संवाद : समाजकार्य आणि शिक्षण व्यवसाय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Social work and education profession

आजच्या तांत्रिक जगामध्ये मानवी मूल्य आणि जाणीव या कमी होताना आपल्याला दिसतायेत.

संवाद : समाजकार्य आणि शिक्षण व्यवसाय

- प्रशांत भोसले

आजच्या तांत्रिक जगामध्ये मानवी मूल्य आणि जाणीव या कमी होताना आपल्याला दिसतायेत. कुटुंबात राहून कुटुंबातील सदस्यांसाठी वेळ नाही, आकाराने छोटी होत जाणारी कुटुंब पद्धती घरातल्या लहानग्यांमध्ये एकलेपणाची भावना वाढीस लावताना दिसते, तांत्रिक साधनांची अपरिहार्यता ही मानवी बुद्धीच्या आणि शारीरिक हालचालींच्या कार्यक्षमतेवर नकारात्मक परिणाम करताना दिसते. श्रमसंस्कार आणि जगण्यातला आनंद आज हरपताना दिसतो.

या ऐवजी आपल्या आजूबाजूला भौतिक गोष्टींना अनन्यसाधारण महत्त्व आल्याचे जाणवते. विकासाच्या मागे धावताना पर्यावरणाचा संतुलन ढासळलेला दिसतो. अशा परिस्थितीमध्ये मनुष्य म्हणून आपण हरवलेले आपले अस्तित्व आपल्याला या शिक्षणाच्या माध्यमातून परत सापडू शकते. नोकरी व्यवसायाच्या संधी या ग्रामीण पातळीवरील लहान संस्थेपासून तर आंतरराष्ट्रीय स्तरावरील मोठ्या संस्थेपर्यंत आपल्याला व्यावसायिक समाज कार्यकर्त्यांसाठी दिसतात. परंतु यातील महत्त्वाचे गमक म्हणजे क्षेत्र कार्य आणि त्या माध्यमातून सामाजिक प्रश्नांसोबत प्रशिक्षणार्थी समाज कार्यकर्त्यांचे जुळलेली नाळ होय.

प्रत्यक्ष अनुभवांच्याद्वारे स्वतःचा कम्फर्ट झोन सोडून स्वतःच्या व्यक्तिमत्त्वातील नवीन आयाम शोधण्यासाठी हा अभ्यासक्रम आपल्याला कार्यान्वित करतो. फक्त गरज आहे ती आपल्या प्रामाणिक प्रयत्नांची. यापुढे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू होत आहे त्यामुळे प्रत्येक शिकणाऱ्या विद्यार्थी-विद्यार्थिनी आणि कोणत्याही व्यक्तीने आयुष्यामध्ये ज्यावेळेस त्या संधी मिळेल त्यावेळेस प्रमाणपत्र, पदविका, पदवी, पदव्युत्तर पदवी, पदव्युत्तर पदविका किंवा विद्यावाचस्पती अशा कोणत्याही पातळीवरील अभ्यासास संधी मिळाली तरी तो अभ्यास करून आत्मसात करावा. तुमच्या आयुष्यातील दररोजच्या जगण्यातील प्रश्नांकडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोन हा नक्कीच बदलेल. तुमच्या जाणीवा भावना आणि मानवी मूल्ये नक्कीच वृद्धिंगत होतील यात काही एक शंका नाही.

बहुतेक जणांना आपल्या आजूबाजूच्या जगामध्ये समाज कार्यकर्ता हे बिरुद मिरवणारे अनेक जण दिसतात. यामध्ये एखाद्या वार्डातील किंवा एखाद्या गल्लीतील राजकीय अपेक्षा बाळगणाऱ्यांपासून तर खरोखरच झोकून देऊन अतिशय दुर्गम कठीण भागात जाऊन सामाजिक प्रश्नांवर काम करणारे आदर्श व्यक्तिमत्त्व यांचा समावेश होत असतो. अशा सर्वांबद्दल आपण ऐकतो, बघतो, वाचतो आणि अनुभवतो सुद्धा. मग ओघानेच प्रश्न निर्माण होतो की समाज कार्याचे व्यावसायिक शिक्षण घ्यायचं तरी का? माझ्या लेखी याचे उत्तर आध्यात्मिक दृष्टिकोनातून बघणं जास्त महत्त्वाचं ठरतं.

आता बघा की आपल्या देशातील एकूणच संत परंपरा आणि त्याद्वारे प्रचंड उंची गाठणारे सर्व व्यक्ती या विशिष्ट आणि विशेष अशा होत्या. त्यांनी घेतलेले त्या क्षेत्रातील अध्ययन- शिक्षण-श्रवण-कथन आजही बरेच जण करत आहेत. आजच्या काळातही त्या लोकांच्या उंचीपर्यंत फार थोड्या लोकांनाच पोहोचता आले आहे. मग तरीही त्या संत परंपरेतील ज्या लोकांनी ती आध्यात्मिक उंची मिळवून मनशांतीचा संदेश दिला. त्या मार्गावर आज सुद्धा बरीच लोक शास्त्रीय दृष्टिकोनातून अध्ययन करून मार्गक्रमण करतच आहेत.

या मार्गक्रमणामुळे प्रत्येक व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वामध्ये त्या उच्च संतपरंपरेच्या अनुषंगाने काही मूल्य, कौशल्य, जाणिवा आणि भावना या वृद्धिंगत होताना आपल्याला दिसतात. असंच काहीसं व्यावसायिक समाजकार्याच्या बाबतीत आपल्याला सांगता येईल. समाजातील आदर्श समाज कार्यकर्ते हे मूलभूत समाजाभिमुख काम करत आहेत परंतु आपल्यातील प्रत्येकालाच त्या पातळीपर्यंत पोहोचणे शक्य होईलच असे नाही पण नक्कीच या मार्गावर जाऊन आपल्याला अनुभव समृद्ध होता येऊ शकतं आणि या समाजाचा एक नागरिक म्हणून आपल्याला आपलं कर्तव्य पूर्ण करता येऊ शकते. त्यासाठी व्यावसायिक समाजकार्याचा दृष्टिकोन हा अत्यंत महत्त्वाचा आहे.

(लेखक समाजकार्य आणि आदिवासी विषयाचे संशोधक, अभ्यासक आहेत.)

टॅग्स :educationSocial Work