संवाद : सामाजिक शास्त्राचे अभ्यासक्रम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Social science

पदवी शिक्षणासाठी किमान पातळीवर बारावी पास असणे हे महत्त्वाचे असून प्रत्येक संस्थात्मक पातळीवरील प्रवेशासंदर्भातील प्रक्रिया वेगवेगळी आहे.

संवाद : सामाजिक शास्त्राचे अभ्यासक्रम

- प्रशांत भोसले

भारतामध्ये खासगी, स्वायत्त आणि शासकीय अशा सर्व पातळीवरील सामाजिक शास्त्रांच्या संस्थात्मक विभागाअंतर्गत खासगी महाविद्यालय, शासकीय अनुदानित महाविद्यालय, राज्यस्तरीय विद्यापीठ, केंद्रीय विद्यापीठ, स्वायत्त विद्यापीठ, आदी ठिकाणी हा अभ्यासक्रम उपलब्ध आहे.

टाटा सामाजिक संस्था मुंबई, टाटा सामाजिक संस्था तुळजापूर, निर्मला निकेतन मुंबई, लोयला कॉलेज, राजगिरी कॉलेज ऑफ सोशल वर्क, मद्रास स्कूल ऑफ सोशल वर्क, दिल्ली स्कूल ऑफ सोशल वर्क, बडोदा स्कूल ऑफ सोशल वर्क याव्यतिरिक्त महाराष्ट्रामध्ये समाज कल्याण विभागांतर्गत असलेल्या शासकीय योजनेमधून अनुदान प्राप्त ५२ महाविद्यालयांमध्ये समाजकार्याचे शिक्षण जिल्हा, तालुका आणि गाव पातळीवर दिले जात आहे.

अभ्यासक्रमासाठी पात्रता

पदवी शिक्षणासाठी किमान पातळीवर बारावी पास असणे हे महत्त्वाचे असून प्रत्येक संस्थात्मक पातळीवरील प्रवेशासंदर्भातील प्रक्रिया वेगवेगळी आहे. पदव्युत्तर शिक्षण प्रवेशासाठी किमान पातळीवर कोणत्याही विषयाची पदवी असावी.

नोकरी-व्यवसायाच्या संधी

या अभ्यासक्रमांचा उपयोग हा स्वंयसेवी संस्था, शासकीय संस्था (पंचायत समिती, आदिवासी विभाग, ग्राम विकास विभाग, शिक्षण विभाग, आरोग्य मिशन, महिला बाल कल्याण, गुन्हेगारी आणि सुधारात्मक सेवा इत्यादी), कारखाने (मानव संसाधन विभाग, सामाजिक दायित्व इत्यादी), रुग्णालये (व्यावसायिक समाज कार्यकर्ता, समुपदेशक) या सर्व ठिकाणी नोकरी मिळवण्यासाठी होतो. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील सामाजिक प्रश्नांवर कार्य करणाऱ्या प्रत्येक संस्थेमध्ये (युनिसेफ, जागतिक आरोग्य संघटना, जागतिक कामगार संस्था, जागतिक बँक इत्यादी) नोकरीची संधी उपलब्ध आहे. या व्यतिरिक्त व्यावसायिक समाज कार्यकर्ता म्हणून स्वतः धर्मादाय आयुक्त च्या अंतर्गत नोंदणीकृत स्वयंसेवी संस्था स्थापन करून त्याचे व्यावसायिक दृष्टिकोनातून प्रबंधन करू शकतो.

फेलोशिप किंवा उच्च शिक्षणाच्या संधी

सामाजिक क्षेत्रामधील उपलब्ध सर्व प्रकारच्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय फेलोशिप्स समाजकार्य शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी खुल्या आहेत. भारतामधील आयआयटी, एनआयटी आणि निम्हांस, बंगळूर यासारख्या मोठ्या तांत्रिक आणि आरोग्य शिक्षणासाठी प्रसिद्ध असलेल्या संस्थांमधून उच्च शिक्षणाच्या संधी समाजकार्य अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहेत. तेथील सामाजिक शास्त्रे आणि मानवी शास्त्र या विभागांतर्गत सामाजिक विषयांवरील अभ्यासक्रमांमध्ये व्यावसायिक समाजकार्य अभ्यासलेल्या विद्यार्थ्यांसाठी प्राधान्य आहे.

(लेखक समाजकार्य आणि आदिवासी विषयाचे संशोधक, अभ्यासक आहेत.)

टॅग्स :educationCourses