु नंतर तो कमी होत जातो. सेंद्रिय उत्पादनांना जास्त मागणी आणि कमी पुरवठा असल्याने या उत्पादनांची किंमत जास्त असते. सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांची उत्पादने बाजारात कमी वेळात विकली जातात, अशी माहिती पूजाने दिली. 

पूजाच्या म्हणण्यानुसार, तिच्याशी संबंधित शेतकरी महिन्याला पंधरा ते वीस हजार रुपये सहज मिळवतात. कंपोस्ट, खत आणि कीटकनाशके सर्व एकाच शेतात तयार केले जात आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांना जास्त फायदा होतो. 

इम्प्रूव्ह युअरसेल्फ :  प्रवास ध्येय गाठण्याचा...​

आव्हाने 
सेंद्रिय शेतीतील सर्वात मोठे आव्हान म्हणजे त्याच्याशी संबंधित गोष्टी बाजारात सहज उपलब्ध नसतात. जर तुम्ही रासायनिक शेती करत असाल, तर त्यासंबंधित सर्व काही बाजारात उपलब्ध आहे, पण सेंद्रिय शेतीसाठी कोणतेही खत किंवा कंपोस्ट उपलब्ध नाही. हे सर्व स्वत: तयार करावे लागते. सेंद्रिय शेती करणे सोपे नाही आणि म्हणूनच सामान्य शेतकर्‍यांमध्ये ती लोकप्रिय नाही. कारण त्यात खूप मेहनत घ्यावी लागते. ही समस्या कशी सोडवायची जेणेकरून सेंद्रिय शेती सुलभ होईल, यावर आम्ही सध्या काम करत आहोत, असं पूजा म्हणाली. 

पूर्वीपेक्षा कमी पैसे कमवूनही आनंदी आहे


पूजा सांगते की, 'शेती करणे हा माझा हेतू होता. त्यासाठी मी २२ लाख पॅकेजची नोकरी सोडली. मी आता नोकरी करत असते, तर आता माझा पगार वर्षाला जवळपास ३३ लाख असला असता. इतकं उत्पन्न मी शेतीतून मिळवत नाही, तरी मी पूर्वीपेक्षा कितीतरी अधिक आनंदी आणि निरोगी आहे.'

Success Story : २२ व्या वर्षी बनला देशातील सर्वात तरुण आयपीएस!​

ती म्हणते, 'शेतीत जास्त पैसे मिळणार नाहीत, हे मला माहित होतं, पण मी इथं जे कमावलं ते केवळ पैशांमध्ये मोजलं जाऊ शकत नाही. या कामात बर्‍यापैकी शांतता आहे, आरोग्य चांगले आहे, तणाव नाही. ही माझी खरी कमाई आहे. मला आयुष्यातील पाच एल म्हणजे लव्ह, लाफ (हसणं), लाइव्हलीहूड (रोजीरोटी), लर्निंग (शिक्षण) आणि लिव्हिंग (राहणे) या सर्व गोष्टी एकाच ठिकाणी मिळत आहेत. याचबरोबर मला चांगले अन्न, चांगली हवा, चांगले पाणी आणि शांतता मिळत आहे. तसंच मी आजारांपासूनही दूर आहे.'

पूजा आणि तिची कंपनी चांगल्या प्रकारचे काम करत असून भविष्यात बिहार आणि इतर राज्यांत काम करण्याची त्यांची इच्छा आहे. व्यवसायाचे मॉडेल विकसित झाल्यास आम्ही बरेच पैसे कमावू शकतो, पण आमचे उद्दिष्ट पैशापेक्षा गावे अधिक स्वावलंबी बनविणे हे आहे. अशी गावं जी स्वतःची गरज भागवू शकतील आणि सरकारी अनुदानावर अवलंबून नसतील. आमचा आतापर्यंतचा प्रवास आम्ही योग्य मार्गावर आहोत, हे सांगतो.

- एज्युकेशन संबंधी इतर बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Positive story Girl who studied from IIT quit 22 lakh jobs and started farming