
RTE Admission : आरटीईअंतर्गत प्रतीक्षा यादीतील बालकांच्या प्रवेशासाठी १२ जूनपर्यंत मुदत
पुणे - शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (आरटीई) २५ टक्के राखीव जागांसाठी राबविलेल्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत राज्यातील ६४ हजार २५६ बालकांचे नियमित फेरीत प्रवेश निश्चित झाले आहेत. आता या प्रवेश प्रक्रियेतील प्रतीक्षा यादीत असणाऱ्या बालकांना १२ जूनपर्यंत प्रवेशास मुदत दिली आहे.
आरटीईनुसार आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि वंचित घटकातील बालकांच्या प्रवेशासाठी खासगी शाळांमध्ये २५ टक्के जागा राखीव ठेवल्या जातात. या जागांवरील प्रवेशासाठी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया होत आहे. त्याअंतर्गत प्रवेशाची नियमित फेरी पूर्ण झाली आहे. आता प्रतीक्षा यादीतील बालकांच्या प्रवेशासाठी मंगळवारपासून प्रक्रिया सुरू झाली आहे.
प्रतीक्षा यादीतील बालकांच्या प्रवेशासाठी पालकांनी आरटीई पोर्टल सविस्तर तपशील तपासावेत. प्रवेशासाठी आवश्यक सर्व कागदपत्रांच्या मूळ प्रति आणि साक्षांकित प्रति पडताळणी समितीसमोर सादर कराव्यात आणि आपला प्रवेश निश्चित करावा. त्यानंतर प्रवेश ऑनलाईन निश्चित झाला असल्याची पोचपावती पडताळणी समितीकडून घेणे आवश्यक आहे, अशी सूचना शिक्षण विभागाने दिली आहे.
आरटीईच्या पोर्टल तांत्रिक अडचणींच्या विळख्यात
आरटीईनुसार २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेशासाठी असणाऱ्या पोर्टलवर अतिरिक्त भार येत असल्याने पालकांना तांत्रिक अडचणी येत आहेत. पण पालकांनी कोणतीही भीती किंवा संभ्रम बाळगू नये. तसेच प्रवेशासाठी निवड झालेल्या बालकांच्या प्रवेशासाठी पुरेसा कालावधी देण्यात येईल. तसेच प्रवेश अर्जाची स्थिती पाहताना सर्व्हरच्या क्षमतेपलीकडे जाऊन पोर्टल संथ होऊ शकते. त्यामुळे पालकांनी संभ्रमात न पडता काही प्रयत्न करावा, असे प्राथमिक शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.
आरटीई प्रवेशाचा आढावा -
- शाळांची संख्या : ८,८२३
- प्रवेशासाठी उपलब्ध जागा : १,०१,८४६
- निवड झालेले विद्यार्थी : ९४,७००
- नियमित फेरीत प्रवेश निश्चित केलेले : ६४,२५६
- प्रतीक्षा यादीत निवड झालेले : २५,८९०
- पहिल्याच दिवशी प्रतीक्षा यादीतील झालेले प्रवेश : ३२५
आरटीई प्रवेशाबाबत अधिक माहितीसाठी संकेतस्थळ - https://student.maharashtra.gov.in/adm_portal/Users/rteindex