परदेशी शिकताना : उच्चशिक्षणातील शैक्षणिक लिखाणाशी जुळवून घेणे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

High Education

मागच्या काही आठवड्यांमध्ये आपण परदेशी विद्यापीठांच्या अर्जप्रक्रियेतील महत्त्वाचा भाग म्हणजे ‘स्टेटमेंट ऑफ पर्पज’ (SOP) याविषयी चर्चा केली.

परदेशी शिकताना : उच्चशिक्षणातील शैक्षणिक लिखाणाशी जुळवून घेणे

- ॲड. प्रवीण निकम

मागच्या काही आठवड्यांमध्ये आपण परदेशी विद्यापीठांच्या अर्जप्रक्रियेतील महत्त्वाचा भाग म्हणजे ‘स्टेटमेंट ऑफ पर्पज’ (SOP) याविषयी चर्चा केली. ‘स्टेटमेंट ऑफ पर्पज’बरोबर विद्यापीठांमध्ये अर्ज करण्यासाठी शिक्षकांकडून मिळणार शिफारस पत्र ज्याला आपण ‘लेटर ऑफ रेकमेंडेशन’ (LOR) असं म्हणतो आणि इंग्रजी भाषेच्या असणाऱ्या काही परीक्षा या सर्व विषयांवर आपण सविस्तरपणे आगामी काही भागांमध्ये बोलणारच आहोत.

परंतु त्याआधी आपण लिखाणसंदर्भातल्या काही कौशल्यांविषयी चर्चा करूया. आपण सध्या घेत असलेलं शिक्षण किंवा पुढे जाऊन भारतामधील किंवा परदेशी विद्यापीठांमध्ये घेऊ इच्छिणारे शिक्षण यामध्ये एक समान धागा आहे तो म्हणजे शैक्षणिक लिखाणाचा. आपण इंग्लिशमध्ये त्याला ॲकॅडमी रायटिंग असे म्हणतो. भारतातील आणि परदेशी विद्यापीठांमध्ये उच्च शिक्षण घेत असताना अभ्यासक्रमांचे मूल्यांकन लेखी परीक्षेचे पेपर आणि मूल्यांकन केलेले निबंध/अभ्यासक्रम यांच्या मिश्रणाने केले जाऊ शकते आणि म्हणून शैक्षणिक लिखाणाचे महत्त्व वाढतं. शैक्षणिक लिखाण करताना सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे केलेले लिखाण हे आपलं स्वत-च्या विचारांवर आणि आकलनावर आधारित असावं. ते कुठून तरी दुसऱ्याने केलेल्या लिखाणाची कॉपी नसावी ज्याला इंग्लिशमध्ये आपण plagiarism असे म्हणतो किंवा मराठीत आपण त्याला साहित्यिक चोरी असं म्हणता येईल.

दुसऱ्या व्यक्तीच्या कल्पना, शब्द किंवा कार्य कॉपी करणे आणि ते आपलेच असल्याचे भासवणे म्हणजेच Plagiarism, या शब्दाला एक अधिक परिचित संज्ञा म्हणजे ‘कॉपी करणे’ असेल. सोप्या भाषेत सांगायचे तर, शैक्षणिक लेखन म्हणजे शैक्षणिक हेतूंसाठी केलेले लेखन. शैक्षणिक लेखनामध्ये तुमचे विचार, आकलन करू शकता परंतु त्या कल्पना इतर व्यक्ती किंवा गटाला प्रतिसाद म्हणून सादर करणे आवश्यक आहे. शैक्षणिक लिखाण करत असताना आपण आपले विचार आणि आकलन मांडत असतो ते देखील काळजीपूर्वक तपशीलवार, चांगल्या प्रकारे समर्पित, तार्किकदृष्ट्या आणि अनुक्रमित करून. शैक्षणिक लेखनाचे एकापेक्षा जास्त प्रकार आहेत. पुस्तक पुनरावलोकन, युक्तिवादात्मक निबंध, साहित्य पुनरावलोकन, संशोधन लेख, अनुदान प्रस्ताव आणि इतर अनेक प्रकार आहेत. आपण अनेक वेगवेगळ्या उद्देशांसाठी लिहीत असतो.

शैक्षणिक लेखन क्लिष्ट कल्पनांना स्पष्ट, अचूक, तर्कसंगत आणि पुरावा-आधारित मार्गाने संप्रेषण करते. शैक्षणिक लेखनात कौशल्य विकसित करणे ही आव्हानात्मक प्रक्रिया आहे परंतु ती अवघड अजिबात नाही. एका कार्यशाळेत उपस्थित राहून, एक अभ्यासक्रम घेऊन, एक पुस्तक वाचून एखाद्याने एका रात्रीत चांगला लेखक बनण्याची अपेक्षा करणे वास्तववादी नाही. भारतातील आणि परदेशातील उच्च शिक्षण देणाऱ्या संस्थांमध्ये मूल्यांकन करताना लेखनामध्ये स्वत-च्या विचारांची अभिव्यक्ती, सत्यता आणि मौलिकता यावर भर दिला जातो. पुढच्या काही भागांमध्ये शैक्षणिक लिखाण का महत्त्वाचा आहे, भाषेचं शैक्षणिक लिखाणा मधलं महत्त्व काय आहे अशा काही विषयांवर चर्चा करणार आहोत.

(लेखक ‘समता सेंटर’ या स्वयंसेवी संस्थेचे संस्थापक आहेत.)

टॅग्स :educationAbroad